Cotton Market : कापूस का काळवंडला?

Cotton Rate : उलट अखाद्य कृषिमाल म्हणजे कापूस बाजारपेठेत अमेरिकेत मंदी आली आहे. त्याचा फटका भारतातील, विशेष करून महाराष्ट्रातील, उत्पादकांना मोठ्या प्रमाणात बसताना दिसत आहे.
Cotton
CottonAgrowon

Cotton Market Update : ढोबळमानाने सध्या जागतिक कमोडिटी बाजार जोरदार तेजीमध्ये आहे. म्हणजे सोने, चांदी नवीन विक्रम प्रस्थापित करून पुढील ट्रिगरची वाट पाहत आहेत. तांबे दोन वर्षांतील विक्रमी पातळीवर आहे. खनिज तेल १०० डॉलर्सवर जाईल, असे ऐकायला येऊ लागले आहे.

कोकोने तर चार महिन्यांत जवळ जवळ तिप्पट किंमत झाल्याने कमाल केली आहे. खनिज तेल, तांबे ३० टक्के वाढले, ॲल्युमिनियम २५ टक्के, सोने १२ टक्के, तर चांदी १८ टक्के वाढल्याने कमोडिटी बाजारात जोरदार ॲक्शन आली आहे. आणि ही तर सुरुवात असून (झाल्यास) एका करेक्शननंतर ही तेजी अजून वाढेल, असा कयास आहे.

दुसऱ्या बाजूला कृषिमाल बाजारपेठेमध्ये मात्र ‘जैसे थे’ वातावरण आहे. भारताच्या दृष्टीने महत्त्वाच्या अशा सोयाबीन, मका, गहू, तांदूळ बाजारपेठेत कुठलीच ॲक्शन आलेली नाही. उलट अखाद्य कृषिमाल म्हणजे कापूस बाजारपेठेत अमेरिकेत मंदी आली आहे. त्याचा फटका भारतातील, विशेष करून महाराष्ट्रातील, उत्पादकांना मोठ्या प्रमाणात बसताना दिसत आहे. खरे म्हणजे खनिज तेल वाढते तेव्हा कापसासकट बहुतेक कृषिमाल महाग होतो, असा नेहमीचा अनुभव आहे. या वेळी मात्र असे न होण्याचे कारण काय याचा मागोवा घेऊया.

जानेवारी-फेब्रुवारीत तेजी

आपण पाहिले की २०२२-२३ मध्ये कापसाला विक्रमी म्हणजे १२ हजार रुपये क्विंटल भाव मिळाला. म्हणजे हमीभावापेक्षा दुपटीहून अधिक भावाला कापूस विकला गेला. त्यामुळे मागील हंगामात अर्थातच शेतकऱ्यांच्या कापसाच्या भावाबद्दल अपेक्षा वाढल्या.

हंगामाच्या सुरुवातीला ९ हजार रुपये किंमत मिळूनही शेतकऱ्यांचा कापूस साठवणूक करण्याकडे कल राहिला. परंतु किमती सतत घसरतच राहिल्याने उत्पादक आणि स्टॉकिस्ट या दोन्ही घटकांचे नुकसान वाढतच गेले. आणि किमती ६५०० ते ६८०० रुपयांवर आल्यावर अवसान गळून गेल्यामुळे या घटकांकडून डिसेंबर-जानेवारी दरम्यान ‘पॅनिक सेलिंग’ पाहायला मिळाले.

Cotton
Cotton Market : नांदेडसाठी कपाशीच्या साडेदहा लाख पाकिटांची मागणी

त्यामुळे भारतीय कापूस जागतिक बाजारात सुमारे १० टक्के डिस्काउंटमध्ये आला. लागलीच निर्यातदार आणि बहुराष्ट्रीय कंपन्यानी संधीचा फायदा घेऊन भारतात कापूस खरेदी करून इतरत्र निर्यात करण्याचा सपाटा लावला. त्यामुळे नेहमीप्रमाणेच मोठ्या प्रमाणावर कापूस शेतकऱ्यांच्या हातून गेल्यावर त्यात तेजीचे वारे वाहायला लागले आणि निर्यातीला मागणी वाढल्यामुळे येथील बाजारात जानेवारीमध्ये सुरू झालेली तेजी फेब्रुवारी अखेर ७८०० रुपयांपर्यंत गेली.

