
Ratnagiri News: बदलत्या वातावरणाचा फटका यंदा काजू बागायतदारांना बसला असून सुमारे ३० टक्के उत्पादन घटण्याची भीती व्यक्त केली जात आहे. काजू बी कमी असल्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात सध्या किलोला दर १५० ते १६५ रुपये मिळत आहे. तसेच काजू बीवरील वाढवलेले आयात शुल्कही दर वाढीसाठी उपयुक्त ठरले आहे.
जिल्ह्यात १ लाख ११ हजार ६२५ हेक्टर क्षेत्रावर काजूची लागवड होते. त्यातील उत्पादनक्षम क्षेत्र ९४ हजार ६८० हेक्टर आहे. दर वर्षी १ लाख ४२ हजार २० टन काजूचे उत्पादन होते. आंबा लागवडीप्रमाणे काजू लागवडीसाठी बागायतदारांना विशेष परिश्रम घ्यावे लागत नाहीत. मात्र गेल्या काही दिवसांमध्ये मोठे व्यावसायिक कीटकनाशक फवारणीसह काजू बागांचे व्यवस्थापन करू लागले आहेत.
बदलत्या वातावरणाचा परिणाम यंदा काजू उत्पादनावर झाला आहे. मोहरच काळा पडून गेल्याने मोठीच अडचण झाली आहे. या वर्षी फुलकिडीचा (थ्रिप्स) प्रादुर्भाव झाल्यामुळे काजू बीचा आकार कमी झालेला आहे. त्यात ‘वेंगुर्ला ४’ काजू बीवर सर्वाधिक प्रादुर्भाव दिसत आहे. काही ठिकाणी बोंडेही कुजून गेलेली आहेत. बीचे वजन कमी झाल्याने उत्पन्नात घट झाली आहे. पूर्वी या बीला १६० रुपये किलोला दर मिळत होता. आता मात्र याच बीला १४० रुपये दर मिळत आहे. टी मॉस्क्युटोसारख्या किडीचा प्रादुर्भावही मोठ्या प्रमाणात झाल्याने त्यावर नियंत्रण ठेवणे बागायतदारांना शक्य झालेले नाही.
परिणामी यंदा हंगामातील उत्पादनात मोठी घट झालेली आहे. सुमारे ३० टक्क्यांहून अधिक उत्पादन कमी राहील, अशी भीती बागायतदारांमध्ये आहे. त्यामुळे हेक्टरी उत्पादकता दोन टनांवरून दीड टनावर येण्याची शक्यता आहे. सध्या बाजारामध्ये १५० ते १६५ रुपये दराने सुके काजू बी विकत घेतले जात आहेत. दरम्यान, यावर्षी ओल्या काजूगराचा दर सुरुवातीला २२०० रुपये किलो होता. सध्या १ हजार रुपये किलोने गर विकले जात आहेत. मात्र कमी उत्पादनामुळे ओल्या काजूगरांचे दर स्थिर राहिलेले होते.
याबाबत राजापूर येथील काजू बागायतदार डॉ. शैलेश शिंदे-सावतदेसाई म्हणाले, की काजू बीवरील आयात शुल्क वाढविल्यामुळे भारतामध्ये येणाऱ्या मालावर परिणाम होणार आहे. त्यामुळे स्थानिक बागायतदारांकडून काजू बीची खरेदी वाढलेली आहे. त्याचा फायदा बागायदारांना होत आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.