रब्बी हंगामात अपेक्षेपेक्षा कमी गहू खरेदी करू शकलेले केंद्रीय अन्न मंत्रालय आता खरीप हंगामातील तांदूळ खरेदीसाठी (Rice Procurement) सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. येत्या ३० ऑगस्ट रोजी यासंदर्भात राज्यांसोबत बैठक होणार असून या बैठकीत केंद्रीय अन्न मंत्रालयाकडून नेमका किती तांदूळ खरेदी केला जाणार आहे, याबाबतची प्राथमिक माहिती स्पष्ट होणार आहे.
वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा देशभरातील भात लागवडीखालील क्षेत्रात ८ टक्क्यांची घट नोंदवण्यात आलीय. देशातील बऱ्याच भागात अतिवृष्टी आणि पुरामुळे पिकांचे नुकसान झाल्याचेही समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर यंदाची तांदूळ खरेदीसंदर्भातील बैठक होत आहे.
त्यामुळे देशातील सर्व राज्यांच्या अन्न सचिवांना तांदूळ खरेदीच्या अचूक शक्यता वर्तवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गहू खरेदीसंदर्भात झालेल्या चुका तांदूळ खरेदीच्यावेळी होऊ नयेत, यासाठी ही खबरदारी घेतली जात असल्याचे सरकारी सूत्रांनी सांगितले.
तांदळाला बाजारात काय दर मिळतो ?,यावर तांदळाची सरकारी खरेदी अवलंबून आहे. शेतकऱ्यांना खुल्या बाजारात हमीभावापेक्षा (MSP)जास्त दर मिळणार असेल तर शेतकरी भारतीय अन्न महामंडळापेक्षा (FCI) खाजगी व्यापाऱ्यांना तांदूळ विकण्यास पसंती देतील, अशी शक्यताही काही राज्यांतील सरकारी सूत्रांनी वर्तवली आहे.
यंदा २०२२-२०२३ (जुलै ते जून) या आर्थिक वर्षासाठी केंद्र सरकारने तांदळाला २०४० रुपये प्रति क्विंटल असा हमीभाव (MSP) जाहीर केला आहे. मागच्या वर्षी केंद्राने तांदळाला १९४० रुपये प्रति क्विंटल असा हमीभाव दिला होता. सध्या तांदळाला देशभरात १७७५ रुपये प्रति क्विंटल असा दर मिळतो आहे. जुलै महिन्यात तांदळाचा खुल्या बाजारातील दर १८३२ रुपये प्रति क्विंटल असा होता.
१ ऑगस्टपर्यंत भारतीय अन्न महामंडळाकडे (FCI) २७.९५ दशलक्ष टन एवढा तांदळाचा साठा होता. मागच्यावर्षी याच काळात महामंडळाकडे २९.१ दशलक्ष टन एवढा साठा होता. मागच्या वर्षी जुलै महिन्यात महामंडळाकडे ३१.७ दशलक्ष टन तांदळाचा साठा होता.
पंजाबमध्येही हमीभावाने (MSP) तांदूळ खरेदीत काहीच अडचणी नसल्याचे राज्याच्या सरकारी सूत्रांनी सांगितले. यावर्षीही राज्य सरकार मागच्या वर्षीप्रमाणेच हमीभावाने तांदूळ खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण करेल. २०२१-२०२२ ( आक्टोबर ते सप्टेंबर) ला पंजाबमध्ये १२.५५ दशलक्ष टन तांदूळ हमीभावाने खरेदी केला होता. हे प्रमाण देशातील एकूण तांदूळ खरेदीच्या (५९.१३ दशलक्ष टन) २१ टक्के होते, असेही पंजाबच्या सरकारी सूत्रांनी नमूद केले.
जेंव्हा इतर राज्यांत हमीभावाने खरेदीचे उद्दिष्ट साध्य होत नव्हते, अशावेळी पंजाबने आपले उद्दिष्ट पूर्ण करण्यात यश मिळवले. यावर्षी पंजाबने १९ दशलक्ष टन गहू पंजाबमध्ये हमीभावाने (MSP) खरेदी केला होता. हे प्रमाण देशभरातील गव्हाच्या खरेदीच्या ५१ टक्के ठरले आहे.
केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या १८ ऑगस्टपर्यंतच्या माहितीनुसार, देशभरातील भात लागवडीखालील (paddy cultivation) क्षेत्रात ८ टक्क्यांची घट नोंदवण्यात आली. आतापर्यंत ३४३. ७० लाख हेक्टर क्षेत्रात भात लागवड (paddy cultivation) करण्यात आली. मागच्यावर्षी याच काळात ३७४.६३ लाख हेक्टर क्षेत्रात भात लागवड करण्यात आली होती.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.