Turmeric Market Update : मागील आठवड्याच्या अखेरीस मुंबईत दुसरी जागतिक हळद परिषद पार पडली. प्रक्रियादार, व्यापारी, शास्त्रज्ञ आणि निर्यातदार यांचा बऱ्यापैकी सहभाग असणाऱ्या या परिषदेत शेतकरी आणि उत्पादक कंपन्याही सहभागी झाल्या होत्या.
हळद ही कमोडिटी तुलनेने छोटी गणली जाते. संपूर्ण देशात जेमतेम १०-१२ लाख टन सरासरी वार्षिक उत्पादन असणाऱ्या या मसाला पिकामध्ये भारताची मक्तेदारी आहे. जगातील ७७ टक्के हळद उत्पादन आपल्या देशात होते.
त्यामुळे भारतीय पद्धतीच्या जेवणात दररोज चिमूटभर वापरला जाणारा मसाला आणि काही प्रमाणात औषधी उपयोगासाठी लागणारी गोष्ट आणि त्या अनुषंगाने होणारी निर्यात एवढीच मर्यादित ओळख हळदीची अगदी अलीकडेपर्यंत होती. परंतु कोविडच्या भयानक कालखंडानंतर हळदीला चांगले दिवस आले, असे म्हणता येईल. कारण हळदीच्या औषधी गुणांची खऱ्या अर्थाने जगाला ओळख झाली. हळदीच्या किमतीदेखील वाढल्यामुळे व्यापारी वर्गात ती अधिकच चर्चेत आली.
जागतिक बाजारात हळदीच्या निर्यातवृद्धीला सातत्य दिसू लागले आणि त्यातून चांगला आर्थिक फायदा होऊ लागला. साहजिकच त्यात ‘स्पेक्युलेटिव कॅपिटल’ यायला लागले. ‘स्पेक्युलेटिव कॅपिटल’ या संज्ञेला नकारात्मक दृष्टीने पाहण्याची गरज नाही. कारण कुठल्याही वस्तूमध्ये कुठल्या ना कुठल्या उद्देशाने पैशांची गुंतवणूक केली गेली तरच त्या वस्तूला किंमत प्राप्त होत असते आणि त्याच्या उत्पादनाला उत्तेजन मिळत असते. नेमके हेच हळदीमध्ये झाल्याचे दिसून येत आहे. कुणी उत्पादनपूर्व संशोधनासाठी, कुणी नवनवीन उत्पादने करण्याच्या दृष्टीने तर कुणी निव्वळ वित्तीय गुंतवणुकीसाठी अशा विविध उद्देशाने हे ‘स्पेक्युलेटिव कॅपिटल’ हळदीमध्ये आणले.
नेमक्या त्याच वेळी भारतात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे उत्पादनात ३०-४० टक्के घट झाली. या सर्व घटकांची एकाच वेळी मोट बांधली गेली आणि त्यातून हळदीचे भाग्य उजळले. एका अर्थाने हळदीला ‘ग्लॅमर’ (वलय) लाभले आणि हळदीच्या किमतीने प्रति क्विंटल २० हजार रुपयांचे नवीन शिखर गाठले. सुमारे दशकभरापूर्वी हळद एकदा १८ हजार रुपयांवर गेली होती. परंतु त्या वेळी आलेली तेजी पूर्णत: मूलभूत घटक-आधारित नसल्याचे दिसून आले होते. या वेळची तेजी मात्र बऱ्याच अंशी मूलभूत घटकांच्या आधारावर कमोडिटी बाजाराच्या नियमांना धरून असल्याचे दिसून आले.
इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, की मूलभूत घटक दर हंगामात बदलत राहतात. आणि हळद याला अपवाद नाही. चालू हंगामातील विक्रमी किंमत, त्याचा परिणाम म्हणून पुढील हंगामासाठी लागवडीत मोठी वाढ होण्याचा अंदाज आणि सुदैवाने हवामानाची अजूनपर्यंत चांगली राहिलेली साथ यामुळे बाजारातील ‘सेंटिमेंट’ वेगाने बदलत आहे. अपेक्षेनुसार या विषयावर वर हळद परिषदेत जोरदार चर्चा झाली. त्यामध्ये व्यापारी, शेतकरी आणि निर्यातदार यांच्याबरोबरच पीक संशोधक शास्त्रज्ञांनी भाग घेतल्यामुळे चर्चेचे विषय तेजी-मंदी पलीकडे गेलेले पाहायला मिळाले, ही समाधानाची बाब आहे.
यापूर्वी या स्तंभातून आपण हळदीबाबत अनेकदा चर्चा केली आहे. त्यामध्ये चालू हंगामातील वाटचालीबाबत अंदाज व्यक्त केले होते. मागील महिन्यात या विषयावर चर्चा करताना मंदीची शक्यता ६० टक्के असल्याचा अंदाज व्यक्त केला होता आणि हळद १२ हजार रुपयांवर केव्हा येईल ते कळणारही नाही असेही म्हटले होते. त्यानंतर याची शब्दश: प्रचिती देखील आली आहे. मागील आठवडाअखेर वायदे बाजारात ऑक्टोबर कॉँट्रॅक्ट बरोबर १३ हजार रुपयांचा तळ गाठून १३,३७२ रुपयांवर बंद झाले आहे. म्हणजे केवळ तीन आठवड्यांत हळदीमध्ये ४००० रुपयांहून अधिक घसरण झाली आहे.
