
अनिल जाधव
Turmeric Bazar : पुणेः सध्या हळदीच्या बाजारात मोठी तेजी आली. हळदीचे भाव एकाच महिन्यात जवळपास दुप्पट झाले. आता नव्या लागवडी संपल्या. पण यंदा हळदीच्या लागवडीत घट झाल्याचे अहवाल आहेत. त्यामुळे हळदीच्या भावातील तेजी पुढील काळातही टिकून राहू शकते, असे अभ्यासकांनी सांगितले.
हळदीचा बाजार गेली दोन वर्षे मंदीत होता. कोरोना काळात भाव वाढल्यानंतर शेतकऱ्यांनी लागवडी काहीशा वाढवल्या होत्या. पण नंतरच्या काळात हळदीचे भाव नरमले. हळदीला सलग दोन वर्षे भाव कमी मिळाला होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी २०२२-२३ च्या हंगामात हळद लागवड कमी केली. तसचं हळद पिकाला काढणीच्या काळात पावसाचा फटका बसला होता. महाराष्ट्र, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातील हळद उत्पादक भागात मार्च आणि एप्रिलमध्ये फटका बसला. तसच बदलत्या वातावरणामुळेही उत्पादनात घट आली.
देशात २०२१-२२ च्या हंगामात १२ लाख २३ हजार टन हळद उत्पादन झाले होते. गेल्या हंगामात हळद उत्पादनात वाढ झाली होती. पण बाजारभाव दबावात आल्याने चालू हंगामात शेतकऱ्यानी लागवडी कमी केल्या. त्यामुळे २०२२-२३ च्या हंगामात देशात ११ लाख ६१ हजार टन हळद उत्पादन झाल्याचे मसाला बोर्डाने म्हटले आहे. म्हणजेच चालू हंगामात देशातील हळद उत्पादन ४ टक्क्यांनी कमी झाले. देशात हळद उत्पादनात अग्रेसर असलेल्या महाराष्ट्रातील उत्पादन गेल्यावर्षीपेक्षा ९० हजार टनांनी कमी होऊन २ लाख ७८ हजार टनांवर आले. तर तेलंगणातील उत्पादनात काहीशी वाढ झाली होती.
देशात चालू हंगामात उत्पादन कमी झाले तरी हळदीला भाव नव्हता. लागवड सुरु झाली तरी भाव दबावातच होते. परिणामी शेतकऱ्यांनी लागवड कमी केली. त्यातच जून महिन्यात पावसाने हळद उत्पादक भागांमध्ये दडी दिली. लागवडीयोग्य पाऊस नसल्याने लागवडी खोळंबल्या होत्या. महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटक, तमिळनाडू या राज्यांमध्ये लागवड यंदा उशीरा सुरु झाल्या. जून महिन्यापर्यंत हळद लागवड गेल्यावर्षीपेक्षा जवळपास ३० टक्क्यांनी कमी दिसत होती. पण जुलै महिन्यात भावात वाढ झाल्याने हळद लागवडीत वाढ झाल्याचे शेतकरी सांगत आहेत. पण तरीही हळद लागवड गेल्यावर्षीपेक्षा कमीच आहे.
महाराष्ट्रातील हळद लागवड १० ते २० टक्क्यांनी कमी झाल्याचे शेतकरी सांगत आहेत. महाराष्ट्रात मराठवाडा आणि विदर्भात हळदीचे क्षेत्र जास्त आहे. पण पाऊस लांबल्याने यंदा हळद लागडीवर परिणाम झाला. या भागातील लागवड २० ते ३० टक्क्यांपर्यंत घटल्याचे या भागातील शेतकऱ्यांनी सांगितले. तमिळनाडूतील लागवडही १० ते १५ टक्क्यांनी कमी झाली. तर आंध्र प्रदेश तसेच तेलंगणातील लागवड १८ ते २० टक्क्यांनी घटण्याचा अंदाज आहे.
