
पुणे ः राज्यातील सर्व साखर कारखान्यांच्या (Sugar Mill) वजन काट्यांमध्ये (Sugarcane Weight) एकसमानता आणून संगणकीय प्रणालीद्वारे पारदर्शकता तयार करण्याचा प्रस्ताव राज्याच्या नियंत्रक वैधमापन विभाग व अतिरिक्त पोलिस महासंचालकांकडे पाठविण्यात आला आहे.
साखर आयुक्त शेखर गायकवाड स्वतः या विषयावर काम करीत आहेत. साखर कारखान्यांच्या वजनकाट्यांवर मोठ्या प्रमाणात वजनचोरी होते, तसेच काटामारी करणारे कारखाने बाहेरील खासगी काट्याचे वजन ग्राह्य धरत नसल्याच्या तक्रारी आल्या आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनीही हा विषय उचलून धरल्यामुळे सर्व साखर कारखान्यांचे संगणकीकरण होण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.
साखर कारखान्यांमधील वजनकाट्यांची तपासणी जिल्हाधिकाऱ्यांच्या अखत्यारित भरारी पथकांमार्फत केली जाते. मात्र पथके असूनही काटामारी होते. शेतकऱ्यांना ऊस वजनाच्या पावत्याही दिल्या जात नाहीत. वजनात पारदर्शकता नसल्यामुळे शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपयांना दर हंगामात फटका बसतो, अशा तक्रारी साखर आयुक्तालयाकडे आलेल्या आहेत.
‘‘राज्यातील सर्व कारखान्यांमधील वजन काट्यांचे कॅलिब्रेशन एकसमान करावे लागेल. संगणकाच्या माध्यमातून एकसमानता आणल्यास गैरप्रकार थांबू शकतील. संगणकीय प्रणाली नेमकी कशी असावी, या बाबत अभ्यास केला जाणार आहे. मात्र खासगी वजनकाट्यांची पावती ग्राह्य न धरण्याची भूमिका साखर कारखान्यांना सोडावी लागेल. कारण वैधमापन शास्त्र विभागाच्या नियंत्रकांनीच सर्व काटे एकसमान असल्याचा निर्वाळा दिला आहे,’’ अशी माहिती साखर आयुक्तालयाच्या सूत्रांनी दिली.
नियंत्रक डॉ. रवींद्र कुमार सिंगल यांनी राज्यातील सर्व वैधमापन शास्त्र सहनियंत्रकांना एक पत्र पाठविले आहे. नव्या कार्यप्रणालीचा अवलंब करून क्षेत्रिय वैधमापन शास्त्र अधिकाऱ्यांना आपापल्या कार्यक्षेत्रातील साखर कारखान्यांमधील वाहन काट्यांची तपासणी करावी, असेही या पत्रात म्हटले आहेत.
‘‘साखर कारखान्यांमधील उसाच्या वजनात शेतकऱ्यांची लूट होत असल्याच्या तक्रारी वैधमापन शास्त्र कार्यालयाला प्राप्त झालेल्या आहेत. त्यामुळे काट्यांची तपासणी करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने वजनातील फसवणुकीला आळा घालण्यासाठी काही शिफारशी सुचविल्या आहेत. त्यानुसार काट्यांची तपासणी करण्यासाठी आता प्रमाणित संचालन प्रणाली नव्याने तयार करण्यात आली आहे,’’ असे नियंत्रकांनी नमूद केले आहे.
-नियंत्रकांनी दिल्या या सूचना
-लोडसेल ते जंक्शन बॉक्स व जंक्शन बॉक्स ते इंडिकेटरपर्यंतच्या सर्व केबल्स अखंड व न कापलेल्या असतील. आवरण कुठेही काढलेले नसावे. केबल्सवर चिकटपट्ट्या लावलेल्या नसाव्यात.
-लोडसेल ते इंडिकेटरपर्यंतच्या केबल्सवर कोणतेही छुपे उपकरण लावू नये.
-आयटी कीट मॉडेल अॅप्रूव्हल असलेल्या वाहन काट्यालाच संगणक प्रणाली उपलब्ध असावी.
-वे इंडिकेटरला प्रिटिंग सुविधा असावी. पावतीवर वाहन क्रमांक नोंद करून सही शिक्क्यासह पावती द्यावी.
डिजिटल सुविधा या हंगामात नाही
साखर कारखान्यांमधील काटामारी रोखण्यासाठी डिजिटल इंडिकेटर वापरण्याची सक्ती वैधमापन शास्त्र विभागाने या हंगामापासून लागू केलेली नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली. ‘‘सध्याच्या अॅनॉलॉग लोट सेल असलेल्या जागेवर डिजिटल लोड सेलसह इंडिकेटर बसविण्याची सुधारणा पुढील गाळप हंगामापासून करा, असे आदेश शासनाने दिले आहेत. त्यामुळे साखर कारखान्यांचे फावले आहे,’’ असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.