यानंतर आता कापूस थांबत नाही असे वाटल्यामुळे आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम असलेल्या उत्पादकांनी कापूस विक्री करण्याऐवजी अधिक थांबायचे ठरवले. आणि नंतर अनपेक्षित घडले. अमेरिकी वायदे बाजारात कापूस १०३ सेंट्स प्रति पौंडवरून मागील आठवड्यात ७९ सेंट्सपर्यंत म्हणजे २३ टक्के घसरला. तेजी टिकून राहण्याची किंवा अधिक वाढण्याची स्वप्ने सध्या तरी धुळीला मिळाली आहेत.

तेजी अल्पजीवी?

या घसरणीमागची कारणे अजूनही बऱ्यापैकी गुलदस्तात असली तरी बाजारातील अनुभव पणाला लावल्यास असे दिसून येईल, की जागतिक बाजारात जोपर्यंत हेजफंड किंवा गुंतवणूकदार बॅंका पैसे लावत नाहीत तोपर्यंत कुठल्याही कमोडिटी किंवा मालमत्तेत मोठी तेजी येत नाही. या नियमाप्रमाणे कापसात फंडांची पोझिशन अजूनही जेमतेम आहे.

त्याचप्रमाणे बहुराष्ट्रीय कंपन्यांनी देखील अलीकडील तेजीमध्ये यापूर्वी साठवणूक केलेला कापूस विकून टाकल्याचे दिसून आले आहे. या हंगामात उत्पादकांबरोबर त्यांचे आडाखे देखील चुकल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे कापसात पुढे काय हे पहायचे तर हेजफंड किंवा गुंतवणूकदार बॅंका आणि बहुराष्ट्रीय कंपन्या हे कापूस बाजारात तेजी आणू शकणारे हे दोन्ही मोठे घटक कापसाबाबत एवढे उदासीन का, या प्रश्‍नाचे उत्तर शोधावे लागेल.

वस्त्रोद्योग क्षेत्रात बदलाचे वारे

एखाद्या कमोडिटीच्या किमती जेव्हा खूप वाढतात तेव्हा त्याचे वापरकर्ते त्याला पर्याय शोधू लागतात हा बाजाराचा नियम आहे. मागील दशकात गवार-बी, मेंथा ऑइलसारख्या कमोडिटींमध्ये आपण हे चांगलेच अनुभवले आहे. कदाचित अशाच प्रकारचे बदलाचे वारे कापसात वाहत असल्याचे संकेत मिळत आहेत.

सध्या वस्त्रोद्योग क्षेत्र कापसाचा प्रमुख वापरकर्ता आहे. या क्षेत्रात सूती धागे आणि मानव-निर्मित धागे (म्हणजे पॉलिएस्टरसारखे कृत्रिम धागे) यांच्यात नेहमी स्पर्धा असायची. मानवनिर्मित धागे हे प्रामुख्याने कच्च्या तेलाच्या किमतीशी निगडित असायचे. जेव्हा कापूस महाग तेव्हा कृत्रिम धाग्याला मागणी अधिक आणि कापूस स्वस्त तेव्हा उलट कल अशा दोनच शक्यता होत्या.

परंतु आज मानवनिर्मित धाग्यात संशोधन आणि तंत्रज्ञानाचा वापर वाढल्यामुळे मका, घायपात, बांबू, ताग आणि इतर वनस्पतींसारख्या अनेक नैसर्गिक गोष्टींचा वापर करून धागे निर्मिती सुरू झाली आहे. विविध क्षेत्रांत त्यांचा वापर वाढतो आहे. हा प्रवाह अधिक बळकट होईल तेव्हा कापसाची मागणी वस्त्र-प्रावरणे क्षेत्राचा थोडाफार अपवार वगळता इतर अनेक क्षेत्रांत कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

जागतिक बाजारात कापूस आणि कृत्रिम धागे वापराचे प्रमाण ७५:२५ वरून ४०:६० जवळ आले असून, ते लवकरच ३०:७० वर येण्याचे बोलले जात आहे. आपल्या देशात अजूनही हे प्रमाण ६०:४० असले, तरी किमतीतील फरकामुळे ते ४०:६० व्हायला वेळ लागणार नाही. या बदलाचा वेग कमी-जास्त होईल, परंतु बदलाची ही दिशा कायम राहील आणि त्याचा कापूस बाजारावर दीर्घकालीन आणि दूरगामी परिणाम होतच राहील.