लागवडीची स्थिती
देशातून हळद लागवडही गेल्यावर्षापासून वाढलेली दिसते. भारतातून २०२१-२२ मध्ये १ लाख ३७ हजार टनांची निर्यात झाली होती. आधीच्या हंगामाच्या तुलनेत ही निर्यात जवळपास २७ टक्क्यांनी कमी होती. पण २०२२-२३ मध्ये निर्यातीत मोठी वाढ झाली. या वर्षात निर्यात १ लाख ७० हजार टनांवर पोचल्याचे सरकारी आकडेवारीवरून स्पष्ट होते. म्हणजेच नुकत्याच सरलेल्या आर्थिक वर्षात निर्यातीत २४ टक्क्यांची वाढ झाली.
हळदीची निर्यात
चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या दोन महिन्यांमध्ये, म्हणजेच एप्रिल आणि मे महिन्यातील निर्यात गेल्यावर्षी याच काळात झालेल्या निर्यातीच्या तुलनेत २७ टक्क्यांनी जास्त आहे. या दोन महिन्यांमध्ये ४० हजार टनांची निर्यात झाली. जून आणि जुलै महिन्यातही निर्यातीला चांगली मागणी होती. त्यामुळे या दोन्ही महिन्यांमध्ये निर्यात चांगली झाली. सध्या भारतातून सर्वाधिक निर्यात बांगलादेशला सुरु आहे. बांगलादेशला होण्याऱ्या निर्यातीत जवळपास दुप्पट वाढ झाली. तर मोरोक्काला होणारी निर्यातही १४ टक्क्यांनी वाढली. विशेष म्हणजे यंदा चीनकडूनही मागणी वाढलेली दिसते. चीनला होणारी निर्यात तुलनेत कमी असली तरी निर्यातीतील वाढ दुपटीपेक्षा अधिक आहे. युएई आणि अमेरिकेकडूनही भारतातून निर्यात सुरु आहे.
दराची स्थिती
देशातील घटलेले उत्पादन आणि वाढलेली निर्यात यामुळे हळदीच्या भावात चांगलीच वाढ झाली. हळदीचे भाव अगदी जूनमध्येही बाजार समित्यांमध्ये ६ हजार ते ६ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान होते. तर वायद्यांमधील भाव ७ हजार ते ७ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान होते. पण जुलैमध्ये हळदीच्या दरात चांगलीच तेजी आली. एकट्या जुलै महिन्यात हळदीचे भाव जवळपास दुप्पट झाले. बाजार समित्यांमधील भाव आता १२ हजार ते १५ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. तर हळदीचे वायदे १५ हजार ते १८ हजार रुपयांच्या दरम्यान आहेत.
तेजी टिकेल का?
सध्या हळदीचे भाव तेजीत दिसतात. पण खरा प्रश्न हा आहे की हे भाव टिकतील का? हळदीच्या भावात पुढील काळातही तेजी टिकून राहू शकते, असा अंदाज आहे. कारण भारत जागतिक उत्पादनात अग्रेसर आहे. भारतात गेल्यावर्षी उत्पादन घटल्याने तसेच निर्यात वाढल्यामुळे शिल्लक स्टाॅक कमी आहे. त्यातच भाववाढीच्या अपेक्षेने शेतकरी आणि व्यापारी माल मागे ठवत आहेत. परिणामी पुढील पीक बाजारात येईपर्यंत हळदीचे भाव तेजीत राहू शकतात, असा अंदाज व्यक्त आहे. हळदीचे भाव १५ हजार रुपयांचाही टप्पा पुढील काही महिन्यांमध्ये पार करू शकतो, असा अंदाज जाणकार व्यक्त करत आहेत.
उत्पादनाचं काय?
पावसावरही हळदीची तेजी मोठ्या प्रमाणात अवलंबून राहील. हवामान विभागाने माॅन्सूनच्या दुसऱ्या टप्प्यात पाऊसमान सरासरी राहण्याचा अंदाज व्यक्त केला. पण एल निनोचे सावट कायम आहे. हळद पिकाला पुढच्या टप्प्यात पाणी कमी पडल्यास उत्पादनावरही परिणाम होऊ शकतो. यामुळे चालू हंगामातही हळद उत्पादन कमीच राहील, असा अंदाज शेतकऱ्यांसह बाजारातून व्यक्त केला जात आहे. हळदीच्या उत्पादनात किती घट होऊ शकते, याचा अंदाज आल्यानंतर दरातील तेजी मोठ्या प्रमाणात वाढू शकते, असाही अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.