अमरावती : हंगाम सुरू असला तरी सोयाबीनचा बाजार (Soybean Market) मात्र थंडच आहे. पाच हजार पोत्यांच्या वर बाजार समितीत आवक (Soybean Arrival) नसल्याने दर हंगामात होत असलेली आर्थिक उलाढाल प्रभावित झाली आहे. चढ्या दरांच्या प्रतीक्षेत शेतकरी असला तरी खेडा खरेदी (Kheda Kharedi) जोरदार सुरू असल्याने बाजार समितीचा सेस बुडू लागला आहे. त्याचा बाजार समितीला आर्थिक फटका बसू लागला आहे.
यंदा अतिवृष्टी व संततधार पावसाचा सोयाबीनला फटका बसला आहे. सोयाबीनचे उत्पादन सरासरी घसरण्यासोबतच प्रतवारीही घसरली आहे. यंदा उत्पादन कमी असल्याने भाव चढतील, असा अंदाज होता. मात्र तो फोल ठरला आहे. जागतिक बाजारपेठेत पामतेलाचे भाव चढल्याने सोयाबीनमध्ये तेजी येण्याचे संकेत होते.
मात्र बाजार चढत नसल्याने शेतकऱ्यांनी शेतमाल घरातच ठेवणे पसंत केले आहे. बाजारातील भाव बघूनच तो आवक आणू लागला आहे, तर खरेदीदारांनी खेडा खरेदी जोरदार सुरू केली आहे. जागेवर बाजारभाव मिळू लागल्याने शेतकऱ्यांनी खेडा खरेदीस प्रतिसाद दिला आहे. या व्यवहारात त्याचा वाहतूक खर्चासह हमाल-मापारी व छुपी अडत वाचू लागली आहे.
खेडा खरेदी शेतकऱ्यांना परवडत असली तरी या व्यवहारात बाजार समितीचे मात्र आर्थिक नुकसान होऊ लागले आहे. कापूस बाजार बाहेर गेल्याने आधीच बाजार समितीचे नुकसान होऊ लागले असताना आता सोयाबीनचाही सेस बुडू लागल्याने दुहेरी नुकसान होऊ लागले आहे. दरवर्षी बाजार समितीत लाखो क्विंटल सोयाबीनची उलाढाल होऊन बाजार समितीला भरगच्च सेस मिळतो. यंदा मात्र दररोज पाच हजारच्या जवळपासच आवक असल्याने सेस कमी झाला आहे.
पणन नियमनानुसार बाजार समिती खेडा खरेदीवर निर्बंध आणू शकते, मात्र सध्या संचालक मंडळ नसल्याने निर्णय घेण्यात आलेला नाही. प्रशासकांनी याकडे लक्ष घातल्यास बाजार समितीचे आर्थिक नुकसान वाचू शकणार आहे, अशा प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
शेतकरी दर तपासूनच सोयाबीन बाजारात आणू लागला आहे. गतवर्षी सोयाबीनला १० हजार रुपयांपर्यंत भाव मिळाले. यंदा ते निम्म्यावरच असून आणखी चढण्याची शक्यता सध्या दिसत नसल्याने शेतकऱ्यांनी आवक रोखून धरली आहे.
- राजेश पाटील, खरेदीदार.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.