
पुणे ः राज्यातील ऊस उत्पादक (Sugarcane Farmer) शेतकऱ्यांची दीड हजार कोटींची ‘एफआरपी’ (Sugarcane FRP) थकविणाऱ्या साखर कारखान्यांना तत्काळ पेमेंट देण्याची ताकीद देण्यात आली आहे. दुसऱ्या बाजूला पाच साखर कारखान्यांवर ‘आरआरसी’ (RRc To Sugar Mill) बजावण्यात आलेली आहे.
यंदा कारखान्यांनी शेतकऱ्यांकडून १३२२.३१ लाख टन ऊस खरेदी केला आहे. त्यापोटी तोडणी व वाहतूक खर्च वगळता ३२ हजार ८२ कोटी ६२ लाख रुपये इतकी रक्कम शेतकऱ्यांना द्यायला हवी होती. परंतु आतापर्यंत झालेले पेमेंट ३१ हजार ६८ कोटी ४९ लाख इतके आहे. ११० साखर कारखान्यांनी एफआरपीचे जवळपास दीड हजार कोटी अद्याप दिलेले नाहीत.
‘‘राज्याचा २०२१-२२ ऊसगाळप हंगाम आर्थिक उलाढालीच्या अंगाने ऐतिहासिक स्वरूपाचा ठरला आहे. आतापर्यंत २०० साखर कारखान्यांनी रास्त व किफायतशीर दरापोटी (एफआरपी) शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात ३१ हजार कोटी रुपये रुपये जमा केलेले आहेत. ही रक्कम आतापर्यंत सर्व विक्रम मोडणारी आहे. मात्र थकीत एक हजार ५३६ कोटी रुपयेदेखील शेतकऱ्यांना मिळावेत यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे,’’ अशी माहिती साखर आयुक्तालयाच्या सूत्रांनी दिली.
राज्यात पाच साखर कारखाने शेतकऱ्यांना एफआरपी देण्याची टाळाटाळ करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. पेमेंट न देण्यामागे विविध कारणे असली, तरी कायद्यानुसार साखर आयुक्तालयाने थेट आरआरसी बजावली आहे. साखर आयुक्तांनी एकदा महसूल वसुली प्रमाणपत्र (आरआरसी) बजावले की कारखान्यांची मालमत्ता विकून शेतकऱ्यांची थकबाकी देण्याचे अधिकार महसूल विभागाला मिळतात. आरआरसी प्रमाणपत्राच्या आधारे जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या तहसीलदारांना साखर कारखान्यांवर कारवाई करण्यास सांगितले आहे.
‘‘आम्ही पाच कारखान्यांवर आरआरसी बजावण्याची कारवाई एकदम केलेली नाही. वेळोवेळी या कारखान्यांना ताकीद देण्यात आलेली होती. कायदेशीर नोटिसा बजावून सुनावणी घेणे तसेच कारखान्यांची बाजू रीतसर ऐकून घेतल्यानंतर अंतिम कारवाई केली गेली आहे. सध्या राज्यातील ५५ कारखान्यांना आम्ही नोटिसा दिल्या आहेत. त्यामुळे एफआरपी वाटपाबाबत कारखाने गांभीर्याने नियोजन करतात,’’ असे आयुक्तालयाच्या सूत्रांनी स्पष्ट केले.
साखर आयुक्तालयाच्या म्हणण्यानुसार, इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रात एफआरपी वाटपाचा वेग सर्वाधिक व चांगला आहे. थकीत एफआरपी मिळवून देण्यासाठी पाठपुरावा सुरू असल्यामुळे पुढील गाळप हंगाम सुरू होण्याच्या आधीच बहुतेक ठिकाणी थकीत रकमा शेतकऱ्यांना मिळालेल्या असतील.
...असे झाले एफआरपीचे वाटप
- कारखान्यांनी खरेदी केलेला एकूण ऊस ः १३२२.३१ लाख टन
- खरेदीपोटी झालेली एफआरपीची रक्कम ः ४१९६६.१४ कोटी रुपये
- तोडणी व वाहतूक वगळून द्यावयाची रक्कम ः ३२०८२.६२ कोटी रुपये
- शेतकऱ्यांना आतापर्यंत दिलेली रक्कम ः ३१०६८.४९ कोटी रुपये
- अदा झालेल्या एफआरपीची आतापर्यंतची टक्केवारी ः ९६.८४ टक्के
- थकीत एफआरपीची रक्कम ः १५३६.१९ कोटी रुपये
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.