नाशिक : आगाप खरीप कांदा लागवडीसाठी (Onion Cultivation) जिल्ह्यातील देवळा, चांदवड हे तालुके नेहमी आघाडीवर असतात. त्यामुळे या कांद्याचे लिलाव (Onion Auction)दसऱ्याच्या मुहूर्तावर सुरू होण्याची प्रथा आहे. त्यानुसार उमराणे व मुंगसे या बाजार आवारात आवक होऊन लिलाव झाले. उमराणे (ता. देवळा) येथील खारी फाट्यावरील श्री रामेश्वर कृषी मार्केट आवारात मुहूर्ताचा दर ११,१११ रुपये मिळाला.
चालू वर्षी हा दर जिल्ह्यात उच्चांकी ठरला आहे. खारीफाटा येथे बुधवारी (ता. ५) नवीन लाल कांदा आणि मक्याचा जाहीर लिलाव उमराणेचे माजी सरपंच प्रकाशभाऊ कांतीलाल ओस्तवाल यांचे हस्ते करण्यात आला.
तिसगाव येथील भाऊसाहेब बाबूराव देवरे यांच्या बैलगाडीतून आणलेल्या कांद्याला संजय खंडेराव देवरे यांनी ११,१११ रुपये प्रतिक्विंटल दराने उच्चांकी बोली लावून खरेदी केला. येथे १० वाहनांतून अंदाजे १०० क्विंटल आवक झाली. किमान १६०१ ते कमाल ५१५१, तर सरासरी ३००० रुपये दराने लिलाव पार पडले.
या वेळी नाशिक जिल्हा कांदा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष खंडू काका देवरे, श्रीरामेश्वर कृषी मार्केटचे मुख्य संचालक श्रीपाल प्रकाश ओस्तवाल, पुंडलिक आनंदा देवरे, व्यापारी संतोषजी बाफना, प्रवीण बाफना, गौतम डुंगरवाल, विनीत ललवाणी, नितीन काला, रामराव देवरे, दीपक जाधव, योगेश पगार, चिंधु खैरे, अमोल वाघ आदी व्यापारी बांधव, शेतकरी व बाजार समितीचे कर्मचारी उपस्थित होते.
मागील वर्षी येथे सर्वाधिक १२०० क्विंटल कांदा आवक झाली. त्या वेळी उच्चांकी ५५५५ रुपये दर मिळाला होता; मात्र चालू वर्षी आवकेत ९० टक्के घट असून उच्चांकी दर दुपटीने त्यामुळेच निघाला; मात्र सरासरी दर स्थिर राहिल्याचे दिसून आले. मागील वर्षी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती ६३ क्विंटल आवक झाली होती;
मात्र चालू वर्षी येथे आवक झालेली नाही.उमराणे येथील स्व. निवृत्तीकाका देवरे बाजार समितीत सहा वाहनांतून आवक झाली. किमान २३०० ते कमाल ७१७१, तर सरासरी ३००० रुपये असा प्रतिक्विंटल दर मिळाला, अशी माहिती समितीने दिली.मुंगसे उपबाजारात किलोला ५१० रुपये मालेगाव बाजार समितीच्य मुंगसे कांदा खरेदी-विक्री केंद्रावर नवीन खरीप लाल कांद्याला प्रति किलो ५१० रुपयांची बोली लागली.
बापू सूर्यवंशी यांनी एक क्रेटमध्ये वीस किलो कांदा विक्रीला आणला होता.आतापर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदाच आवकेत मोठी घटजिल्ह्यात प्रामुख्याने मालेगाव, चांदवड व देवळा तालुक्यात आगाप खरीप कांदा लागवडी सर्वाधिक असतात; मात्र सृष्टीचा मोठा फटका यावर्षी हंगामाला बसला आहे.
त्यामुळे दसऱ्यापासून सुरू होणारे उत्पादन हाती आलेले नाही. त्यामुळे जिल्ह्यात १ हजारांवर वाहनांतून होणारी आवक ५० वाहनांच्या आत आली. उन्हाळ कांद्याची मोठ्या प्रमाणावर प्रतवारी घडली आहे,तर दुसरीकडे सड होऊन हा साठा अंतिम टप्प्यात असून संपुष्टात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे खरीप लाल कांद्याचे घटलेले उत्पादन व नवीन कांद्याच्या पुरवठ्यात तूट असल्याने दरात तेजी राहण्याची चिन्हे आहेत, असे व्यापाऱ्यांनी सांगितले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.