Rubber Cultivation: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा रबर लागवडीकडे कल

महाराष्ट्रातल्या नारळ (Coconut) , सुपारी (Betel nut), काजू (Cashews) आणि आंब्यासाठी (Mango) प्रसिद्ध असलेल्या सिंधुदुर्गात (Sindhudurg) ही गेल्या काही दशकांपासून नैसर्गिक रबरचं (Rubber) उत्पादन वाढत आहे.
Rubber Production
Rubber ProductionAgrowon

साध्या सायकलीपासून (Cycle) ते मोठ्यामोठ्या अवजड वाहनांच्या टायरसाठी (Tire) असो वा अवजड उद्योगांसाठी, किंवा मग वहीवर लिहिलेल्या पेन्सिलच्या (Pencil) शब्दांना खोडण्यासाठी, सगळीकडेच नैसर्गिक रबराचा वापर मोठया प्रमाणात केला जातो. हा वापर जवळपास 80 टक्के आहे.

म्हणून रबर झाडांच्या लागवडीसाठी अरुणाचलप्रदेश, गोवा, ओडिशा, आंध्रप्रदेश, कर्नाटक, तमिळनाडू, अंदमान-निकोबार या राज्यांची नाव अग्रक्रमाने घेतली जातात.

पण महाराष्ट्रातल्या नारळ (Coconut) , सुपारी (Betel nut), काजू (Cashews) आणि आंब्यासाठी (Mango) प्रसिद्ध असलेल्या सिंधुदुर्गात (Sindhudurg) ही गेल्या काही दशकांपासून नैसर्गिक रबरचं (Rubber) उत्पादन वाढत आहे. सिंधुदुर्गातील सावंतवाडी तालुका याबाबतीत आघाडीवर आहे. तिथं नैसर्गिक रबराचं वार्षिक उत्पादन जवळपास 3,000 टनांपर्यंत पोहोचलंय.

रबर उद्योगातील जाणकारांच्या मते सीएट आणि एमआरएफ सारख्या टायर कंपन्यांना लागणारा रबर सिंधुदुर्ग जिल्ह्यातून पुरवला जातोय. नैसर्गिक रबरला टायर उद्योगकडून मागणी आहे. या रबरला मागणी चांगली असल्याने लागवड करणं आर्थिकदृष्ट्या परवडणार आहे. आज सावंतवाडीत किमान दोन हजार एकर क्षेत्र नैसर्गिक रबर लागवडीखाली आणलं गेलंय.

पुरवठा साखळी मजबूत करण्यावर भर

रबरची वाढती मागणी लक्षात घेता जास्तीत जास्त जमीन रबर लागवडीखाली आणली गेली पाहिजे, असे रबर उद्योगाचे म्हणणे आहे. ऑल इंडिया रबर इंडस्ट्रीज असोसिएशन रबर उत्पादकांना मदत करण्यासाठी राज्य सरकारशी चर्चा करणार आहे. रबराची पुरवठा साखळी मजबुत करण्यावर असोसिएशनचा भर आहे.

तसं पाहायला गेलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हवामान आणि जमीन रबर लागवडीसाठी चांगली असल्याने सन 1986-87 च्या दरम्यान केरळमधील कन्नूर आणि कोट्टायम या जिल्ह्यांतील पंचवीस शेतकरी एकत्र आले. त्यांनी "इंटर स्टेट ग्रुप ऑफ फार्मिंग सोसायटी' स्थापन केली. वर्गणी काढून निधी जमवला आणि केरळबाहेर जाऊन रबराची लागवड करण्याचे निश्‍चित केले.

जमिनीच्या शोधात ते सिंधुदुर्गातील दोडामार्ग तालुक्‍यात आले. येथील हवामान आणि डोंगर उताराची जमीन रबराच्या लागवडीसाठी योग्य असल्याचे लक्षात आल्यावर करार पद्धतीने लागवडीस सुरवात केली. या पिकातून चांगला पैसा मिळत असल्याचे लक्षात आल्यावर रबराचे लागवड क्षेत्र वाढत गेले.

राज्य सरकारचा सुरूवातीला नैसर्गिक रबर लागवडीला विरोध होता. हे विदेशी पीक असून त्याचा इथल्या नैसर्गिक पीकपध्दतीला धोका आहे, अशी सरकारची भूमिुका होती. पण आज घडीला रबरची लागवड सावंतवाडी परिसरात स्थिरावली असल्याचं दिसतंय.

रबर लागवडीतील संधी

एमआरएफ टायर कंपनी आपल्या गोव्यातील प्लांटसाठी आणि सिएट टायर कंपनी त्यांच्या पुणे युनिटसाठी सावंतवाडीतून रबरची खरेदी करत आहे. खरं तर रबर उत्पादनात केरळ आणि कर्नाटक ही राज्यं आघाडीवर आहेत. मात्र प्रति एकरी उत्पादनात सिंधुदुर्ग जिल्हाही आता या राज्यांच्या बरोबरीला आला आहे."

रबर उत्पादनात भारत स्वयंपूर्ण व्हावा यासाठी ईशान्य भारतातील जमीन रबर लागवडीखाली आणण्यासाठी ऑल इंडिया रबर इंडस्ट्रीज असोसिएशन प्रयत्नशील आहे.

सध्या भारतात रबरच्या मागणी आणि पुरवठ्यात तफावत आढळून येते. भारतीय उद्योग, प्रामुख्याने टायर उत्पादक कंपन्यांची रबरची मागणी बघता नैसर्गिक रबर आयात करावा लागतोय. गेल्या आर्थिक वर्षात रबरच उत्पादन 50,000 टनांनी वाढून 7.75 लाख टन झालं. मात्र, 2012-13 मध्ये असलेलं 9.13 लाख टन उत्पादन घटून 2018-19 मध्ये 6.51 लाख टनांवर आलेलं दिसत.

रबर उत्पादनाची स्वयंपूर्णतेकडे वाटचाल

मागच्या दहा वर्षात रबरची आयात 2.62 लाख टनांवरून दुप्पट होऊन 5.46 लाख टनांवर पोहोचली आहे. देशाने रबर उत्पादनात स्वयंपूर्ण व्हावे, त्यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय रबर अभियान राबवावे, अशी भूमिका ऑल इंडिया रबर इंडस्ट्रीज असोसिएशनने घेतली आहे.

येत्या काळात रबरशेतीला महत्त्व प्राप्त होऊ शकतं. पण त्यासाठी रबर उत्पादकांना बाजारपेठ आणि निधी उपलब्ध करून देण्याची आवश्कता आहे. दापोलीच्या डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात रबर शेतीवर संशोधन सुरू आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com