
Chana Rate : हरभरा दरात तेजीची शक्यता दिसते. पण आद्यापर तेजी येईल की नाही याबाबत बाजारात स्पष्ट कुणीच बोलत नाही. हरभरा आणि मसूर वगळता तूर, मूग आणि उडदाचे दर तेजीत आहेत. तूर, मूग आणि उडदाच्या उत्पादनात यंदा मोठी घट झाली. यामुळे दरही चांगले आहेत.
तुरीचे भाव तर हंगामाच्या आधीपासूनच तेजीत आले. पण देशातील महत्वाचं रब्बी कडधान्य पीक असलेल्या हरभऱ्याकडून आतापर्यंत शेतकऱ्यांची निराशाच झाली.
हरभरा दरात वाढ होण्यासाठी काही फंडामेंटल्स आहेत. पण दर सुरुवातीपासूनच दबावात आहेत. यंदा हरभरा उत्पादनातही २० टक्क्यांपर्यंत घट झाल्याचं शेतकरी सांगतात. तर नाफेडची खरेदी वेगाने सुरु आहे.
तूर, मूग आणि उडदाचे भाव तेजीत आहेत. या कारणांमुळं हरभरा बाजारभाव वाढायला हवेत. अगदी एप्रिल मध्यापर्यंत हरभराही यंदा भाव खाईल, काही दिवसांमध्ये खुल्या बाजारातील दरही वाढतील, असा अंदाज बाजार विश्लेषक व्यक्त करत होते. पण तसं झालं नाही.
हरभरा भाव दबावात राहण्यासाठी एकच कारण आहे. ते म्हणजे सरकार. कोरोनानंतर फक्त भारतातच नाही तर जगभरात महागाईचा आगडोंब उसळला.
काही देशांमधील दुष्काळ, रशिया-युक्रेन युध्दामुळे विस्कळीत झालेली पुरवठा साखळी, वाढलेला वाहतूक खर्चामुळे सर्वच वस्तुंचे भाव वाढले.
यातून अन्नधान्यही सुटले नाही. पण पुढील काळात काही राज्यांच्या आणि लोकसभेच्या निवडणुका आहेत. निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन सरकार शेतकमालाचे भाव पाडण्याचे काम करत आहे.
सरकारच मोठा स्टाॅकिस्ट
सरकारने गरज नसताना तुरीसोबत हरभरा व्यापारी, स्टाॅकिस्ट आणि प्रक्रियादारांना वेठीस धरलं. नाफेडकडे मागील हंगामातील १५ लाख टन हरभरा शिल्लक आहे. तर चालू हंगामात आतापर्यंत १७ लाख टनांची खरेदी केली.
म्हणजेच सरकारकडे हरभऱ्याचा ३२ लाख टनांचा स्टाॅक आहे. त्यामुळं बाजारावर दबाव टाकण्याची गरज नव्हती. पण हरभऱ्याला हाताशी धरून इतरही डाळींचे भाव कमी करण्याचा सरकारचा विचार आहे.
सरकारच्या या भुमिकेमुळेच हरभरा बाजारावर दबाव आहे. हरभऱ्याची कमी दरात खेरदी केली जात आहे. कारण स्टाॅक केला आणि सरकारने कोणता निर्णय घेतला तर काय होईल, अशी भीती असल्याचं व्यापारी आणि प्रक्रियादारांनी सांगितले.
भविष्य अनिश्चित
पण बाजारात पुढील काळात काहीही होऊ शकते. सध्या हरभरा उत्पादन विक्रमी पातळीवर असल्याचा अंदाज गृहित धरला जात आहे. पण शेतकरी सांगतात त्या प्रमाणे उत्पादनाचे अंदाज कमी झाले तर बाजार बदलू शकतो.
माॅन्सूनचा पाऊस कसा होतो यावरही हरभरा बाजार अवलंबून राहील. तसेच इतर डाळींच्या दरातील तेजी वाढल्याचाही आधार हरभऱ्याला मिळू शकतो, असे हरभरा बाजारातील व्यापारी आणि विश्लेषकांनी सांगितले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.