अनिल जाधव
पुणेः देशातील काही बाजारांमध्ये नव्या हरभऱ्याची आवक (Chana Arrival) सुरु झाली. ताज्या आकडेवारीनुसार देशातील हरभरा लागवड (Chana Sowing) काहीशी घटली.
उत्पादनही गेल्यावर्षीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. तरी नाफेडकडे (NAFED) हरभरा साठा आहे.
त्यामुळं सध्याची परिस्थिती पाहता हरभरा दर (Chana Rate) देशातील उत्पादन आणि नाफेडच्या खरेदीवर अवलंबून असतील, अशी माहीती जाणकारांनी दिली.
देशातील हरभरा पेरा गेल्यावर्षीपेक्षा १.५४ टक्क्यांनी घटली. देशात आत्तापर्यंत जवळपास १११ लाख हेक्टरवर हरभऱ्याचा पेरा झाला.
यंदा महाराष्ट्र हरभरा पेरणीत आघाडीवर आहे. देशातील जवळपास ६५ टक्के क्षेत्र महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि राजस्थान या तीन राज्यांमध्ये असते.
यापैकी महाराष्ट्रातील क्षेत्र सर्वाधिक २.५ लाख हेक्टरने वाढले. महराष्ट्रात आत्तापर्यंत २८ लाख ३० हजार हेक्टरवर हरभरा लागवड झाली.
जस्थानमधील क्षेत्र जवळपास एक लाख हेक्टरने वाढून २१ लाख ४३ हजार हेक्टरवर पोचलं. तर मध्य प्रदेशातील लागवड जवळपास ३ लाख हेक्टरनं घटून २२ लाख हेक्टरवर पोचली.
देशातील हरभरा लागवड दीड टक्क्यांनी घटली. तसच बदलत वातावरण आणि कीड-रोगांमुळं हरभरा उत्पादन कमी राहण्याचा अंदाज आहे.
यंदा उत्पादन घटण्याचा अंदाज असला तरी मागील हंगामातील शिल्लक साठाही अधिक दिसतो.
त्यामुळं सणासुदीतही हरभरा दर दबावात होते. शिल्लक हरभऱ्याचा दबाव चालू हंगामातही राहू शकतो. त्यामुळं यंदा हरभरा उत्पादन किती होतं त्यावर बाजार अवलंबून असेल.
देशातील काही बाजारांमध्ये नवा हरभरा दाखल होत आहे. पण सध्या थंडीचा काळ असल्यानं या हरभऱ्याला चांगला दर मिळत आहे.
त्यामुळं या हरभऱ्याला ४ हजार ६०० ते ४ हजार ९०० रुपयांच्या दरम्यान दर आहे. तर यंदा केंद्रानं हरभऱ्यासाठी ५ हजार ३३५ रुपये हमीभाव जाहीर केला. म्हणजेच सध्या हमीभावापेक्षा कमी दर आहेत.
एकूण पुरवठा कसा राहील?
यंदा देशातील हरभरा उत्पादन कमी होण्याचा अंदाज असला तरी एकूण पुरवठा मागणीपेक्षा जास्त राहू शकतो, असा अंदाज सध्यातरी व्यक्त केला जात आहे.
त्यामुळं यंदा हमीभाव खरेदीचा आधार मिळणं आवश्यक आहे. मागील हंगामात नाफेडनं जवळपास २२ लाख टन हरभरा खरेदी केला होता.
पण देशातील उत्पादनापैकी केवळ १६ टक्केच खरेदी नाफेडनं केली. त्याचा दबाव खुल्या बाजारातील दरावर आला होता.
नाफेडच्या खरेदीवर भीस्त
यंदाही नाफेडला हमीभावानं मोठी खरेदी करावी लागेल. नाफेडनं काही राज्यांमध्ये खरेदीची तयारही सुरु केली आहे. गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये पुढील काही दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या नोंदणीला सुरुवात होणार आहे.
नाफेड खरेदी उतरल्यास खुल्या बाजारातील दरालाही आधार मिळू शकतो. पण दराचं गणित बऱ्यापैकी उत्पादनाच्या आकड्यावर अवलंबून असेल.
उत्पादनाचं चित्र पुढील महिनाभरात स्पष्ट होईल. त्यावेळी खुल्या बाजारातील दराविषयी भाष्य करता येईल. पण सुरुवातीच्या काळात हमीभाव आणि नाफेडची खरेदी या भोवती बाजार फिरत राहील, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.