Cotton Rate Update : एप्रिल महिना संपत आला तरी शेतकऱ्यांना अपेक्षित भावपातळी झाली नाही. दरात सतत चढ उतार दिसत आहेत. दुसरीकडे उद्योग पूर्ण क्षमतेने सुरु आहेत. देशाचा कापूस वापरही वाढला. पण तरीही देशातील बाजारात कापसाचे भाव दबावात आहेत. बाजारातील कापूस आवक आणि उत्पादनाबाबतचे विविध अंदाज याचा बाजारावर दबाव असल्याचं सांगितलं जातं.
देशातील बाजारात सध्या कापसाचे भाव दबावात आहेत. एप्रिलच्या मध्यानंतर बाजारातील आवक कमी होईल, असा अंदाज होता. पण आवकेची गती कायम आहे.
एप्रिल महिन्यात बाजारातील कापूस आवक दैनंदीन १ लाख २० हजार ते १ लाख ४० हजार गाठींच्या दरम्यान राहीली. आवक अंदाजापेक्षा जास्त होत असल्याने बाजारावर दबाव आहे. फेब्रुवारीपासून बाजारावर कापूस आवकेचा दबाव असून तो आजही कायम दिसतो.
देशात यंदा नेमकं किती कापूस उत्पादन झालं, याबाबतही विविध चर्चा आहेत. शेतकऱ्यांनी सांगितल्याप्रमाणं यंदा उत्पादनात मोठी घट झाली. काॅटन असोसिएशन ऑफ इंडियानेही कापूस उत्पादनात गेल्यावर्षीपेक्षा यंदा घट झाल्याचं स्पष्ट केलं.
सीएआयचा अंदाज ३०३ लाख गाठींचा आहे. सीएआय आणि शेतकरी यांचा अंदाज काहीसा जुळतो. पण कापूस उत्पादन आणि वापर समिती म्हणजेच सीसीपीसीने यंदा ३३७ लाख गाठी उत्पादन झाल्याचं म्हटलं.
त्याप्रमाणं काही बहुराष्ट्रीय कंपन्यांनीही यंदाचं उत्पादन ३३५ ते ३४० लाख गाठींच्या दरम्यान असल्याचं सांगितलं. कापूस उत्पादनाच्या अंदाजाबाबत मतभिन्नता दिसते. याचाही बाऊ केला जातोय.
दुसरीकडे सुताला मागणी नसल्याचं सुतगिरण्यांकडून सांगण्यात येत आहे. कापडाला उठाव नसल्याने कापड उद्योगांकडून सुताला मागणी नाही. परिणामी दर दबावात असल्याचं उद्योगांकडून सांगण्यात येत. पण सध्या देशातील उद्योग नफ्यात काम करत असल्याचं स्पष्ट आहे.
उद्योगांची संघटना आणि काही उद्योगांकडूनही याची पुष्टी करण्यात आली. पण शेतकऱ्यांचा कापूस बाजारात येईपर्यंत दरावर दबाव काय ठेवायचा हा प्रयत्न दिसतो, असं काही जाणकारांनी सांगितलं.
सध्या देशातील बाजारात कापसाला सरासरी ७ हजार ७०० ते ८ हजार २०० रुपये भाव मिळतोय. किमान भाव ७ हजार रुपयांचपासून सुरु होतो. फरदरड कापसालाचे भाव यापेक्षाही कमी आहेत. तर जास्त लांब धाग्याच्या कापसाला सर्वाधिक भाव मिळतो.
देशातील कापसाचे भाव दबावात राहण्यासारखी परिस्थिती नाही. त्यामुळं बाजारातील आवक आणखी मर्यादीत झाल्यास दरात सुधारणा दिसू शकते, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.