Cotton
Cotton Cultivation : साडेचार लाख हेक्टरवर कपाशीचा पेरा

ग्लोबल वार्मिंगचा ‘आशीर्वाद’

या पार्श्‍वभूमीवर कापसाच्या मागणीबाबत प्रश्‍न निर्माण झाला असला तरी दुसरीकडे बिघडणाऱ्या पर्यावरण संतुलनामुळे कापसाला फायदा होईल. यापैकी ग्लोबल वार्मिंग म्हणजे सातत्याने वाढणाऱ्या तापमानामुळे सूती कपड्यांची मागणी थोडी तरी वाढेलच. युरोप असो की मध्य-पूर्व आणि अति-पूर्व, दोन्ही ठिकाणी तापमान वाढ वेगाने होत असल्याचे दिसून येत आहे.

अमेरिकाखंड देखील यापासून अलिप्त नाही. हे तिन्ही प्रदेश म्हणजे मोठे मार्केट्स आहेत. कृत्रिम धाग्यांमुळे होणारे नुकसान थोडे तरी भरून निघेलच. कदाचित एखादे संशोधन कापसाच्या वापरायला अनुकूल निघाले तर त्यापासून देखील फायदा मिळेल. त्यामुळे सर्वच संपले असे नसले तरी कापूस उत्पादकांनी बदलत्या बाजाराचा कानोसा सतत घेत राहणे गरजेचे झाले आहे.

उत्पादकांना सल्ला

वरील परिस्थिती जरी एकाच वर्षात येणारी नसली तरी किमतीबाबतच्या सेंटिमेंटचे बाजारात आगाऊ पडसाद उमटत असतात, याचा अनुभव आपण वारंवार घेतला आहे. त्यामुळे कापूस पिकाचे नियोजन करताना केवळ मागील हंगामातील किंमत हा घटक विचारात घेण्यापेक्षा त्याला जोडून इतर घटकांचाही विचार करावा लागेल. यापैकी महत्त्वाचे म्हणजे येत्या हंगामात कापूस क्षेत्र किंचित कमी किंवा स्थिर ठेवणे उचित ठरेल. त्यामुळे उत्पादन नियंत्रणात राहून पुढील हंगाम चांगला जाईल. बाजारातील स्पर्धेत टिकून राहायचे तर उत्पादन अधिक घेण्यापेक्षा ते अधिक चांगल्या दर्जाचे घेण्यावर भर द्यावा लागेल.

कापूस महामंडळ आणि केंद्र सरकार ‘कस्तुरी भारत’ हा ब्रॅंड विकसित करण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत. उत्पादकांनी संघटितपणे अशा मोहिमेचा फायदा घ्यायला हवा. मागील हंगामातील कापूस अजूनही शिल्लक असल्यास ७६०० ते ७८०० या कक्षेत दरपातळी आल्यास टप्प्याटप्प्याने कापूस विकणे इष्ट ठरेल. ही पातळी केव्हा येईल हे सांगणे कठीण असले तरी जून-जुलैमध्ये काही कालावधीत तेजी येण्यास अनुकूल वातावरण निर्माण होत आहे.

वस्त्रोद्योग शेअर्स तेजीत

एकीकडे कापूस काळवंडत असताना वस्त्रोद्योग कंपन्यांचे शेअर्स प्रकाशात येण्यास अनुकूल वातावरण निर्माण होत आहे. स्वस्त कापसाचा परिणाम म्हणून कापूस हा प्रमुख कच्चा माल असलेल्या टेक्स्टाइल कंपन्या चांगला नफा कमावणार असल्यामुळे त्यांच्या शेअर्सच्या खरेदीतून होणारा नफा वाढणार आहे. पेज इंडस्ट्रीज, सियाराम, एबीएफआरएल, डॉलर, रूपा, नितीन स्पिनर्ससारख्या कंपन्या चांगली कामगिरी करतील अशी आशा आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com