Pune News : हरभऱ्याचा भाव सध्या बहुतांशी बाजारांत ५४०० ते ५८०० रुपयांच्या दरम्यान आहे. हरभऱ्याच्या भावात मागील दोन आठवड्यांत क्विंटलमागे ३०० ते ४०० रुपयांपर्यंत सुधारणा झाली. देशातील उत्पादन आणि मागणीचा आलेख तेजीला पोषक आहे. पण त्याचवेळी भाव कमी करण्यासाठी सरकारकडेही आयातीचे पर्याय आहेत. त्यामुळे पुढच्या काही महिन्यांमध्ये भावात ५ ते ७ टक्क्यांपेक्षा जास्त वाढीची शक्यता दिसत नाही, असा अंदाज बाजारातील अभ्यासकांनी व्यस्त केला.
देशातील हरभरा उत्पादन यंदा गेल्यावर्षीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज आहे. त्यातच मागील हंगामातील शिल्लक साठा कमी आहे. ‘नाफेड’कडील हरभऱ्याचा स्टॉकही कमी झाला. यामुळे हरभरा भावाला चांगला आधार आहे. परिणामी हमीभावापेक्षा बाजार कमी होण्याची शक्यता खूपच कमी आहे. सरकारने पिवळा वाटाणा आयात करून भाव कमी करण्याचा प्रयत्न केला. यामुळे हरभरा भावातील तेजी बोथट झाली पण हरभऱ्याचे भाव पडले नाहीत.
सध्या हरभऱ्याचा भाव ५४०० ते ५८०० रुपयांच्या दरम्यान आहेत. तसेच हरभऱ्याचे भाव जास्त वाढल्यास सरकार पुन्हा निर्णय घेऊन दर कमी करू शकते. त्यामुळे तुरीप्रमाणे फार मोठ्या तेजीची शक्यता सध्यातरी दिसत नाही. कारण तुरीमध्ये सरकारकडे भाव पाडण्यासाठी ठोस पर्याय नाहीत.
पण हभऱ्यामध्ये पर्याय आहेत. सरकार हरभरा आयात शुल्क कमी करण्यासह इतरही निर्णय घेऊ शकते. पण निवडणुका होईपर्यंत ही शक्यता कमीच दिसते. त्यामुळे पुढील दीड ते दोन महिन्यांत हरभरा भावात क्विंटलमागे आणखी ३०० ते ५०० रुपयांची सुधारणा अपेक्षित आहे, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.
सरकारला हरभऱ्याची गरज तर आहे. पण निवडणुकीमुळे सरकार शेतकरी नाराज होतील, असा निर्णय घेण्याची शक्यता कमीच आहे. तसेच जे शेतकरी हरभरा विक्रीचा विचार करत आहेत त्यांनी आपल्या भागातील भावाप्रमाणे ५६०० ते ५८०० रुपयांच्या दरम्यान विक्रीचा निर्णय घेण्यास हरकत नाही, असेही अभ्यासकांनी सांगितले. तसेच सरकारचे धोरण बदलल्यानंतर भावातही चढ उतार राहतील. याकडेही शेतकऱ्यांनी लक्ष ठेवावे, असे आवाहनही अभ्यासकांनी केले.
देशातील भावपातळी
हरभऱ्याला सध्या देशभरात ५४०० ते ५८०० रुपयांचा भाव मिळत आहे. देशातील महत्त्वाच्या हरभरा उत्पादक देशांमधील भावपातळी या दरम्यानच दिसते. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील भाव ५४०० ते ५८०० रुपयांच्या दरम्यान आहे. तर छत्तीसगडमध्ये ५५०० ते ५९०० रुपये आणि कर्नाटकात ५३०० ते ५८०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. देशातील इतर बाजारांमध्येही हरभऱ्याला यादरम्यान भाव मिळत आहे.
‘नाफेड’ला कमी प्रतिसाद
खुल्या बाजारात सध्या हरभऱ्याचा भाव हमीभावापेक्षा जास्त आहे. त्यामुळे ‘नाफेड’च्या खेरदीलाही शेतकरी प्रतिसाद देत नाहीत. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत मागील वर्षी नाफेडने २ ते ३ लाख टन हरभरा खरेदी केला होता. पण यंदा नाफेडला केवळ १५ हजार टनांचीच खरेदी करता आली.
कारण खुल्या बाजारात भाव जास्त आहेत. यामुळे शेतकरी नाफेडला हरभरा विकत नाहीत. जास्त हरभरा खरेदी करण्यासाठी सरकार दोन पर्यायांवर विचर करत आहे. एक म्हणजे बाजारभावाने खरेदी करणे किंवा बाजारभाव हमीभावापेक्षा कमी करणे.
खुल्या बाजारातील भाव हमीभावापेक्षा किमान २०० ते ३०० रुपयांनी कमी असतील तरच शेतकरी नाफेडला हरभरा विकतील, असे शेतकऱ्यांनी सांगितले. पण अभ्यासकांच्या मते, सरकार बाजारभावाने खेरदीचा निर्णय घेऊ शकते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.