देशातील कापूस हंगाम (Cotton Season) आता सुरू झाला आहे. यंदा लागवड (Cotton Sowing) रखडल्याने बाजारात मालही (Cotton Market) उशिरा येईल. मात्र जागतिक महागाई (International Inflation)आणि मंदीच्या (Recession) सावटामुळे कापड बाजारात (Textile Market) उठाव कमी असल्याची चर्चा आहे. परिणामी, कापूस बाजारात सध्या नरमाई दिसतेय. अमेरिका आणि युरोपियन युनियनसह (European Union) महत्त्वाच्या अर्थव्यवस्था (International Economy) संकटात आहेत.
पण यापैकी बहुतेक बाजारपेठा आता सुधारणेच्या वळणार आहेत. त्यातच अमेरिका आणि पाकिस्तानमध्ये यंदा कापूस उत्पादन घटले आहे. चीनमध्येही हीच परिस्थिती आहे. याचा भारताला लाभ मिळेल का? कापूस उत्पादन आणि कापड बाजाराशी संबंधित महत्त्वाच्या देशांचा घेतलेला हा आढावा
जगातील महत्त्वाच्या बाजारपेठा असलेल्या अर्थव्यवस्था सध्या महागाईच्या झळा सोसत आहेत. अनेक देशांमध्ये महागाईने मागील ४० वर्षांतील उच्चांक गाठला आहे. यात अमेरिका, युरोपियन युनियनमधील देश, चीन, भारत, ऑस्ट्रेलिया आदी प्रमुख देशांचा समावेश होतो. महागाई वाढल्यानं लोक अत्यावश्यक वस्तू म्हणजेच अन्नधान्य, आरोग्य आणि शिक्षणावर खर्च करण्याला प्राधान्य देत आहेत.
मात्र जगात अन्नधान्यासह अत्यावश्यक सेवा महागल्यानं दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी नागरिकांना आपल्या उत्पन्नातील मोठा वाटा खर्च करावा लागत आहे. महागाईला आळा घालण्यासाठी बहुतेक देशांच्या केंद्रीय बॅंकांनी व्याजदर वाढवले. त्यामुळं लोकांचे कर्जाच्या व्याजाचे हप्तेही वाढले. परिणामी, लोकांना इतर वस्तूंवर खर्च कमी करावा लागत आहे. याचा फटका कापड उद्योगाला बसतोय.
मागील काही महिन्यांपासून जागतिक कापड बाजार मंदीत आहे. कपड्यांना मागणी कमी झाल्याने जगातील मोठ्या कापड गिरण्यांकडे साठा पडून आहे. या गिरण्या आणि व्यापारी संस्था बाजारातून मागणी वाढण्याची वाट पाहत आहेत.
सध्या जागतिक पातळीवर कपड्यांना मागणी कमी असल्याने पर्यायाने सूत आणि कापसाची मागणी कमी झालेली दिसते.कापड बाजाराचा विचार करता मागील दोन महिन्यांमध्ये काही देशांमध्ये काहीशी सुधारणा दिसून आली. मात्र अनेक देशांमध्ये स्थिती काळजी करण्यासारखी आहे.
अनेक देशांमध्ये जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्यांमध्ये कापड व्यवसाय मंदावलेलाच राहिला.मात्र आता कपड्यांची मागणी काहीशी वाढली आहे. जुलै महिन्यातील व्यवसाय मागील २६ महिन्यांतील नीचांकी पातळीवर होता. त्यात ऑगस्ट महिन्यात काहीशी वाढ नोंदवण्यात आली. मात्र अपेक्षेप्रमाणे वाढ नसल्याचं अनेक अहवालांमधून स्पष्ट झालं आहे.
पर्चेसिंग मॅनेजर्स इंडेक्स काय सांगतो?
ग्लोबल मॅन्युफॅक्चरिंग पर्चेसिंग मॅनेजर्स इंडेक्स (पीएमआय) विचार करता ऑगस्ट महिन्यात घट झालेली दिसते. उत्पादन क्षेत्राची सध्याची आर्थिक स्थिती आणि दिशा ‘पीएमआय’मधून कळते. कापड उद्योगाचा ‘पीएमआय’ काढताना नवीन मागणी, कपड्यांचा साठा, उत्पादन,
पुरवठादारांकडून होणारे कपड्यांचे वितरण आणि उद्योगातील रोजगाराचा विचार केला जातो.‘पीएमआय’ ५० पेक्षा कमी असल्यास उद्योगाची वाढ घटल्याचं मानलं जातं. तर इंडेक्स ५० पेक्षा जास्त असल्यास तो वाढीचा ट्रेंड मानला जातो. ऑगस्ट महिन्यात ३० देशांचा सर्व्हे करण्यात आला.
त्यापैकी केवळ १० देशांमध्ये वाढीचा कल दिसून आला. त्यात चीन, ब्राझील, स्पेन, भारत आणि ऑस्ट्रेलियाचा समावेश आहे. मात्र जगातील महत्त्वाच्या अर्थव्यवस्था असलेल्या अमेरिका, युरोपियन युनियनमधील देश, जपान आणि इंग्लंडमध्ये कापड उद्योगाची वाढ आक्रसलेली दिसते. निर्यातीसाठी कपड्यांना मागणी कमी असल्याने या देशांमधील कापड उत्पादन घटलंय. फक्त भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये कापड उत्पादनात वाढ झालेली आहे.
