Banana Market : केळीला २४०० रुपये क्विंटलचा विक्रमी दर

Banana Rate : देशात सध्या महाराष्ट्र, गुजरात व मध्य प्रदेशातच केळी काढणीवर आहे. सणवार, उपवासाचे दिवस सध्या असल्याने केळीला मोठा उठाव सर्वत्र आहे.
Banana Market
Banana MarketAgrowon
Published on
Updated on

Jalgaon News : देशात सध्या महाराष्ट्र, गुजरात व मध्य प्रदेशातच केळी काढणीवर आहे. सणवार, उपवासाचे दिवस सध्या असल्याने केळीला मोठा उठाव सर्वत्र आहे. दर्जेदार केळीचा तुटवडा आहे. परिणामी, केळी दर विक्रमी स्थितीत म्हणजेच २४०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोहोचले आहेत. या हंगामातील केळी दरांचा हा नवा विक्रम आहे.

खानदेशातही केळीच्या आवकेत मोठी घट मागील दोन महिन्यांत झाली आहे. यंदा खानदेशात एप्रिल ते जूनच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत केळीला सरासरी दर फक्त ८०० रुपये प्रतिक्विंटल मिळाला. एप्रिलमध्ये ४०० ते ५०० रुपये प्रतिक्विंटलचा दर होता.

कारण या काळात खानदेशात रोज ५०० ट्रक (एक ट्रक १६ टन क्षमता) केळीची आवक सुरू होती. परंतु जूनच्या मध्यानंतर केळीची आवक खानदेशात झपाट्याने कमी झाली. राज्यातही या काळात केळीची आवक कमी झाली. यामुळे केळी दरात सुधारणा सुरू झाली. दर्जेदार केळीचे दर महिनाभरात एक क्विंटलमागे एक हजार रुपयांनी वाढले आहेत.

Banana Market
Jalgaon Banana : रावेर ऐवजी केळी भरली निंभोरा रेल्वे स्थानकातून; केळी उत्पादकांसह कामगार नाराज

मध्य प्रदेशात मोठी आवक

राज्यात सध्या केळीची २०० ट्रक (एक ट्रक १६ टन क्षमता) आवक सुरू आहे. खानदेशात फक्त १०० ते ११० ट्रक केळीची आवक मागील सात ते आठ दिवसांपासून सुरू आहे. यात केळीचे आगार असलेल्या रावेरातून रोज ६० ते ६५ ट्रक केळीची आवक होत आहे.

तर मध्य प्रदेशातील नर्मदा व तापी लगतच्या क्षेत्रात केळीची चांगली आवक होत आहे. बडवानी, बऱ्हाणपूर या जिल्ह्यांत मिळून रोज २५० ट्रक केळीची आवक मध्य प्रदेशात होत आहे. देशात ही सर्वाधिक आवक असल्याची माहिती मिळाली. गुजरातेतही रोज ६० ते ७० ट्रक केळीची आवक आहे. परंतु या केळीचा दर्जा दर्जेदार नाही.

Banana Market
Banana Market : केळी आवकेसह दरातही सुधारणा

निर्यातीसाठी केळी मिळेनात

देशात सध्या आंध्र प्रदेश, केरळ, तमिळनाडू आदी भागांत पिकवून खाण्यायोग्य केळीची अल्प आवक आहे. आंध्र प्रदेशातील आवक नोव्हेंबरमध्ये सुरू होईल. यामुळे दर्जेदार केळीचा तुटवडा आहे. खानदेशात निर्यातीसाठी हवी तेवढी व हवी तशी केळी उपलब्ध होत नसल्याची स्थिती आहे.

राज्यातून सध्या रोज ३१ ते ३२ कंटेनर (एक कंटेनर २० टन क्षमता) केळीची निर्यात होत आहे. त्यास २४०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंतचा दर आहे. खानदेशातून सध्या रोज सात ते आठ कंटेनर केळीची निर्यात विविध कंपन्या करीत आहेत.

देशभरात सणवार, उत्सवांचे वातावरण आहे. श्रावणमास राज्यात सुरू आहे. पुढे गणेशोत्सव, नवरात्रोत्सव व अन्य सणवारांचा कालावधी असेल. यामुळे केळीचा उठाव कायम आहे. उत्तरेकडील मॉल्स व अन्य बाजारांत पाठवणुकीच्या केळीस प्रतिक्विंटल २४०० रुपये दर आहे. तर कमी दर्जाच्या केळीचे दर १५०० ते २००० रुपये आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com