Fish Production : मत्स्योत्पादनात ३८ हजार टनांची तूट
Ratnagiri News : जिल्ह्यात २०२०-२१ या आर्थिक वर्षात एक लाख टनांपेक्षा अधिक मत्स्योत्पादन होते; मात्र वर्षभरात त्यात मोठी घट झाली असून २०२२-२३ या वर्षात ते ६२ हजार ७०८ टनांपर्यंत कमी झाले आहे. सुमारे ४० हजार टनांनी घट झाली आहे. ग्लोबला वॉर्मिंगमुळे मासे स्थलांतर करत असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.
जिल्ह्यात मासळी उतरवण्यासाठी ४६ केंद्रे असून परवाना असलेल्या २ हजार ५२० मासेमारी नौका आहेत. मत्स्य व्यावसायावर अवलंबून असलेली लोकसंख्या ७१ हजार ६२० आहे. दरवर्षी जिल्ह्याच्या मत्स्योत्पादनात चढ-उतार दिसत आहेत. त्याचा परिणाम मागील तीन वर्षांत अधिक प्रमाणत जाणवत आहे. याला ग्लोबल वॉर्मिग जबाबदार असल्याचे कारण तज्ज्ञांसह मच्छीमारांकडून सांगितले जात आहे.
खऱ्या अर्थाने उतरती कळा ही २००६-०७ पासून लागली. त्या वेळी उत्पादन १ लाख ९ हजार ५५ टन होते. त्यानंतर पुढे सहा वर्षे उत्पादन ७५ ते ९५ हजार टनांपर्यंत राहिले. मागील वीस वर्षांतील परिस्थितीचा अंदाज घेतला तर दर सहा ते सात वर्षांच्या फरकाने मासे उत्पादन १ लाख टनांपर्यंत येते.
उर्वरित वर्षांत ते कमी राहते. २०२०-२१ या वर्षात ६५ हजार ३७४ टन उत्पादन होते. त्यानंतर २०२१-२२ ला ते १ लाख १ हजार टन उत्पादन मिळाले. परंतु पुढच्याच वर्षी २०२२-२३ मध्ये पुन्हा ४० टनांची घट झाली असून ते ६२ हजार टन मिळाले.
कोकण किनारपट्टीवर मासे आहेत, मात्र त्यांचे स्थलांतर होत असल्याचे अनुभवी मच्छीमारांचे मत आहे. किनारी भागातील माशांचे प्रमाण कमी होण्यापेक्षा ग्लोबल वॉर्मिगमुळे दक्षिणेच्या किनारी भागातील मासे अन्यत्र वळलेले आहेत.
रत्नागिरीच्या किनारी भागात शिंगाडा, घोळ, रावस, कोळंबीच्या काही जाती, शेवड यांसारखे मासे भरपूर प्रमाणात मिळत होते. मात्र गेल्या काही दिवसांमध्ये हे मासे दुर्मिळ होत आहेत. मात्र ते मिळतच नाहीत असे नाही, हे मासे मुंबईकडील वसई, मालाड परिसरात आढळतात.
याच परिसरात गेल्या काही वर्षांत पापलेट सापडत आहे. पाण्याचे प्रदूषण, वाढते तापमान, पाण्यातील पीएच, ऑक्सिजनचे प्रमाण यामुळे अनेकवेळा माशांचे स्थलांतर होते. तर अभ्यासकांचे मत आहे की, सह्याद्रीच्या खोऱ्यातून वेगाने वाहणाऱ्या नद्यांमुळे समुद्राच्या मुखाशी अन्नसाखळी चांगल्याप्रकारे निर्माण होते.
परिणामी मासे रत्नागिरीच्या किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात सापडत होते; परंतु गेल्या काही वर्षांमध्ये रत्नागिरीतील मासळी अन्य भागाकडे किंवा खोल समुद्रात वळू लागली आहे. त्याची प्रमुख कारणे वाढते प्रदूषण, समुद्राच्या पाण्याचे वाढलेले तापमान ही असल्याचे तज्ज्ञांनीही मान्य केले आहे.
त्याचे परिणाम हे अन्नसाखळी तुटण्यास कारणीभूत ठरत आहेत. याला अनेक तज्ज्ञांकडून दुजोरा मिळत आहे. समुद्राची वाढती पाणी पातळी आणि कार्बन डायऑक्साईड या समस्या आ वासून आहेत.
मागील दहा वर्षाचे मासळी उत्पादन
वर्ष उत्पादन (टनांमध्ये)
* २०१३-१४ १ लाख ६ हजार ८५२
* २०१४-१५ १ लाख १५ हजार ०४२
* २०१५-१६ ८७ हजार ०३०
* २०१६-१७ ९८ हजार ४४३
* २०१७-१८ ८० हजार ३४०
* २०१८-१९ ७३ हजार ७३८
* २०१९-२० ६६ हजार १७३
* २०२०-२१ ६५ हजार ३७४
* २०२१-२२ १ लाख १ हजार २२८
* २०२२-२३ ६२ हजार ७०८
झीरो ऑक्सिजन झोन वाढताहेत
सागरी मत्स्य संशोधन संस्थेने केलेल्या भारताच्या किनारपट्टीवरील अभ्यासात समुद्राच्या तळाला राहणाऱ्या जिताडा, गोब्रा, खेकडे, शेवंड, तांब, ढोमा तर पृष्ठभागात राहणाऱ्या बांगडे, गेदर ससा यांसारख्या मासळीचे प्रमाण कमी हो आहे.
तसेच सरंगा, मांदेली, शिंगाळा, गेदरच्या काही प्रजाती, राणीमासा, कर्ली, कोळंबी, पापलेट, सुरमई अशा काही महत्त्वाच्या माशांचा समुद्रातील आढळ कमी होत आहे. रत्नागिरी मत्स्य महाविद्यालयाच्या अभ्यासक प्रा. स्वप्नजा मोहिते यांनी केलेल्या संशोधनात काही महत्त्वाचे मुद्दे पुढे आले आहेत.
अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागरातील काही भागांमध्ये झीरो ऑक्सिजन झोन निर्माण होत आहेत. प्राण वायूची कमतरता असलेल्या परिसरातील जीवांवर त्याचा परिणाम होत आहे.
मत्स्योत्पादन घटण्याची कारणे
* समुद्रातील पाण्याचे प्रदूषण वाढतेय
* परवाना नसलेल्या नौकांची संख्या वाढतेय
* वादळ, हवामानातील बदलांमुळे मासेमारीच्या दिवसांत घट
* खोल समुद्रात जाण्याची मानसिकता नाही
* अन्नसाखळी तुटल्यामुळे माशांचे स्थलांतर
* पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण घटतेय
* अरबी समुद्रात निर्माण होणारे कमी दाबाचे पट्टे
* अंतर्गत हालचालींमुळे समुद्रातील प्रवाह बदलतात
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.