
Hapus Mango Market Mumbai : उन्हाच्या झळा वाढत जातील तसा आता आंब्याचा गोडवाही सर्वसामान्यांच्या आवाक्यात येत आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत कोकणातील हापूस (alphonso) आणि मद्रास आणि कर्नाटकातील अन्य ठिकाणांहून येणाऱ्या हापूस आंब्याची आवक (mango Arrival) वाढल्याने दरही (Mango Rate) उतरत आहेत. मात्र, एप्रिल महिन्यातील आंब्याची आवक कमी होईल, असा आंबा व्यापाऱ्यांचा अंदाज आहे.
सध्या कृषी उत्पन्न बाजार समितीत कोकणातील विविध ठिकाणांहून ४५ ते ५० हजार पेट्या हापूस आंबा येत आहे. तसेच मद्रास हापूस आणि अन्य ठिकाणच्या आंब्यांची सरासरी २० हजार क्रेट येत आहेत. सध्या घाऊक बाजारात उत्तम प्रतीच्या देवगड हापूस आंब्याचा डझनाचा दर ७०० ते १५०० रुपयांवर आहे. तर मद्रास हापूसचा दर ५०० ते १००० रुपयांवर आहे.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळबाजार सध्या आंब्यांच्या पेट्यांनी व्यापून टाकला आहे. कोकणातील देवगड, रत्नागिरी, वेंगुर्ला, सिंधुदुर्ग आदी ठिकाणांवरून आंबा येत आहे. गेल्या काही वर्षांत आंब्यावर हवामान बदलाचा मोठा परिणाम झाल्याने ऐन हंगामात आंब्याची आवक कमी येते.
थंडीच्या दिवसांत अचानक दव पडल्याने मोहर काळा पडण्याचे प्रमाण वाढल्याने यंदा एप्रिल महिन्यात आंबा आवक थंडावेल, असा अंदाज व्यापाऱ्यांचा आहे.
उशिरा आलेल्या मोहरामुळे मे महिन्यात आंबा आवक वाढण्याची चिन्हे असली तरी या आंब्याची प्रत एप्रिल महिन्यातील आंब्याला नसते.
त्यामुळे ऐन हंगामात आंबा आवक मंदावण्याबरोबरच चव चाखण्यावरही मर्यादा येण्याची शक्यता आहे.
कोकणातून होणारी आंबा आवक (पेट्या)
१६ मार्च : ३१७०३
२० मार्च : ४५७२२
२२ मार्च : ४७४७५
२३ मार्च : १८७३४
२४ मार्च : ४०९११
२७ मार्च : ५६०११
सरासरी दर २४ वरून १९ हजारांवर
आंब्यांची आवक वाढत जाईल तसा दर कमी होत असून १६ मार्च ते २७ मार्च दरम्यान घाऊक बाजारात क्विंटलमागे सहा ते सात हजारांनी दर उतरला आहे. त्यामुळे १५०० ते २००० रुपये डझन असलेला आंबा आता ६०० ते ७०० रुपयांपासून १२०० ते १५०० रुपयांपर्यंत मिळत आहे.
यंदा मार्चमधील आवक अपेक्षेपेक्षा वाढली आहे. मात्र, एप्रिल महिन्यात आंबा आवक कमी राहील. वातावरण बदलामुळे मोहर गळाल्याने फळधारणा झाली नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे एप्रिल आणि मेच्या पहिल्या आठवड्यात आंबा कमी राहील.
- संजय पानसरे, आंबा व्यापारी.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.