हळदीच्या घसरणीमागील मूलभूत घटक आपण चर्चिले तेच असले तरी घसरणीचा वेग खूपच अधिक असण्याच्या कारणांबाबत मात्र संभ्रम आढळला. कुणी म्हटले क्षेत्रवाढ ५० टक्क्यांहून अधिक असेल तर कुणी त्याला सट्टेबाजीचे नाव दिले. परंतु बांगलादेशातील बिघडलेल्या परिस्थितीमुळे ‘मार्केट सेंटिमेंट’ बिघडल्याची ‘कुजबूज’ देखील या निमित्ताने ऐकायला मिळाली.
तेथील सत्ताबदल झाल्यावर व्यापाऱ्यांमधील परस्परविश्वासाला तडा गेल्याचे बोलले जात आहे. अनेक व्यापाऱ्यांचे पैसे येणे बाकी असल्यामुळे नवीन निर्यात ऑर्डर्स स्वीकारताना हात आखडता हात घेतला जात आहे. ही परिस्थिती लवकर पूर्वपदाला न आल्यास हंगामातील उर्वरित चार महिन्यांमधील निर्यात कमी होण्याच्या शक्यतेमुळेच किमतीमध्ये वेगाने घसरण झाल्याचे बोलले जात आहे.
पुढील वाटचाल
अर्थात, सर्व काही हातातून गेले अशी परिस्थिती नसून हळदीच्या या हंगामातील सहा महिने बाकी आहेत. देशांतर्गत उपलब्ध साठे या वेळी सरासरीपेक्षा ५० टक्के कमी असल्यामुळे डिसेंबर ते फेब्रुवारी या ‘ऑफ-सीझन’ काळात लागणाऱ्या मागणीच्या पूर्ततेसाठी बाजार ऑक्टोबरमध्ये मजबूत होण्यास सुरवात होईल, असे मत या क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केले. परंतु या तेजी-मंदी पलीकडे जाऊन या हळद परिषदेत ज्या विषयांवर चर्चा झाली ती हळद या पिकाचे ग्लॅमर पुढे टिकवून ठेवण्यासाठी उपयोगी ठरेल इतपत आश्वासक होती.
यामध्ये हळदीसारख्या नऊ महिन्यांच्या दीर्घ कालावधीच्या पिकातून शेतकरी इतर पिकांकडे वळण्याच्या शक्यतेला शह देण्यासाठी हळदीचे नवीन कमी कालावधीचे वाण विकसित करण्याचा मुद्दा महत्त्वाचा ठरतो.
केरळ येथील मसाला पीक संशोधन संस्थेने अगदी सहा महिन्यांत तयार होणारी प्रगती हे शेतकरी-स्नेही वाण विकसित केल्याची माहिती या संस्थेचे शास्त्रज्ञ डॉ. लिजो थॉमस यांनी दिली. हिंगोलीतील नव्याने स्थापन झालेल्या राष्ट्रीय हळद संशोधन संस्थेने हे वाण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
हळकुंड किंवा हळद पावडर निर्यात करण्यापेक्षा त्याचे अधिक मूल्यवर्धन कसे करता येईल यावर बोलताना ओडिशामधील आदिवासी हळद उत्पादक शेतकऱ्यांमध्ये काम करणाऱ्या संबीत त्रिपाठी यांनी कंधमाल जातीच्या हळद तेलाच्या निर्यातीतून चांगला आर्थिक फायदा कसा होऊ शकेल याची माहिती दिली.
तर हिंगोलीचे माजी खासदार हेमंत पाटील यांनी मदिराप्राशन करणाऱ्या लोकांना ‘हॅंगओव्हर’चा त्रास होऊ नये म्हणून जपानमध्ये हळदीपासून तयार करण्यात येणाऱ्या अत्यंत महागड्या पेयाचे उत्पादन भारतात करता येईल का याची चाचपणी करण्याचा आग्रह केला.
याव्यतिरिक्त वस्त्रोद्योग आणि अन्नप्रक्रिया क्षेत्रासाठी रासायनिक रंगाऐवजी हळदीपासून रंग केल्यास उत्पादकांना फायदा होऊ शकेल असे मत अनेक संशोधक शास्त्रज्ञांनी मांडले. एकंदर पाहता या परिषदेत वैविध्यपूर्ण विषयांवर अर्थपूर्ण चर्चा झाली. परंतु या परिषदेला पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे राज्य सरकारमधील जबाबदार उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची अनुपस्थिती जाणवली. राज्याबाहेरील काही उद्योजकांनी तसे बोलूनही दाखवले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.