जळगाव : भर उन्हाळ्यामध्ये वीज संकटांना तोंड देत, उन्हात कांद्यांना पाणी भरून ही अपेक्षित भाव शेतकऱ्यांना मिळाला नाही म्हणून शेतकऱ्यांनी कांदा (Onion) चाळीत साठवून ठेवला आहे. काही शेतकऱ्यांनी तर भाडेतत्त्वावर कांदा चाळ खरेदी करून त्यात भरणा केला. परंतु ऑगस्ट महिन्यात संपत आला तरी कांद्याच्या भावामध्ये अपेक्षित दरवाढ न झाल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी (Onion Producer Farmer)अडचणीत सापडला असून, नवीन कांदा लागवड क्षेत्र घटण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
खानदेशात जळगावात चोपडा, यावल, चाळीसगाव, जळगाव, जामनेर, धुळ्यात साक्री, धुळे, शिंदखेडा, नंदुरबारात नंदुरबार तालुक्यातील पूर्व भागातील वैंदाणेसह परिसरात कांदा लागवड (Onion Cultivation) मोठ्या प्रमाणावर केली जाते. काही शेतकऱ्यांनी महागडे बी व रोप घेऊन कांदा लागवड केली होती. मात्र एप्रिल, मे महिन्यात कांद्याला अवघा चार ते पाच रुपये किलोचा भाव होता.
या भावामध्ये लागवड खर्चही निघणार नसल्याकारणाने शेतकऱ्यांनी कांदा साठवणुकीवर भर दिला होता. मात्र त्यांचीही आता निराशा झालेली आहे. कारण ऑगस्ट महिना संपत आला तरी अपेक्षित भाव मिळत नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी (Onion Producer Farmer) मात्र अडचणीत आला आहे. परिणामी, आहे तोच कांदा सांभाळणे अवघड असून, नवीन कांदा लागवडीसाठी आता शेतकरी वर्ग विचार करत आहे.
साठवलेला कांदाही सडू लागला
कांदा साठवणुकीला बरेच महिने झाल्यामुळे तसेच दमट व पावसाळी वातावरणामुळे साठवलेला कांदाही सडू लागला आहे. भाव वाढतील या अपेक्षेने साठवून ठेवलेला कांदा सडू लागल्यामुळे उत्पादन व उत्पन्न दोन्ही कमी होत असल्यामुळे शेतकरी हैराण झालेला आहे.
साठवणूक केलेले कांद्याला कोंब फुटत आहेत, यापुढे खांदा लागवड करावी की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. चाळीत साठवलेला कांदा बाहेर काढून पुन्हा परत त्याला चाळीत टाकावा लागत आहे, त्यामुळे पर्यायाने खर्चातही वाढ होत आहे.
सुरेश पाटील, कांदा उत्पादक, वैंदाने, जि. नंदुरबार
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.