
Jalgaon News : कोविडमुळे कोस्टारिका व इक्वेडोरमध्ये केळीची आवक व गुणवत्ता घसरली आहे. तसेच रशिया - युक्रेनधील युद्धाचा लाभही देशातील केळी उत्पादक, निर्यातदारांना काहीसा होत असून, केळीची निर्यात यंदा वाढेल, असे दिसत आहे.
रशिया व युक्रेन युद्धामुळे रशियात अमेरिकन देशांमध्ये समाविष्ट असलेल्या इक्वेडोर व होंडूरासमधून केळीची आयात होत नसल्याची स्थिती आहे. रशियामध्ये केळीची देशातून पाठवणूक कशी वाढेल, यासाठी देशातील निर्यातदार, काही केळी उत्पादक प्रयत्न करीत आहेत.
रशियात देशातून केळीची पाठवणूक करण्यासाठीचा एकूण प्रवास प्रवास १७ ते १८ दिवसांचा आहे. त्यात जहाजाने प्रथम यूएई मधील बंदर अब्वास येथे केळी पाठवणुकीसाठी सात ते आठ दिवस लागतात. तेथून पुढे रशियामध्ये रस्ते मार्गे केळी पाठवणूक केली जावू शकते. बंदर अब्बास येथून पुढे रशियात रस्ते मार्गे केळी पाठवायला १७ ते १८ दिवस लागतात.
हा प्रवास कसा कमी होईल, वाहतूक भाडे कमी होवू शकते का किंवा अन्य मार्गाने कमी दरात केळी रशियात पाठविता येईल, का यासाठी भारतीय निर्यातदार व आखातातील आयातदार काम करीत आहेत. कारण रशियात केळी पाठवणुकीची मोठी संधी चालून आली आहे.
होंडूरास, इक्वेडोरचा जगात पहिल्या क्रमांकाचा व फिलीपीन्स दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. होंडुरास, इक्वेडोरमधील कमाल केळी युरोप व रशियात पाठविली जाते. फिलीपीन्स चीन, सिंगापूर, कोरिया आदी देशांत केळीची अधिकची पाठवणूक करतो. या देशांमधून केळीची निर्यात रखडत किंवा हवी तशी सुरू नाही.
होंडुरास, इक्वोडोर, फिलिपिन्समधील केळीला नैसर्गिक समस्यांचा फटकाही बसला आहे. या तीनही प्रमुख केळी उत्पादक व निर्यातदार देशांत केळीची १५ ते २० टक्के आवक घटली आहे. पनामा रोगाला फिलिपिन्समधील केळी उत्पादक तोंड देत आहेत. तेथील केळीची गुणवत्ताही घसरली आहे. या सर्व बाबींचा लाभ देशातील किंवा राज्यातील केळी उत्पादकांना होत आहे.
देशातील निर्यात रोजची ६० कंटेनर
सध्या देशातील उच्च दर्जाच्या केळीला (निर्यातीच्या) २००० ते २१०० रुपये प्रतिक्विंटलचे दर आहेत. निर्यातीच्या केळी दरात मागील काही दिवसात बऱ्यापैकी वाढ झाली आहे. सध्या देशातून ६० कंटेनर केळीची निर्यात आखातात होत आहे. त्यात जळगाव जिल्ह्यातून रोज तीन, नंदुरबारातून एक, सोलापुरातून रोज २८, नांदेडमधून चार तमिळनाडू व इतर दाक्षिणात्य भागातूनही निर्यात सुरू आहे.
खानदेशातून यंदा आखातात किंवा परदेशात मार्च ते जुलैच्या मध्यापर्यंत दोन हजार कंटेनर केळीची निर्यात झाली आहे. यंदा खानदेशातून प्रथमच जुलैतही केळीची बऱ्यापैकी निर्यात झाली आहे. ऑगस्टमध्येही ही निर्यात अशीच सुरू राहील, असे संकेत आहेत. मागील हंगामात खानदेशातून जुलैत केळीची आखातातील निर्यात थांबली होती.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.