भारताकडून कापसाची आयात (Import of cotton from India) करणाऱ्या बांगलादेश आणि व्हिएतनाम सारख्या देशांची वस्त्रोद्योग क्षेत्रामधील महत्वाकांक्षा आणि त्याला पूरक धोरणे पाहता पुढील काळात निर्यातीला चांगलाच वाव राहील, असे स्पष्ट दिसत आहे. तर अमेरिका (America) खंडामध्ये कापसाचे उत्पादन (Cotton Production) वाईट हवामान (Bad Weather) आणि सोयाबीनच्या स्पर्धेत मागे पडेल अशीही शक्यता व्यक्त केली जात आहे. हे सर्व घटक तेजीच्या अनुमानांना पूरक ठरत आहेत. परंतु तरीही बाजारावर लक्ष ठेऊन वेळोवेळी आपले निर्णय सावधपणे आणि भावना बाजूला ठेऊन घेता आले पाहिजेत.
मागील आठवड्यामध्ये आपण २०२१-२२ या आर्थिक वर्षांमध्ये केवळ गुंतवणुकीच्या दृष्टीने कमोडिटी मार्केटमधून (Market) किती परतावा मिळाला, याचा लेखाजोखा मांडला होता. त्यामध्ये कापसाने गाठलेला कळस आपण प्रामुख्याने बघितला. अर्थात त्याची कारणे, सध्याची परिस्थिती किंवा पुढे काय होईल, याबाबतची चर्चा केलेली नव्हती. सध्या जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये आणि कमोडिटी मार्केटमध्येसुद्धा रशिया-युक्रेन युद्धामुळे (Russia - Ukraine War) अनिश्चितता पसरली आहे. प्रमाणाबाहेर लांबलेल्या युद्धाचे दुष्परिणाम दिसू लागले आहेत आणि त्याचा दाह उंबरठ्यातून प्रत्येकाच्या घरात पोहोचला आहे. कमोडिटी मार्केटमध्ये आलेल्या बोचऱ्या तेजीमुळे महागाई शिगेला पोहोचली आहे.
संयुक्त राष्ट्रांच्या संस्थेने नुकताच जागतिक अन्न किंमतींचा निर्देशांक प्रसिध्द केला. मार्च महिन्याअखेर निर्देशांकाने सर्वात मोठी उडी मारून १९९० नंतरची विक्रमी पातळी गाठली आहे. अनेक देशांमध्ये अन्नासाठी वणवण सुरु झाली आहे. श्रीलंका, पाकिस्तानमधली परिस्थिती सर्वांना ठाऊकच आहे. भारतातही महागाईमुळे (Due to inflation) सामान्य ग्राहकांची पंचाईत झाली आहे. परंतु इतर अनेक देशांच्या मानाने अ-राजकीय दृष्टिकोनातून पाहिल्यास भारतातील परिस्थिती चांगलीच काबूत आहे. परंतु ग्राहकांच्या खरेदीक्षमतेमध्ये मोठी घट झाल्यामुळे अर्थव्यवस्थेतील एकंदर मागणीमध्ये यापुढील काळात घट दिसू लागेल. तसे सूतोवाच रिझर्व्ह बँकेसह (Reserve Bank) इतर अनेक संस्था, जाणकारांनी केले आहे. या गोष्टीकडे गांभीर्याने पाहावे लागेल.
या पार्श्वभूमीवर शेतीमाल बाजाराची (Market)पुढील वाटचाल कशी राहील, विशेषतः मागील वर्षामध्ये अकल्पितपणे १०० टक्के परतावा देणाऱ्या कापसाची हंगामाच्या उत्तरार्धातील वाटचाल कशी राहील याचा अंदाज घेणे कठीण आहे. म्हणून कापसाच्या क्षेत्रातील उपलब्ध माहिती तपासून त्या अनुषंगाने निर्णय घेणे योग्य ठरेल. ज्याप्रमाणे हंगामाच्या पूर्वार्धातील तेजीला मागणी-पुरवठ्यापलीकडील अनेक घटक कारणीभूत होते त्याचप्रमाणे उत्तरार्धात देखील वाटचाल अशाच अनेक घटकांवर अवलंबून राहील.
