
अनिल जाधव
Pune Soybean Market Rate : देशातील बाजारात गेल्या दोन महिन्यांपासून सोयाबीनचे भाव (Soybean Rate) दबावात आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोयाबीन आणि सोयापेंड (Soymeal) बाजारावर दबाव आहे.
देशातील बाजारात सोयाबीनची आवक (Soybean Arrival) सरासरीपेक्षा अधिकच दिसते. त्यामुळे सोयाबीनचे दर पुढील काही दिवस टिकून राहू शकतात, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
देशातील बाजारात सध्या सोयाबीन दरावर दबाव आहे. सोयाबीनचे दर गेल्या दोन महिन्यांपासून एका भावपातळीभोवती स्थिर दिसतात. तर दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारातील भावपातळी हंगामातील निचांकी पातळीवर आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोयापेंडचे दरही कमी झाले. याचा परिणाम देशातून होणाऱ्या सोयापेंड निर्यातीवर झाला आहे. याचा दबाव देशातील बाजारावर आल्याचे व्यापारी आणि प्रक्रियादार सांगत आहेत.
देशातील बाजारात सध्या सोयाबीनची आवक रोज दीड लाख क्विंटलच्या दरम्यान होत आहे. ही आवक सरासरीपेक्षा जास्त आहे. त्याचाही दबाव बाजारावर जाणवत आहे.
त्यामुळं सध्या सोयाबीनला प्रतिक्विंटल सरासरी ५ हजार ते ५ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. सोयाबीनची ही भावपातळी मागील दोन महिन्यांपासून कायम आहे.
तर दुसरीकडे शेतकऱ्यांना भाववाढीची अपेक्षा आहे. शेतकरी मागील दोन महिन्यांपासून सोयाीबनच्या दरवाढीची वाट पाहत आहेत.
आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या हंगामातील निचांकी पातळीवर सोयाबीन पोचले. सोयाबीनेच वायदे १३.९५ डाॅलर प्रतिबुशेल्सवर आहेत. तर सोयापेंडच्या वायद्यांनी ४४० डाॅलर प्रतिटनांचा टप्पा गाठला. आंतरराष्ट्रीय बाजारावर परिणाम करणाऱ्या दोन घटना सध्या बाजारात घटत आहे.
एकीकडे ब्राझीलमधील सोयाबीन काढणी वेगाने झाली. ब्राझीलचे सोयाबीन बाजारात आल्याने दरावर दबाव आला. तर दुसरीकडे अमेरिकेत यंदा चांगले पाऊसमान राहण्याचा अंदाज आहे.
अमेरिकेतील सोयाबीन पेरणीही वेगात सुरु आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन दरावर दबाव आला.
देशातही हंगामाच्या अगदी सुरुवातीपासूनच खाद्यतेल बाजाराचा सोयाबीनवर दबाव राहीला. सोयाबीनसह सर्वच खाद्यतेलाचे भाव कोरोनापुर्वीच्या पातळीवर पोचले आहेत. सोयाबीनला केवळ सोयापेंड दराचा आधार मिळत आला.
आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेल स्वस्त झाल्याने यंदा पहिल्या सहा महिन्यांमध्ये खाद्यतेल आयात २२ टक्क्यांनी वाढली. परिणामी देशात खाद्यतेलाचे साठे तयार होऊन सोयाबीन बाजारावर दबाव आला.
सोयापेंडची भीस्त आता देशांतर्गत बाजारावरच जास्त आहे. कारण आंतरराष्ट्रीय बाजारात सोयापेंड दबावात आले. तसेच आपले सोयापेंड नाॅन जीएम असूनही भाव मिळत नसल्याचे निर्यातदार सांगतात.
त्यामुळे पुढील काही दिवस सोयाबीनची भावपातळी कायम राहू शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.--
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.