
Jalgaon News : शेतकऱ्यांकडील कापूससाठा संपताच दरवाढीची चाल दिसत आहे. यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. मागील वेळेसही ९५ टक्के शेतकऱ्यांच्या कापसाची सरासरी आठ हजार रुपये प्रतिक्विंटल या दरात खरेदी झाली आणि दरवाढ झाली. अर्थात या दरवाढीचा लाभ कापूसगाठींचे निर्माते, व्यापारी यांनाच अधिक होत असल्याचे दिसत आहे.
सरत्या हंगामात (२०२२-२३) कापसाचे उत्पादन जगभरात कमी आहे. जगात २५ दशलक्ष टनांच्या उत्पादनाचा अंदाज होता. परंतु उत्पादन सुमारे २३ दशलक्ष टन एवढे हाती येईल, असे दिसते. याबाबतचे आकडे सप्टेंबर २०२३ अखेर समोर येतील.
परंतु भारत, अमेरिका या प्रमुख कापूस उत्पादक देशांत कापसाचे उत्पादन घटले आहे. उत्पादनाचे या देशांमधील सर्व अंदाज चुकले आहेत. अमेरिकेत तब्बल ३० ते ३५ लाख गाठींचे (एक गाठ १७० किलो रुई) उत्पादन कमी आले. तेथे २५० ते २५२ लाख गाठींच्या उत्पादनाचा अंदाज होता.
भारतातही सुरुवातीला ४००, ३६५ (हंगामाच्या मध्यात), ३५० लाख कापूस गाठींच्या उत्पादनाचा अंदाज होता. परंतु उत्पादन ३१० लाख गाठी एवढेच हाती येताना दिसत आहे, असे विविध संघटना आता सांगत आहेत.
कापूस उत्पादन घटेल, याचा अंदाज सर्वप्रथम शेतकऱ्यांनाच आला. काही जाणकार, अभ्यासू शेतकऱ्यांच्या मते देशात ३०० लाख गाठींचेही उत्पादन प्रत्येकी मागील व या हंगामात झालेले नाही. असे असताना कापसाचा बाजार अगदी जुलैच्या अखेरपर्यंत देशात दबावात होता.
वस्त्रोद्योग लॉबीने तर सुरुवातीपासून कापूस दरवाढ रोखण्यासाठी प्रयत्न केले. अगदी जूनमध्येही या लॉबीने बंद पाळला होता. आता देशातील शेतकऱ्यांकडे पाच टक्के कापसाचादेखील साठा नाही. शिवाय उत्पादन घटल्याचेही खरेदीदारांना दिसत आहे.
याच वेळी या काळात (जुलैअखेर व ऑगस्टच्या मध्यापर्यंत) कापसाची आवक पाकिस्तान, अमेरिका, चीन या देशांमध्ये कमी असते. तेथे ऑगस्टच्या दुसऱ्या पंधरवड्यात कापूस वेचणीला वेग येतो.
यातच अमेरिका, भारत या प्रमुख कापूस उत्पादक देशांत कापूस लागवडीत मोठी घट झाली आहे. या सर्व बाबी कापूसगाठी निर्माते म्हणजेच जिनर्स व खरेदीदार, व्यापारी यांच्या पथ्यावर आता पडल्या आहेत.
दरवाढ बऱ्यापैकी दिसत आहे. पण ज्या शेतकऱ्यांनी जुलैअखेरपर्यंत कापूससाठा घरात दरांच्या अपेक्षेने केला होता. त्यांना पुन्हा पश्चाताप किंवा हतबल व्हावे लागले आहे. कारण सरकारने कापसाचे हमीभाव जाहीर केले, पण खरेदी जून, जुलैत सुरू नव्हती. मे ते जुलै या काळात कापसाचा सरासरी दर प्रतिक्विंटल ६५०० रुपये, असा खानदेश व उर्वरित भागात शेतकऱ्यांना मिळाला आहे.
काहींच्या कापसाची सरसकट (फरदड किंवा चौथ्या-पाचव्या वेचणीचा कापूस यासह) ६२०० रुपये प्रतिक्विंटल, या दरात खरेदी झाली. या शेतकऱ्यांचे मोठे वित्तीय नुकसान झाले. मागील वर्षीदेखील कमाल शेतकऱ्यांनी फेब्रुवारीअखेर कापसाची विक्री केली.
फक्त सात ते आठ टक्के शेतकऱ्यांचा कापूस मार्च व पुढे घरात साठविलेला होता. त्या वेळेसही कमाल शेतकऱ्यांना ६८००, ७०००, ७१०० व ८२५० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. पुढे दरवाढ होत गेली आणि कमाल दर १२ ते १३ हजार रुपये प्रतिक्विंटल, असे झाले. जूनमध्ये मोठी तेजी आली होती. पण यंदा जून, जुलैतही तेजी आली नाही.
कमी आवकेचे संकेत
देशातील बाजारात पुढे कापसाची आवक कमी राहील. शिवाय अमेरिकेतूनही अपेक्षित किंवा २२० लाख गाठींचे उत्पादनही येणार नाही, असे सध्या दिसत आहे. तेथे लागवड सुमारे चार ते साडेचार लाख हेक्टरने घटली आहे. भारतातही पीकस्थिती बरी नाही. गुलाबी बोंड अळीचा शिरकाव उत्तर भारतासह महाराष्ट्र, मध्य प्रदेशातील कापूस पिकात झाला आहे.
ऑगस्टअखेरीस उत्तर भारतात कापसाची बऱ्यापैकी आवक होत असते. कारण तेथे एप्रिलच्या सुरुवातीला किंवा एप्रिलच्या मध्यापर्यंत कापूस लागवड पूर्ण होते. तेथे पहिली वेचणी अनेकांनी केली आहे. परंतु पिकात नुकसान दिसत आहे. उत्तर भारतासह महाराष्ट्र, तेलंगणा, गुजरातमध्येही कापूस लागवड घटली आहे. यामुळे देशातील खरेदीदार, वस्त्रोद्योगातील मंडळी धास्तावली आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.