सर्वप्रथम टेक्निकल चार्ट काय म्हणतोय ते पाहू. केडिया ॲडव्हायझरी या कमोडिटी मार्केटमधील रिसर्च, (Market Research) ट्रेडिंग आणि ब्रोकिंग कंपनीच्या म्हणण्यानुसार आठवडा, पंधरवडा, मासिक आणि इतर विविध कालावधीमधील अमेरिकी कापूस वायद्यांच्या किंमतीचे पृथक्करण केल्यास कापसाच्या किंमतीने अजून मोठा पल्ला गाठणे शिल्लक आहे. अमेरिकन वायदा सध्या १३३ सेन्ट्सच्या दरम्यान बंद झाला आहे. विविध कालावधींमधील कल तपासला असता ही किंमत लवकरच १५३ सेन्ट्सवर जाण्यास वाव आहे. असे झाल्यास भारतात सध्या कापसाला मिळत असलेला १२,००० रुपये क्विंटल हा भाव १३,५०० रुपयांवर जाऊ शकेल. तर सप्टेंबरमध्ये हंगामाची अखेर होईपर्यंत अमेरिकी कापूस वायदे अल्प काळासाठी का होईना परंतु २०११ मधील २०० सेंट्स हा उच्चांक गाठण्याची शक्यता बळावली आहे, असे मत अजय केडीया यांनी व्यक्त केले आहे. अर्थात ही वाटचाल अनेक चढ-उतारांनी भरलेली असेल. तसेच जागतिक भू-राजकीय घटकांमध्ये मोठे बदल झाल्यास त्याचा परिणाम देखील या अंदाजांवर होईल. तरीही टेक्निकल्सचा कल तेजीकडे अधिक राहील, हे नक्की.
आता मुलभूत घटक (फंडामेंटल्स) पाहूया. मुळात भारतातील कापूस उत्पादन (Indian Cotton Production) अंदाज हे मागील सहा महिन्यात ३६० लाख गाठींवरून आता ३३० लाख गाठींवर आले. परंतु आवकीचे आकडे बघितले तर प्रत्यक्षात उत्पादन ३१०-३१५ लाख गाठी असावे, अशी शंका व्यक्त केली जाऊ लागली आहे. परंतु शेतकऱ्यांनी नक्की किती कापूस साठवणूक करून ठेवला आहे, याचा निश्चित अंदाज काढणे कुणालाच शक्य होत नाहीये. तरीही १२,००० रुपये दर असूनही पुरेसा कापूस बाजारात ( Cotton Market) येत नसल्यामुळे उत्पादनातच घट असावी, असे मानले जाऊ लागले आहे. या परिस्थितीत हंगामातील सहा महिने अजून बाकी असल्यामुळे कापूस टंचाई पुढील काळात वाढतच जाणार हे नक्की.
विविध देशांतर्गत संस्थांच्या अनुमानांमध्ये कापसाचा वर्षाअखेरीस शिल्लक साठा (कॅरी ओव्हर स्टॉक) कमी केला जात आहे. त्याचप्रमाणे देशांतर्गत मागणी चांगली राहील, असे म्हटले आहे. परंतु नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अमेरिकी कृषी संस्थेच्या अहवालानुसार भारतातील निर्यात अनुमान घटण्यात आले असून शिल्लक साठ्यामध्ये त्या प्रमाणात वाढ केली गेली आहे. मुख्य म्हणजे चीनची मागणी कमी करून तेथील शिल्लक साठ्याच्या अनुमानात देखील वाढ दाखवली गेली आहे. कदाचित त्यामुळेच मागील आठवड्यात कापूस (Cotton) अमेरिकी वायदेबाजारात नरम राहिला असावा. या व्यतिरिक्त चालू हंगामाबाबत बाजारविषयक आकडेवारी सर्वांनाच बऱ्यापैकी ज्ञात आहे. त्याचे प्रतिबिंब बाजारात यापूर्वीच पडले आहे. तेव्हा पुढील किंमतींचा अंदाज घेण्यासाठी पुढील हंगामाबाबत काय होऊ शकेल, हे पाहणे महत्वाचे ठरेल.
यामध्ये युद्ध केव्हा समाप्त होते, आणि त्यातून काय निष्पन्न होते हे तितकेच महत्वाचे आहे. एक विसरून चालणार नाही कोरोनानंतर कमोडिटी बाजारात मोठ्या प्रमाणात आलेली तेजी ही प्रामुख्याने युद्धपूर्व तणाव आणि त्यामुळे नैसर्गिक वायू व खनिज तेलाच्या (Natural gas and mineral oil) वाढलेल्या किंमती यामुळे आलेली होती. दुसरा महत्वाचा घटक म्हणजे पुढील हंगामात कापसाच्या लागवडीमध्ये अपेक्षित असलेली वाढ. सध्या सर्वत्र ही वाढ निदान २० टक्के असेल, असे म्हटले जात आहे. परंतु कापसाला यंदा सोयाबीन, (Soybean) इतर तेलबिया (Oil Seeds) आणि मका यांच्याशी मोठी स्पर्धा करावी लागेल, असे दिसत आहे. तसेच जून-जुलै मधील पाऊसमान महत्वाचे ठरणार आहे.
