Kolhapur News : पेट्रोलमध्ये इथेनॉलचे २० टक्के मिश्रण करून त्याची विक्री करणारे आउटलेट २०२५ पर्यंत संपूर्ण देशभर उभारण्यात येणार आहेत. फेब्रुवारी २०२३ ला पहिले आउटलेट केंद्राने सुरू केले होते.
आता ही संख्या जलदगतीने वाढत ६०० वर गेली आहे. केंद्राच्या वतीने आउटलेट वाढविण्यासाठी वेगवान प्रयत्न सुरू करण्यात येत असल्याची माहिती पेट्रोलिअम मंत्रालयाच्या सूत्रांनी दिली.
२०१३-१४ ला पेट्रोलमध्ये इथेनॉलचे मिश्रण ३८ कोटी लिटर होते. यात वाढ होत २०२१-२२ ला हे प्रमाण ४३३ कोटी लिटरवर आले. २०१३-१४ ला १.५३ टक्के इथेनॉलचे मिश्रण पेट्रोलमध्ये केले जात होते. आता हे प्रमाण ११.५ टक्क्यांवर आले आहे.
बायो फ्युएल विकणाऱ्या पेट्रोल पंपांची संख्या २०१६-१७ ला २९ हजार ८९० वरून ६७ हजार ६४० वर पोहोचली आहे. १० टक्के इथेनॉल मिश्रणाचे उद्दीष्ट मुदतीअगोदरच म्हणजे जून २०२२ लाच पूर्ण झाले आहे. हे उद्दीष्ट पूर्ण होण्यासाठी देशात वाढलेली इथेनॉल निर्मितीची क्षमता कारणीभूत ठरली आहे.
२०२१-२२ मध्ये कारखान्यांना २० हजार ५०० कोटी रुपयांचे उत्पन्न इथेनॉल विक्रीतून मिळाले आहे. इथेनॉलची विक्री प्रामुख्याने देशातील तेल कंपन्यांना झाली. यातून साखर कारखानदार, इथेनॉल प्रकल्पांना ही रक्कम मिळाली. यातून ३० हजार कोटी रुपयांच्या परकीय चलनाचीही बचत झाली.
इथेनॉल मिश्रणासाठी जेवढी गरज आहे तितक्या इथेनॉलची उपलब्ध्ता ही आवश्यक आहे. सध्या इथेनॉलची उपलब्धता प्रामुख्याने साखर उद्योगातून होत आहे. पण नैसर्गिक परिस्थितीमुळे उत्पादन कमी झाल्यास इथेनॉल निर्मितीतही घट होण्याचा धोका असल्याने केंद्राने मका, तांदूळ व अन्य धान्यांपासूनही इथेनॉल निर्मितीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
वर्षभरात कोणत्याही परिस्थितीत इथेनॉल कमी पडू नये यासाठी विविध पातळीवरून उपाययोजना करण्यात येत असल्याचे मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले. देशपातळीवर जादा संख्येने अशी आउटलेट सुरू झाल्यास ईंधन आयातीच्या खर्चात मोठी बचत होणार आहे. यामुळे देशभरात जादा संख्येने वीस टक्के इथेनॉल मिश्रीत पेट्रोल मिळेल, अशी सुविधा उपलब्ध करून देत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.