Money Lending
Money LendingAgrowon

गरजेमुळे राज्यातील सावकारी स्थिरावली

संस्थात्मक पतपुरवठा वाढूनही सावकारांच्या संख्येत वाढ
Published on

पुणे ः सहकारी व राष्ट्रीयीकृत बॅंकाकडून शेतकऱ्यांना पिकांसह इतर कारणांसाठी दिल्या जाणाऱ्या कर्जात (Crop Loan) मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. मात्र, संस्थात्मक पतपुरवठा (Institutional Loan) वाढूनदेखील राज्यातील सावकारांची (Lenders) संख्या घटलेली नाही, अशी माहिती शासकीय सूत्रांनी दिली.

‘‘बॅंकिंग जाळ्याच्या तुलनेत सावकारांची संख्या नगण्य आहे. सध्या ही संख्या १२ हजारांहून अधिक असून गेल्या वर्षी दीड हजार कोटींपेक्षा जास्त सावकारी कर्ज वाटले गेले आहे. बॅंकांपेक्षा सावकारी कर्जाचा व्याजदर जादा आहे. तरीदेखील सावकारी कर्ज सुलभ व झटपट मिळते. त्यामुळे जादा व्याज मोजून सावकारी कर्ज घेणाऱ्यांची संख्या घटलेली नाही. परिणामी, राज्याचा सावकारी व्यवसाय मर्यादित असला तरी तो मजबूतपणे टिकून आहे,’’ असे सूत्रांनी स्पष्ट केले.

तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या अंजनी (ता.तासगाव) गावात राजू हरीबा शिंदे यांना सावकाराच्या तगाद्यामुळे आत्महत्या केली होती. त्यामुळे अस्वस्थ झालेल्या आबांनी, ‘‘शेतकऱ्यांना छळणाऱ्या सावकारांना कोपरापासून ढोपरापर्यंत फोडून काढा,’’ असे जाहीर आदेश पोलिसांना दिले होते. त्यानंतर सावकारांच्या विरोधात राज्यभर मोहीम सुरू झाली होती. २०१२ मध्ये एकट्या सांगली जिल्ह्यात सावकारीचे ४८ गुन्हे दाखल करून सावकारी धंद्यातील १०१ जणांना बेड्या ठोकल्या गेल्या.

राज्यात सध्या १२ हजार ७०० अधिकृत सावकार आहेत. त्यांच्याकडून शेतकरी, शेतमजूर, उद्योजक-व्यावसायिक व कामगारदेखील कर्ज घेतात. आश्चर्याची बाब म्हणजे, विदर्भ व मराठवाड्यात बॅंकांच्या कर्जवाटप व्यवस्थेचे जाळे मर्यादित व विस्कळित असल्याने या भागांमध्ये सावकारी कर्ज जास्त प्रमाणात वाटले जात असल्याचे समजले जात होते. मात्र, शासनाने तयार केलेल्या अहवालात सर्वाधिक सावकार पुणे व मुंबई जिल्ह्यांत असल्याचे आढळून आले आहे.

‘‘सावकारी कर्ज हे काही भागांसाठी किंवा विशिष्ट व्यवसायासाठी गरज बनल्याचे दिसून येते. त्यामुळे सावकारी कर्जव्यवस्था बंद पाडता येत नाही. मात्र, ती अधिकाधिक सुटसुटीत, पारदर्शक व पिळवणूकमुक्त करता येईल. राज्य शासनाने हीच बाब लक्षात घेत सावकारी कर्ज व्यवस्थेला कायदेशीर मान्यता दिलेली आहे,’’ अशी माहिती सहकार विभागाच्या एका अधिकाऱ्याने दिली.

असे आहे सावकारी कर्जव्यवस्थेचे जाळे
सावकारांची संख्या ः २०१५ मध्ये १२ हजार होती. कर्जवाटप ८ हजार कोटींच्या पुढे होते. आता २०२१ मध्ये सावकारांची संख्या १२ हजार ७०० च्या आसपास असून कर्जवाटप १७५५ कोटी रुपयांपर्यंत आहे.

सावकारी व्याजदर ः शेतीकर्जासाठी ९ ते १२ टक्के, बिगरशेती कर्जासाठी १५ ते १८ टक्के.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com