कापड उत्पादन वाढलेले देश
- चीन - ब्राझील - स्पेन - भारत - ऑस्ट्रेलिया
कापड उत्पादन घटलेले देश
- अमेरिका - युरोपियन युनियन - जपान - इग्लंड
अमेरिकेतील स्थिती काय?
अमेरिका सध्या ऐतिहासिक महागाईला तोंड देत आहे. तसचं अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेबाबत धोक्याचा इशारा देण्यात येत आहे. अनेक जाणकारांनी अमेरिकेत मंदीची शक्यताही वर्तवली आहे. त्यामुळे अमेरिकेतील कापड बाजारही मंदीच्या छायेत आहे. मोठ्या ब्रॅंड्सकडून मागणी आणि खरेदीचे करार घटले आहेत. मात्र आता स्थिती काहीशी सुधारली असून,
अमेरिकेच्या बाजारातून कपड्यांसाठी विचारणा वाढली आहे. मात्र त्याचं खरेदीत रुपांतर होणं हे मोठं आव्हान आहे. जुलैमध्ये अमेरिकेचा ‘पीएमआय' ५२.२ होता, तो ऑगस्ट महिन्यात ५१.५ पर्यंत कमी झाला. यातून अमेरिकेतून कापड व्यवसायाची स्थिती लक्षात येते. त्यातच कापड उद्योगांना पुरवठा साखळीतील अडथळ्यांमुळे कच्चा मालाचा तुटवडा आणि माल पोहोचविण्यास उशीर होत आहे.
त्यातच वाहतूक, इंधन आणि कच्च्या मालाचे दर वाढले आहेत. परिणामी, कपड्यांचेही दर वाढले आहेत. त्याचा परिणाम मागणीवर होत आहे. अमेरिकेत एप्रिल महिन्यात कपड्यांना मागणी वाढली होती. पण त्यानंतर मागणीत पुन्हा घट होत गेली.
ती ऑगस्ट महिन्यापर्यंत कायम आहे. मात्र सध्या अमेरिकेतील बाजारात सुधारणा दिसत असल्याचं काही संस्थांचं म्हणणं आहे. पुढील काळात सणांच्या पार्श्वभूमीवर कापड बाजार उभारी घेऊ शकतो.
युरोपियन युनियनमधील स्थिती
युरोपियन युनियनमधील देशांमध्येही कपड्यांना नवीन मागणी कमी आहे. येथील कापड उद्योग आणि व्यवसाय मंदीच्या छायेत आहेत. या देशांमध्ये महागाई उच्चांकी पातळीवर असल्याने ग्राहकांची खरेदीशक्ती कमी झाल्याचे अनेक अहवालांमधून स्पष्ट झाले आहे.
पण नव्या खरेदीसाठी विचारणा वाढल्याचे काही व्यावसायिकांनी वृत्तसंस्थांना सांगितले. रशिया आणि युक्रेनमधील युद्धामुळे युरोपियन युनियनला महागाईचा मोठा फटका बसत आहे. युद्धामुळे कच्च्या मालाच्या आणि इंधनाच्या किमती वाढल्या. पुरवठा साखळी विस्कळीत झाली आणि अर्थव्यवस्थेबाबत अनिश्चितता वाढली. त्याचा थेट परिणाम कापड बाजारावर होतो आहे.
ऑगस्ट महिन्यात युरोपियन युनियनमधील देशांमध्ये सलग तिसऱ्या महिन्यात कपड्यांची मागणी घटली होती. कच्च्या मालाचा तुटवडा असल्याने उत्पादनावरही परिणाम झाला होता. तर आयात आणि निर्यातीचेही करार कमी झाले. बाजारात मागणी नसल्याने तयार कपड्यांचाही साठाही वाढत आहे. मात्र मागील काही दिवसांमध्ये काही देशांतील स्थिती सुधारतेय.
यात नेदरलॅंडमधील कापड मागणी वाढलेली दिसते. त्यानंतर आयर्लंड, फ्रान्स, स्पेन, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, ग्रीस आणि इटलीमध्येही स्थिती सुधारली आहे. कच्च्या मालाच्या किमतीही सध्या नरमल्या आहेत. त्यामुळे पुढील काळात येथील कापड मार्केट पूर्वपदावर येण्याच्या दिशेने वाटचाल करू शकतो, असे जाणकारांचे मत आहे.
भारतातील कापड उद्योग वाढीच्या दिशेने
भारतात मे महिन्यापर्यंत नवीन कापड उत्पादन, खरेदी आणि निर्यात नीचांकी पातळीवर पोहोचली होती. मात्र जुलै महिन्यापासून त्यात वाढ झाली. देशातील कापड उद्योगाला नव्या मालाच्या ऑर्डर्सही मिळत आहेत, असे ‘पीएमआय’मधून स्पष्ट होते. देशातील कापड उत्पादन दोन महिन्यांपासून वाढत आहे.
