Sugarcane FRP
Sugarcane FRPAgrowon

शेतकऱ्यांना यंदा मिळणार ४२ हजार कोटींची ‘एफआरपी’

विक्रमी गाळपाचा लाभ; साखर उद्योगाला सोन्याचे दिवस
Published on

पुणे ः राज्याच्या साखर उद्योगात (Sugar Industry) यंदा होत असलेल्या विक्रमी गाळपामुळे (Record Crushing) शेतकऱ्यांना एफआरपीपोटी (FRP) मिळणारी रक्कम ४२ हजार कोटी रुपयांच्या आसपास असेल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

“राज्यभर सध्या केवळ शिल्लक उसाचीच (Excess Sugarcane) चर्चा होते आहे. शिल्लक ऊस केवळ १९ लाख टनाच्या आसपास आहे. तो पुढील काही दिवसांत पूर्णतः गाळला जाईल. परंतु आतापर्यंत १३१२ लाख टनांपेक्षा जास्त उसाचे गाळप यशस्वीपणे झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना यंदा ४२ हजार कोटीची एफआरपी मिळेल. राजकीय आंदोलनाच्या गोंधळात साखर उद्योगाने केलेल्या नेत्रदीपक कामगिरीकडे मात्र पद्धतशीर दुर्लक्ष झाले आहे, अशी माहिती साखर उद्योगातील वरिष्ठ सूत्रांनी दिली.

साखर आयुक्तालयाच्या म्हणण्यानुसार, शेतकऱ्यांना यंदा मिळणारा रास्त व किफायतशीर दर (एफआरपी) विक्रमी स्वरूपाचा असेल. एफआरपी थकीत राहण्याचे प्रमाणदेखील यंदा नगण्य आहे. राज्यात अजून केवळ ८ लाख टनाच्या आसपास ऊस गाळपाविना उभा आहे. त्याचे तातडीने गाळप होण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना आता हार्वेस्टर अधिगृहीत करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. मेअखेर बहुतेक सर्व ऊस गाळला जाईल. तरीही किरकोळ भागात ऊस राहिलाच तर जूनच्या पहिल्या आठवड्यातसुद्धा कारखाने सुरू ठेवण्याचे नियोजन झाले आहे.

इथेनॉल उद्योगातील राज्याची उलाढाल यंदा ९ हजार कोटींची आहे. पुढील हंगामात ती १२ हजार कोटींच्या पुढे जाणार आहे. राज्यात उसाची तोडणी व वाहतुकीपोटी सात हजार कोटी रुपये वाटले जाणार आहेत. बहुतेक भागात कष्टकरी मजूर, मराठवाड्यातील शेतकरी तसेच इतर भागातील शेतकऱ्यांच्या मुलांचा सहभाग ऊसतोडणी व वाहतुकीच्या कामांमध्ये आहे. त्यामुळे हा सात हजार कोटींपैकी बराचसा भाग शेतकऱ्यांच्याच हातात जात आहे, असे निरीक्षण साखर आयुक्तालयातील एका अधिकाऱ्याने नोंदविले.

“साखर उद्योगाची देशातील उलाढाल यापूर्वी एक ते सव्वा कोटी लाख रुपयांच्या आसपास सांगितली जात होती. मात्र यंदा एकट्या महाराष्ट्राची उलाढाल एक लाख कोटीपर्यंत गेली आहे. कष्टकरी शेतकरी, साखर कारखान्यांचे विस्तृत जाळे आणि राज्य शासनाची यंत्रणा यांच्यातील उत्तम समन्वयातून ही कामगिरी साधली गेली आहे.”
शेखर गायकवाड, साखर आयुक्त.

साखर उद्योगाची यंदाची उलाढाल
यंत्रसामग्रीमधील गुंतवणूक...६००० कोटी
साखर निर्यात...३५०० कोटी
एफआरपी वाटप...४२००० कोटी
इथेनॉल...९००० कोटी
सहवीज...६००० कोटी
रेक्टिफाइड स्पिरीट...५००० कोटी
मद्यनिर्मिती...१२००० कोटी
रूपांतर मूल्य व रसायने...१००० कोटी
बगॅस...५०० कोटी
वेतन व मजुरी वाटप...६०० कोटी
जीएसटी...३००० कोटी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com