
देवा झिंजाड
एका बाजूला लग्नांवर (Marriage) होणारा अवाढव्य व अवास्तव खर्च अन् दुसऱ्या बाजूला केवळ पैसे नाहीत म्हणून अनेक लेकीबाळींची रखडलेली लग्नं, हे सगळं पाहिलं की मला माझं अगदी साधेपणात केलेलं लग्न आठवतं. ज्यामुळे खर्चाची बचत तर झालीच परंतु समाजासमोर एक आदर्शही उभा करता आला. माझ्या लग्नास झालेला नव्हे तर हातचा राखून केलेला खर्च रुपये ६४६८ मंगळसूत्र (Mangalsutra) (हप्त्यावर), ८०० रुपये लग्नाचा ड्रेस, ७०० रुपये आईला साडी, १३०० रुपये वऱ्हाड टेम्पो, ६७५ रुपये इतर. पूर्ण खर्च ९९४३ रुपये. आहेर घेतला नाही. कुणाला लुगडी, फेटे, टोप्या घेतल्या नाहीत. कामावरच्याच कपड्यांवर हळद लावली. तसेच लग्नात असावा असं सांगितलं म्हणून पुतण्याचा कोट घातला लग्नानंतर त्याला तो परत दिला. वरातीचा कार्यक्रम न केल्यानं 'दारूच्या फुग्यांचाही' खर्च वाचला. गावातली लोकंही शांतपणे झोपू शकली. नाहीतर गावात (Village) वरात म्हटल्यावर झोपेचं खोबरं ठरलेलं असतं. एक दिवस जाणे एक दिवस येणे धरून लग्नासाठी फक्त पाच दिवस सुट्टी काढली होती. नवरी दाखवायची म्हणून दुसऱ्याची गाडी घेऊन उगाच गावोगावी हिंडत बसलो नाही.
लग्न आहे म्हणून आईनं घर शेणाने चांगलं सारवून घेतलं. चूल पोतारुन घेतली. उभ्या भिंती पांढऱ्या मातीनं सारवल्या. फुटक्या खेटरी कौलांच्या जागी पत्र्याच्या डब्याची झाकणं बनवून मी स्वतः घरावर चढून बसवली. लग्नाच्या आदल्या दिवशी मावशा मुक्कामी आल्या होत्या. त्यांना मी म्हणालो, "मला पॉर झाल्यावं तुम्हा तिघींना लुगडी घेईन, आता मपल्याकं पैसं नाहयीत". त्यांनी आईच्या मायेनं त्यांचं काळीज मोठं केलं. ढांगाढोंगात लगीन केलं नाही तरी पोरं झाली. थोडी उशिरा का होईना पण झालीच. केकबिक न कापता मुलांच्या वाढदिवशी (Birthday) गरजूंना थेट मदत करण्याची सवय लावून घेतली.
बरं, फार लेक्चर (Lecture) काय कामाचं? आपल्या विचार अन् कृतीत अंतर कमीतकमी असावं. म्हणूनच सुरुवात स्वतःपासून करावी. ती मी केली. थेट कृतीही केली. हात जोडून सर्वांना विनंती कृपया लग्न साधी करा. उगाच कर्जात बुडू नका. जास्त खर्च केला म्हणजे जास्ती पोरं होत्यात असं काही नसतं. किंवा गावातली लोकं आपल्याला फार श्रीमंत समजतात असंही नसतं. उलट आपलीच लोकं आपलीच बुंदी खाऊन आपलीच निंदानालस्ती करायला तयार असतात. आपल्या खिशाचा अंदाज घेऊन जगलं की माणूस सुखी होतो. आनंदी राहतो. जेवढे साधे राहाल तेवढे मोठे व्हाल!
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.