Ethanol Production Ban : ऊसरस, सिरप, साखरेपासून इथेनॉल निर्मितीवर बंदी

Ethanol Blending Program : यंदाच्या हंगामात देशात साखर टंचाई निर्माण होऊ नये यासाठी साखर कारखान्यांनी उसाचा रस, सिरप आणि साखरेपासून इथेनॉल तयार करू नये, असे आदेश केंद्राने कारखान्यांना गुरुवारी (ता. ७) काढले आहेत.
Ethanol Production
Ethanol ProductionAgrowon
Published on
Updated on

Kolhapur News : यंदाच्या हंगामात देशात साखर टंचाई निर्माण होऊ नये यासाठी साखर कारखान्यांनी उसाचा रस, सिरप आणि साखरेपासून इथेनॉल तयार करू नये, असे आदेश केंद्राने कारखान्यांना गुरुवारी (ता. ७) काढले आहेत. ‘बी आणि सी मोलॅसिस’पासून मात्र इथेनॉल निर्मिती सुरू राहणार आहे.

नव्या आदेशाने साखर उद्योगाकडून होणाऱ्या देशातील इथेनॉल निर्मितीला ब्रेक लागणार आहे. निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी साखर उद्योगातून होत आहे. या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करावी, असेही आदेशात म्हटले आहे.

सध्या सिरप, साखर व उसाच्या रसापासून तयार होणाऱ्या इथेनॉलला सर्वाधिक प्रति लिटर ६५.६१ रुपये इतका दर मिळत होता. या आदेशानुसार इथेनॉल निर्मिती बंद राहिली तर हा दर कारखान्यांना मिळणार नसल्याने कारखान्याचा तोटा होणार असल्याची माहिती कारखाना सूत्रांनी दिली.

सध्या बी हेवी मोलॅसिसपासून मिळणाऱ्या इथेनॉलला प्रति लिटर ६०.७३, तर सी हेवी मोलॅसिसपासून मिळणाऱ्या इथेनॉलला ४९.४१ रुपये दर मिळत आहे. कारखान्यांना ज्या घटकापासून तयार होणाऱ्या इथेनॉलला सर्वाधिक दर मिळतो त्याच घटकापासून तयार होणारी निर्मिती आता थांबवावी लागेल.

Ethanol Production
Ethanol Blending : पेट्रोलमध्ये १२ टक्के इथेनॉल मिश्रणाचे लक्ष्य पार

गेल्या पाच वर्षांपासून इथेनॉल निर्मितीला सातत्याने प्रोत्साहन देणाऱ्या केंद्राने यंदा पहिल्यांदाच साखरेपासूनची इथेनॉल निर्मिती थांबवली आहे. या अनपेक्षित निर्णयाचा फटका कारखान्यांच्या अर्थकारणावर ही बसण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांना एफआरपी देतानाही कारखाने आर्थिक अडचणीत जाऊ शकतात अशी भीती कारखानदारातून व्यक्त होत आहे.

गेल्या सहा महिन्यांपासून केंद्राने साखरेच्या किमती ग्राहकाच्या आवाक्यात ठेवण्यासाठी मोठी धडपड सुरू केली आहे. महिन्याला देण्यात येणाऱ्या कोट्यात पंधरा पंधरा दिवसाला हस्तक्षेप करत साखर दर नियंत्रित ठेवण्याचा प्रयत्न केला.

Ethanol Production
Ethanol Blending : इथेनॉल आख्यान

यंदाचा हंगाम सुरू होऊन दोन महिन्यांचा कालावधी लोटला, तरी अनेक राज्यांत ऊस तोडणी नियमित सुरू न झाल्याने अपेक्षित साखर निर्मिती झाली नाही. यामुळे यंदा देशात साखर निर्मिती कमी होईल, असे अंदाज बांधण्यात येऊ लागले.

या पार्श्वभूमीवर केंद्रानेही दोन दिवसांपूर्वी एका बैठकीत साखरेचा वापर करून तयार होणाऱ्या इथेनॉलवर बंदी आणण्याबाबत विचारविनिमय सुरू केला होता. अखेर गुरुवारी (ता. ७) दुपारी या बाबतचे आदेश कारखान्यासाठी काढण्यात आले.

केंद्राने इथेनॉल निर्मिती प्रकल्पांना गेल्या दोन वर्षात धडाधड परवानगी दिली. बहुतांशी कारखान्यांनी इथेनॉल निर्मिती प्रकल्प उभा केले. राष्ट्रीय इथेनॉल निर्मिती क्षमता २०२३ मध्ये १३६४ कोटी लिटरपर्यंत पोहोचली आहे.

केंद्राच्या निर्णयामुळे गतीने तयार होणाऱ्या इथेनॉल निर्मितीला खीळ बसणार आहे. साखरेला दर नसल्याने इथेनॉल पासून नफा मिळवण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या कारखान्यांना या निर्णयाचा फटका बसेल असे वाटते.
- पी. जी. मेढे, साखर तज्ज्ञ
केंद्राचा हा निर्णय तुघलकी निर्णय म्हणावा लागेल. या उद्योगात हजारो कोटी रुपयांचे भांडवल उभारण्यात आले आहे. हे प्रकल्प आता संकटात येतील. साखर सिरपपासून तयार होणाऱ्या इथेनॉलवर बंदी घालणे हा निर्णय चुकीचा आहे. यापेक्षा खतावरील अनुदान वाढवून व उत्पादकाला शंभर रुपये टनापर्यंत अनुदान दिल्यास शेतकरी जादा ऊस लागवडीला प्रोत्साहित होतील व ऊस लागवड वाढेल पर्यायने साखरेचे उत्पादनही वाढेल.
- राजू शेट्टी, संस्थापक, स्वाभिमानी शेतकरी संघटना

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com