Soyameal Export : फेब्रुवारी, मार्चमध्ये ५ लाख टन सोयापेंड निर्यातीची शक्यता

सोयाबीन उत्पादन घटण्याचा अंदाज असल्याने अर्जेंटीनातील सोयापेंड उत्पादनही कमी राहील. त्यामुळे अर्जेंटीनाच्या सोयापेंडचे दर वाढले आहेत.
Soyameal Export
Soyameal ExportAgrowon
Published on
Updated on

Mumbai News : जगातील आघाडीच्या सोयापेंड निर्यातदार (Soya meal Export) अर्जेंटीनात दुष्काळी स्थिती आहे. दुष्काळामुळे अर्जेंटीनामधील सोयाबीन (Soybean) उत्पादन कमी राहण्याचा अंदाज असून सोयापेंडचे भाव वाढले आहेत.

त्यामुळे भारतीय सोयापेंड मागणी (Soya Meal Demand) वाढली असून फेब्रुवारी आणि मार्च महन्यात भारतातून ५ लाख टन सोयापेंड निर्यात होऊ शकते, असा अंदाज निर्यातदारांनी व्यक्त केला. राॅयटर्स या वृत्तसंस्थेने याबाबतचे वृत्त दिले आहे.

अर्जेंटीनातील सोयाबीन पिकाला यंदा दुष्काळाचा फटका बसला. हंगामाच्या सुरुवातीला अर्जेंटीनातील सोयाबीन उत्पादन ४८० लाख टनांवर पोचेल, असा अंदाज व्यक्त केला जात होता.

मात्र दुष्काळाची दाहकत वाढल्याने अर्जेंटीनातील उत्पादन ३८० लाख टनांवर स्थिरावेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

सोयाबीन उत्पादन घटण्याचा अंदाज असल्याने अर्जेंटीनातील सोयापेंड उत्पादनही कमी राहील. त्यामुळे अर्जेंटीनाच्या सोयापेंडचे दर वाढले आहेत.

Soyameal Export
Soybean Market: सोयापेंड निर्यात वाढल्याने सोयाबीनची खरेदीही वाढणार | Agrowon | ॲग्रोवन

परिणामी भारतीय सोयापेंड स्वस्त झाली. अर्जेंटीनातील सोयाबीन उत्पादनाचे अंदाज सतत कमी केले जात आहेत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोयापेंडच्या दराला आधार मिळत आहे, असे सोयापेंड निर्यातदाराने सांगितले.

सोयाबीन प्रोसेसर्स असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात सोपाच्या माहितीनुसार, देशातून ऑक्टोबर ते जानेवारी या चार महिन्यांमध्ये सोयापेंड निर्यात ६५ टक्क्यांनी वाढली आहे. सोयापेंड निर्यात ६ लाख ३१ हजार टनांवर पोचली. मागील संपूर्ण हंगामात देशातून ६ लाख ४४ हजार टन सोयापेंड निर्यात झाली होती.

सोयापेंड निर्यातीला मागणी वाढल्याने देशातील गाळपही वाढले आहे. त्यामुळे सोयातेलाची उपलब्धता वाढली. यामुळे भारताला सोयातेल आणि पामतेलाची आयात कमी करण्यास मदत होईल.

सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात सोयापेंंडचे दर तेजीत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील सोयापेंडचे हे दर टिकून राहील्यास भारतातून निर्यातीची गती कायम राहील.

यंदा भारत २० लाख टनांपेक्षाही जास्त सोयापेंड निर्यात करु शकतो, असा अंदाज इंदोर येथील एका निर्यातदाराने सांगितले. भारताने निर्यातीचा हा टप्पा गाठल्यास गेल्या हंगामाच्या तुलनेत तिप्पट निर्यात होईल.

सोयापेंडचे तुलनात्मक दर

भारताची सोयापेंड सध्या ब्राझील आणि अर्जेंटीनातील दरापेक्षा स्वस्त आहे. निर्यातासाठी भारतीय सोयापेंड ५८० ते ५८५ डाॅलर प्रतिटनाने मिळत आहे.

तर अर्जेंटीनाची सोयापेंड ५९८ डाॅलर प्रतिटनाने पडते. म्हणजेच भारतीय सोयापेंड टनामागे १३ ते १८ डाॅलरने स्वस्त मिळत आहे.

देशातून सोयापेंड निर्यात वाढली आहे. निर्यातवाढीची गती एप्रिल महिन्याच्या मध्यापर्यंत कायम राहू शकते. बांगलादेश, व्हिएतनाम आणि नेपाळ भारतीय सोयापेंडची खरेदी करत आहेत. या देशांना अर्जेंटीना आणि ब्राझीलच्या सोयापेंडेपेक्षा भारतीय सोयापेंड स्वस्त पडत आहे. --
हेमंत बंसल, उपाध्यक्ष, तेलबिया गाळप आणि रिफायनिंग, पतंजली फुडस्

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com