सध्या कापड उत्पादनाचं प्रमाण मागील नऊ महिन्यांतील उच्चांकी पातळीवर आहे. तर कापड खरेदीसाठी होणारी विचारणाही वाढली आहे, असे कापड उद्योगातील सूत्रांनी सांगितलं. देशात सध्या सणांसाठी कपड्यांना मागणी वाढताना दिसत आहे.
ऑगस्ट महिन्यात देशातील कापड उद्योगाला मोठ्या प्रमाणात ऑर्डर्सही मिळाल्या. कापडाची विक्री वाढली आहे. विदेशातूनही मिल्सकडे मागणी येत आहे. त्यामुळे देशातील कापड उद्योग वेगाने उभारी घेत आहे.
देशातील कापड उद्योग पूर्वपदावर येण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. ही गोष्ट उद्योग आणि शेतकऱ्यांसाठीही समाधानाची आहे. देशातील कापसाचा नवा हंगाम आता सुरू झाला. देशातील अनेक बाजारांत नवा कापूसही दाखल होत आहे.
मात्र मागील काही महिन्यांपासून कापड उद्योग मागणी नसल्याच्या कारणाने अडचणीत असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र आता कापड उद्योगाला नव्या ऑर्डर्स मिळत असल्याने त्यांची सूत खरेदीही वाढणार आहे.
त्यामुळे सूतगिरण्यांचा कापूस वापर वाढेल. याचा थेट परिणाम कापसाच्या दरावरही होईल. परिणामी कापसाचे दर बाजारात टिकून राहण्यास मदत होईल.
चीनचा बाजार काय सांगतो?
चीनमधील कापड उद्योग आणि व्यवसाय अद्यापही संकटात आहे. अमेरिकेने जून महिन्यापासून चीनमधील शिनजियांग प्रांतात उत्पादित होणाऱ्या कापूस आणि कापूस उत्पादनांवर बंदी घातली. त्यामुळं चीन आपल्या या उत्पादनांसाठी बाजारपेठेचा शोध घेत आहे.
त्यातच चीनमध्ये ऑगस्ट महिन्यात वीज संकट, उष्णतेची लाट आणि मिल्स बंद करण्याचे संकट ओढावले होते. त्यातच चीनमध्ये कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. या सर्व परिस्थितीमुळे चीनमधील कापड उद्योग आणि व्यवसाय मंदीत आहे. चीनकडे कापडाची मागणीही कमी झाली. परिणामी निर्यात घटली आहे.
अमेरिका ही चीनच्या कपड्यांची मोठी बाजारपेठ होती. अमेरिकेने चीनमधून आयात बंद केली तरी आपली मागणी अमेरिकेला इतर देशांकडून पूर्ण करावी लागेल. चीन आपली उत्पादनं बांगलादेश आणि पाकिस्तानमार्गे जागतिक बाजारपेठेत विकत असतो. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात चीनच्या उत्पादनांनाही जागा मिळेल.
कापूस हंगामासाठी आशादायक स्थिती
जागतिक पातळीवर मागील काही महिन्यांपासून कापड बाजार आणि उद्योग अडचणीत होते. महागाई हे त्याचे मूळ कारण. मात्र आता भारतासह काही देशांमध्ये परिस्थिती सुधारत आहे. भारत आणि इतर महत्त्वाच्या बाजारपेठांमध्ये सणांमुळे मागणी वाढतेय.
पुढील महिनाभरात जागतिक कापड बाजार सुधारण्याची शक्यता व्यक्त होत आहे. याचा फायदा भारतीय कापसाला होऊ शकतो. यंदा अमेरिका आणि पाकिस्तानमध्ये उत्पादन घटलं आहे. चीनमध्येही अतिउष्णतेमुळे उत्पादन कमी झालं आहे. त्यामुळे वाढलेली मागणी भारताच्या पथ्यावर पडण्याची शक्यता आहे.
यंदा देशात कापूस उत्पादन वाढेल, असं सांगितलं जात आहे. मात्र शेतकऱ्यांच्या मते उत्पादनात यंदाही घट आहे. कारण प्रतिकूल हवामानाचा पिकाला फटका बसलाय. परिणामी, गेल्या वर्षीच्या तुलनेत उत्पादनात वाढ होण्याची शक्यता नाही. देशातील कापूस बाजारात सध्या दर काहीसे नरमले असले,
तरी पुढील महिन्याच्या शेवटी बाजार सुधारणा दाखवेल. या हंगामात कापसामध्ये मंदी येण्याची शक्यता नाही, कापसाचे दर तुलनेने मजबूत राहतील, असा विश्लेषकांचा अंदाज आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांनी सध्याच्या तात्पुरत्या नरमाईचा किंवा उत्पादनवाढीच्या वावड्यांचा धसका घेऊ नये; तर बाजारातील भावपातळीवर नजर ठेवून टप्प्याटप्प्याने कापूस विक्रीचा निर्णय घ्यावा, असे आवाहन जाणकारांनी केलं आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.