Nagar Sangli News : नगर येथील दादा पाटील शेळके बाजार समितीत गेल्या काही दिवसांपासून चिंचेची आवक वाढली आहे. सध्या दररोज दीड हजार क्विंटलपर्यंत आवक होत असून प्रतिक्विंटलला ८ हजारांपासून १२ हजारापर्यंत दर मिळत आहे. दरवर्षीच्या तुलनेत बाजारात चिंचेची आवकेत घट आहे, तर सांगलीतील तासगाव बाजार समितीत चिंचेला चांगला उठाव असून दर टिकून आहेत.
नगर येथील दादा पाटील बाजार समितीत जिल्ह्यासह नाशिक, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, बीड व अन्य भागातून चिंचेची आवक होते. येथून चिंचेची विविध राज्यांसह काही प्रमाणात परदेशातही विक्री केली जाते. नगर, मराठवाडा, सोलापूर आदी भागात बांधावर चिंचेच्या झाडांची संख्या अधिक असून त्यातून बऱ्यापैकी विनाखर्ची उत्पादन मिळत असल्याने अनेक शेतकरी कुटुंबाला त्याचा आर्थिक आधार मिळतो.
नगर बाजार समितीत फोडलेल्या चांगल्या दर्जाच्या चिंचेला प्रतिक्विंटल ८ हजार ते १२ हजार रुपये व सरासरी १० हजार रुपयांपर्यंत दर मिळत आहे. चिंच बोटकाची १५० क्विंटलपर्यंत आवक होत असून ३ हजार ते ३ हजार ३०० रुपये व सरासरी ३१५० रुपयांपर्यंत प्रतिक्विंटलला दर आहे.
चिंचोक्याची २५० क्विंटलपर्यंत आवक होत असून २४०० ते २४५० व सरासरी २४२५ रुपयांपर्यंत दर आहे. मागील महिनाभरात चिंच, चिंचोका व बोटूक चिंच यांची आवक कमी होती. त्यावेळी साधारण पंधरा हजारांपर्यंत चिंचेला दर होता. मात्र आता गेल्या पंधरा दिवसांपासून दर स्थिर आहे, असे बाजार समितीतून सांगण्यात आले.
नगर जिल्ह्यासह राज्यातील बहुतांश भागात गतवर्षी पावसाळ्यात पुरेसा पाऊस झाला नाही. उन्हाची तीव्रता आणि सातत्याने होणाऱ्या वातावरणातील बदलाचा परिणाम चिंचेच्या उत्पादनावर झाला आहे. यंदा दरवर्षीच्या तुलनेत पंचवीस ते तीस टक्के उत्पादनात घट झाली आहे.
सांगलीतील तासगावात अनघड चिंचेला प्रतिक्विंटल १९०० ते २००० रुपये दर आहे. येत्या पंधरा ते वीस दिवसांत आवक कमी होण्याची शक्यता आहे. एक नंबर प्रतीच्या चिंचेला ८ ते ९ हजार तर दोन नंबरला ७५०० ते ८ हजार रुपये दर आहे.
तासगावात हंगाम महिनाभर उशिरा
तासगाव बाजार समितीत मार्च महिन्यात सुमारे ६०० ते ७०० पोत्यांची (एक पोते ५० किलोचे) विक्री झाली आहे. हंगाम सुरु झाल्यापासून चिंचेचे दर टिकून असून दरात फारशी तेजी येण्याची शक्यता नसल्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला. बाजार समितीत दर बुधवारी चिंचेचे सौदे होतात.
बुधवारी (ता. ३) सुमारे २०० पोत्यांची आवक झाली होती. बाजार चिंचेचा हंगाम जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात सुरू होतो. तो सुमारे चार महिने चालतो. मात्र, यंदा कमी पाऊस झाल्याने फळ धारणा होण्यास उशीर झाला. त्यामुळे यंदा चिंच विक्रीचा हंगाम एक महिना उशिरा सुरू झाला आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.