Sangli News : यंदा द्राक्षावर करपाजन्य, बुरशीजन्य आणि अवकाळी पावसाचा फटका द्राक्षाला बसल्यामुळे बेदाणा हंगाम थंडावला आहे. परिणामी बेदाणा तयार करण्यासाठी द्राक्षाची टंचाई भासू लागल्याने ऐन हंगामात बेदाणा निर्मिती थंडावली आहे.
यंदाचा बेदाणा निर्मितीचा हंगाम अडीच महिनेच चालला असून, तो वीस दिवस आधीच संपेल, तसेच राज्य आणि कर्नाटकातील बेदाण्याच्या उत्पादनात ३० टक्के घट होईल, असा प्राथमिक अंदाज बेदाणा उद्योगातील जाणकार आणि बेदाणा शेड मालकांनी व्यक्त केला आहे.
राज्यात बेदाण्याचे सरासरी उत्पादन दोन लाख टन इतके होते. सर्वसाधारणपणे बेदाण्याचा हंगाम जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यापासून सुरू होतो. मार्च महिन्यात निर्मितीस गती येते आणि एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात हंगाम आटोपला जातो. अर्थात तीन महिने हंगाम चालतो. प्रामुख्याने थॉमसन या वाणाचा तसेच त्याचबरोबर मार्केटिंगची द्राक्ष विक्रीनंतर शिल्लक राहिलेल्या द्राक्षापासून बेदाणा तयार केला जातो. गेल्या वर्षी महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांत मिळून २ लाख ७२ हजार १०० टन बेदाण्याचे उत्पादन झाले होते.
यंदा डिसेंबर महिन्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्याचा फटका द्राक्ष बागेला बसल्याने शेतकऱ्यांनी बेदाणा निर्मिती करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मार्केटिंगची द्राक्षे विक्रीनंतर बेदाणा करण्यासाठी शेतकरी पुढे आले. त्यामुळे जानेवारी महिन्यात बेदाणा हंगाम सुरू झाला.
अर्थात दर वर्षीपेक्षा चालू वर्षात एक महिना अगोदर हंगाम सुरू झाला. मार्च महिन्यात बेदाणा शेडवर बेदाणा तयार करण्यासाठी वेटिंग लागते. तसेच लगबग सुरू असते. त्यामुळे या वर्षीही बेदाणा निर्मितीसाठी लगबग सुरू होईल, असा अंदाज बेदाणा शेड मालकांनी व्यक्त केला होता.
मध्यंतरी थंडीमुळे द्राक्षाला उठाव नसल्याने द्राक्षाचे दरही दबावात होते. अशा परिस्थितीतही शेतकऱ्यांनी द्राक्षाची विक्री केली. त्यातच सातत्याने द्राक्षावर बदलत्या वातावरणाचा फटका बसला. दरम्यान, द्राक्ष काढणीच्या वेळीच द्राक्षावर बुरशीजन्य आणि करपाजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे द्राक्षाचे घडच खराब झाल्याने काढून टाकले. नैसर्गिक आपत्तीमुळे द्राक्षाचे नुकसान झाल्याने बागेत माल कमी राहिला. यंदाचा हंगाम अडीच महिने चालणार असून बेदाण्याचे उत्पादनही ५० टक्क्यांनी घट होईल, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
उत्पादन खर्चही वाढला
नैसर्गिक संकटामुळे द्राक्ष बागा वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना अधिकचा खर्च करावा लागला. त्यामुळे बागेत एक किलो द्राक्ष तयार करण्यासाठी सुमारे ८० रुपयांपासून ते १०० रुपयांपर्यंत खर्च झाला. तर एक किलो बेदाणा तयार करण्यासाठी ३५ ते ४० रुपयांचा खर्च येतो. त्यामुळे द्राक्ष बाग धरण्यापासून ते एक किलो बेदाणा तयार होण्यापर्यंत ११५ ते १४० रुपयांचा खर्च करावा लागत आहे. गेल्या वर्षी द्राक्ष बाग धरण्यापासून ते एक किलो बेदाणा तयार करण्यासाठी १०० ते १२० असा खर्च येत होता. अर्थात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा किलोसाठी १५ ते २० रुपयांनी खर्च वाढला आहे.
बेदाणा उत्पादन दृष्टीक्षेप...
सन... उत्पादन (टनात)
२०१७-१८...१ लाख ६० हजार
२०१८-१९...१ लाख ७० हजार
२०१९-२०...१ लाख ८० हजार
२०२०-२१...१ लाख ९५ हजार
२०२१-२२...२ लाख ५७ हजार ९००
२०२२-२३...२ लाख ७२ हजार १००
(आकडेवारी तासगाव कृषी उत्पन्न बाजार समिती)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.