
शेतकरी - अनिल काशिराम नराम
गाव - लोरे, ता. वैभववाडी, जि. सिंधुदुर्ग
एकूण क्षेत्र - २० एकर
काजू लागवड - ४ एकर
एकूण झाडे - ३००
अनिल नराम यांची सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोरे (ता.वैभववाडी) येथे २० एकर शेती आहे. त्यापैकी ४ एकरमध्ये काजूच्या ३०० झाडांची लागवड आहे. त्यात वेंगुर्ला ४, वेंगुर्ला ७ आणि गावठी जातीची ५० झाडे आहेत.
नियोजनातील बाबी
- यावर्षी फेब्रुवारी महिन्याच्या मध्यापासून काजू हंगामास सुरवात झाली. झाडावरून पडलेले परिपक्व काजू बी गोळा करून एकत्र केले. आठवडाभर १-२ दिवसांच्या अंतराने जमिनीवर पडलेले काजू बी गोळा करण्याचे काम सुरु होते.
- सर्व झाडांवरील काजू बी गोळा केल्यानंतर काजू स्वच्छ धुवून उन्हामध्ये वाळवून साठवण ठेवले. त्यानंतर योग्य भाव मिळाल्यानंतर विक्रीचे नियोजन केले.
- यावर्षीचा हंगाम साधारण एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत सुरु होता.
- हंगाम संपल्यानंतर बागेतील सर्व पालापाचोळा गोळा करून झाडाच्या बुंध्यात टाकले. जेणेकरून पावसाळ्यात कुजून त्यापासून झाडाला सेंद्रिय खताची उपलब्धता होईल. तसेच तणांचा प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी राहतो.
- हंगाम संपल्यानंतर बागेचे निरिक्षण केले. निरीक्षणाअंती बागेतील काही झाडांवर जास्त प्रमाणात रोगग्रस्त असल्याचे आढळून आले. अशी झाडे काढून त्याजागी नवीन कलमे लावण्याचे नियोजन आहे. नवीन लागवडीसाठी खड्डे खोदून घेतले.
आगामी नियोजन
- यावर्षी अद्यापही अपेक्षित पाऊस झालेला नाही. पाऊस पडल्यानंतर शेणखत, सेंद्रिय आणि रासायनिक खतांची डोस दिला जाईल. साधारणपणे प्रति झाड ५ किलो शेणखत आणि झाडाच्या उंची आणि विस्ताराप्रमाणे रासायनिक आणि सेंद्रिय खतांच्या मात्रा दिल्या जातील.
त्यासाठी आधीच खतांची उपलब्धता केली आहे. मात्र, पावसाअभावी खत देण्याचे काम बाकी आहे. पाऊस पडल्यानंतर त्वरित खतांच्या मात्रा दिल्या जातील.
- नवीन लागवडीसाठी काढलेले खड्डे खतांच्या मात्रा देऊन भरून घेतलेले आहेत. पाऊस पडल्यानंतर रोपांची लागवड केली जाईल.
- जुलै महिन्यात पावसाचे प्रमाण अधिक राहत असल्यामुळे कोणतीही कामे करता येत नाहीत. अनिल नराम यांची संपूर्ण जमीन सपाट असल्यामुळे बागेत पावसाचे पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घेतली जाते. पाण्याचा निचरा होण्यासाठी चर खोदून घेतले जातात.
- ऑगस्ट महिन्यात पावसाचे प्रमाण कमी झाल्यानंतर पुन्हा रासायनिक खतांचा दुसरा हप्ता दिला जाईल.
- बागेत कोणत्याही तणनाशकांचा वापर केला जात नाही. त्यामुळे पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात गवत वाढते. ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात ग्रास कटरने वाढलेले गवत कापून घेतले जाते. झाडांची उंची आणि विस्तार मोठा असल्यामुळे तणांचा प्रादुर्भाव तितका जाणवत नाही.
- ऑक्टोबरमध्ये झाडांना पालवी येण्यास सुरवात होते. या कालावधीत ढेकण्या (टी मॉस्कीटो बग) चा प्रादुर्भाव हमखास जाणवतो. या कालावधीत संपूर्ण बागेची पाहणी केली जाते. प्रादुर्भाव आढळून आल्यास रासायनिक कीटकनाशकांची एक फवारणी घेतली जाते.
- नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये काजूला मोहोर फुटण्यास प्रारंभ होतो. मोहोर येण्याच्या वेळी फुलकिड्यांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. त्यासाठी बागेचे निरिक्षण करून आवश्यकतेनुसार रासायनिक फवारणी घेतली जाते.
संपर्क - अनिल नराम, ८८८८५५५१८२ (शब्दांकन - एकनाथ पवार)
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.