भारताकडून कापसाची आयात करणाऱ्या बांगलादेश (Bangladesh) आणि व्हिएतनाम सारख्या देशांची वस्त्रोद्योग क्षेत्रामधील महत्वाकांक्षा आणि त्याला पूरक धोरणे पाहता पुढील काळात निर्यातीला चांगलाच वाव राहील, असे स्पष्ट दिसत आहे. तर अमेरिका खंडामध्ये कापसाचे उत्पादन वाईट हवामान आणि सोयाबीनच्या स्पर्धेत मागे पडेल अशीही शक्यता व्यक्त केली जात आहे. हे सर्व घटक तेजीच्या अनुमानांना पूरक ठरत आहेत.
परंतु नाण्याची दुसरी बाजू दुर्लक्षित करून चालणार नाही. यामध्ये वर म्हटल्याप्रमाणे मुख्य घटक अर्थातच युद्ध. ते लगेच संपले आणि त्यानंतर कच्चे तेल आणि नैसर्गिक वायूच्या किंमतींमध्ये मोठी पडझड झाली तर बाजाराचा कल कधीही बदलू शकेल. खनिज तेल मंदीमध्ये आले तर पेट्रोकेमिकल्सच्या किंमती कमी होऊन कृत्रिम धाग्यांच्या किंमती मोठ्या प्रमाणात उतरतील. त्याचा दबाव नैसर्गिक धाग्यांवर जाणवतो, असे आपण यापूर्वी अनेकदा पाहिले आहे.
कापसाच्या (Cotton) मागणीबाबत बोलायचे तर अलीकडील काही अनुमाने असे दर्शवतात की होजिअरी आणि सुती धाग्यांच्या मागणीमध्ये शैथिल्य येऊ लागले आहे. तामिळनाडूमधील वस्त्रोद्योगाला श्रीलंकेतील परिस्थितीचा चटका बसू लागला आहे. त्यामुळे देखील ही मंदी असू शकेल. तर भारतातील कापूस तुलनेने महाग असल्यामुळे निर्यातीमध्ये स्थैर्य नाही. कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाच्या म्हणण्यानुसार सरकारी पातळीवर वस्त्रोद्योग विभागाशी संबंधित बैठकांचे सत्र सुरू आहे. कापूस आयातीवरचे शूल्क काढून टाकणे किंवा इतर पर्यायांचा वापर करून देशांतर्गत बाजारपेठेतील किंमती कमी करण्यासाठी सरकारी हस्तक्षेपाची मागणी वाढत आहे. अजूनपर्यंत सरकारी हस्तक्षेप झाला नसला तरी पुरवठा साखळी कृत्रिमपणे आटली असावी अशी शंका आल्यास व्यापारावर बंधने येणे अशक्य नाही.
सर्वात महत्वाचे म्हणजे अमेरिकी बाजारातील मोठे हेज फंड कापसातील (Cotton) आपली अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक कधी काढून घेतील याचा नेम नसतो. आपल्यापर्यंत त्याची माहिती येईपर्यंत किंमती मोठ्या प्रमाणात पडलेल्या असतात. सध्याच्या तेजीमध्ये या फंडांचा मोठा हातभार लागलेला असतो. तसेच काही बहुराष्ट्रीय कंपन्या आपल्याकडील साठा ज्या देशांत किंमती चढ्या असतात तेथे विकतात आणि ज्या देशांत किंमती उतरलेल्या असतात, तेथे खरेदी करतात. म्हणजे कंपनीच्या जागतिक साठ्यामध्ये काही बदल न होता किंमतीतील फरकामुळे त्यांना करोडो रुपयांचा फायदा कमावता येतो. याला आर्बिट्राज ट्रेडिंग म्हणतात. या ट्रेडिंगचा देखील बाजारातील (Market) चढ-उतारांवर मोठा परिणाम होत असतो. सर्वात शेवटी हवामान. त्याबद्दलचे मानवी अंदाज किती चुकू शकतात हे आपण मागील हंगामात पाहिलेच आहे. तेव्हा या बाबतीत निसर्गापुढे नतमस्तक होणेच योग्य.
वरील सर्व गोष्टी लक्षात घेतल्या तर असे कळून येईल की, कापसातील मुख्य कल अजूनही तेजीचा दिसत असला तरी बाजारावर लक्ष ठेऊन वेळोवेळी आपले निर्णय सावधपणे आणि भावना बाजूला ठेऊन घेता आले पाहिजेत.
(लेखक कृषी व्यापार व कमोडिटी मार्केटचे अभ्यासक, स्तंभलेखक आहेत.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.