नाशिक : ‘‘आजच्या कांद्याच्या प्रश्नाचे मूळ मागील वर्षीच्या कांदा निर्यातबंदीत (Onion Export) आहे. त्यामुळे जागतिक पातळीवर निर्यातीत भारतीय कांद्याची पत घसरलेली आहे. केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल (Piyush Goyal) यांनी निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे,’’ असा आरोप करीत या नुकसानीची मदत केंद्र सरकारने द्यावी.
या निर्णयाचा परिणाम म्हणून कांद्यासाठी शेतकऱ्यांनी घेतलेली कर्जे थकली आहेत. ती रद्द व्हावीत किंवा सरकारने ती फेडावीत,’’ अशी मागणी शरद जोशीप्रणित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष ललित बहाळे यांनी केली.
कांदा प्रश्नावर सरकारचे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मुंबई-आग्रा महामार्गावरील टेहरे (ता. मालेगाव) येथील हुतात्मा चौकात शेतकरी संघटनेतर्फे ‘कांदा बाजार स्वातंत्र्य अर्थाग्रह’ रास्ता रोको गुरुवारी (ता.२९) करण्यात आला.
या वेळी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष देविदास पवार, उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रा. शशिकांत भदाणे, महिला आघाडीच्या नेत्या सीमा नरोडे, ज्येष्ठ नेते संतू पाटील-झांबरे, जिल्हाध्यक्ष अर्जुन बोराडे, बापूसाहेब पगारे, बाळासाहेब हिंगे, शेखर पवार आदींसह कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बहाळे म्हणाले, ‘‘कांदा जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत घालू नये.
कांद्याच्या विक्री प्रक्रियेत कोणीही हस्तक्षेप करू नये. या शिवाय साठा मर्यादा, व्यापाऱ्यांवर आयकर धाडी टाकू नयेत. यापूर्वी ज्या ज्या वेळी धाडी टाकल्या, त्यावेळी मोठा फटका शेतकऱ्यांना बसला, असे सिद्ध झाले आहे.’’
सकाळी ११ वाजेपासून शेतकरी हुतात्मा चौकात दुपारी २ वाजेपर्यंत आंदोलन सुरू होते. शेतकरी संघटनेचे पदाधिकारी कांद्याच्या माळा गळ्यात घालून आंदोलनात सहभागी झाले. आंदोलनस्थळी पोलिस फाटा मोठ्या प्रमाणात तैनात होता. आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी मुंबई-आग्रा महामार्ग अडविल्याने जवळपास एक तास वाहतूक खोळंबली होती.
‘शेतकऱ्यांना लय फसवलं राव’
शेतकरी काबाडकष्ट करून आणि भांडवल गुंतवून शेतीमाल पिकवीत आहे. मात्र त्यास अपेक्षित दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना संघटित झाल्याशिवाय पर्याय नाही.‘‘पन्नास वर्षांत शेतकऱ्यांना लय फसवलं राव, आता शेतमालाला मिळवा भाव,’ ‘शेतकऱ्याला स्वतंत्र करायचं राव, संधी आपल्याला आता एकच राव’ या गीतातून शेतकरी संघटनेचे पाटोदा (ता. येवला) येथील जेष्ठ कार्यकर्ते चंद्रभान बोराडे यांनी शेतकऱ्यांचे लक्ष वेधले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.