Grape Orchard Management : तापमानाचा द्राक्ष बागेवरील परिणाम आणि त्यावरील संभाव्य उपाययोजना

द्राक्ष बागेत काही ठिकाणी वादळी पावसासोबत गारपीट झाली असेल, तर काही ठिकाणी सतत ढगाळ वातावरणामुळे तापमानामध्ये बदल झालेले असतील.
Grape Orchard Management
Grape Orchard ManagementAgrowon
Published on
Updated on

डॉ. आर. जी. सोमकुंवर, डॉ. अजयकुमार उपाध्याय, डॉ. सुजॉय साहा

Grape Orchard : द्राक्ष बागेत काही ठिकाणी वादळी पावसासोबत गारपीट झाली असेल, तर काही ठिकाणी सतत ढगाळ वातावरणामुळे तापमानामध्ये बदल झालेले असतील.

काही वेळा बागेत तापमानामध्ये अचानक घट झालेली आढळून येईल, तर काही ठिकाणी तापमान वेगाने वाढलेले दिसून येईल. या तापमानाचा बागेत परिणाम आणि त्यावरील संभाव्य उपाययोजना यांची माहिती घेऊ.

अचानक फुटी सुकण्याची समस्या

जुन्या बागेमध्ये खरडछाटणी झाल्यानंतर डोळे फुटून फुटी निघायला सुरुवात होते. वातावरणातील तापमानात जास्त प्रमाणात (४२ अंश सेल्सिअसपर्यंत) वाढ झाल्यामुळे आर्द्रतेचे प्रमाण तितकेच कमी (३० टक्क्यांपर्यंत) झालेले दिसेल. त्यामुळे वेलीच्या शरीरशास्त्रीय हालचालीमध्ये बऱ्यापैकी अडचणी येताना दिसतील.

तापमानात वाढ होतानाच तितक्या प्रमाणात बागेत वारेही वाहताना अनुभवास येईल. यामुळे बोदामधील पाणीही लवकर निघून जाईल. वेलीच्या प्रत्येक भागामधून (खोड, ओलांडा व डोळा) पाणी तितक्याच प्रमाणात बाहेर जाईल. त्याचा वेलीच्या शरीरशास्त्रीय हालचालीवर प्रभाव पडतो.

द्राक्ष बागेसाठी चांगले वातावरण म्हणजे तापमान ३० ते ३५ अंश सेल्सिअस आणि आर्द्रता ५० ते ६० टक्के होय. या बागेत चांगले परिणाम मिळतात. मात्र सध्या वाढत असलेल्या तापमानामध्ये ही परिस्थिती उपलब्ध नाही. त्यामुळे काडीमध्ये रसरशीतपणा नाहीसा होतो.

Grape Orchard Management
Grape Management : पाऊस, गारपीट यांचा द्राक्ष बागेतील परिणाम

डोळे फुटण्याकरिता ओलांडासुद्धा रसरशीत (सॅप फ्लो सुरळीत ) असणे आवश्यक असेल. ही परिस्थिती नसल्यामुळे वेलीतील सोर्स सिंक चे संतुलन बिघडल्यामुळे डोळे फुटण्याची प्रक्रिया काहीशी मंदावते. डोळ्यामध्ये जी काही अन्नद्रव्याची साठवण होते, त्या अन्नद्रव्यांच्या वापरातूनच डोळा फुटतो व वाढ होण्यास सुरुवात होते.

मात्र या वाढत्या तापमानामुळे व अपुऱ्या पाण्यामुळे तीन ते चार पानांची झालेली फूट ही अचानक सुकताना दिसून येईल. रोगाचा प्रादुर्भाव असल्यामुळे या फुटी जळत असल्याची शंका बागायतदारांना येते. मात्र या तापमानात कोणताही रोग येण्याची शक्यता जवळपास शून्य असते.

मुळांच्या कक्षेत कदाचित पाण्याच्या कमी जास्त वहनामुळे मुळांवर काही विपरीत परिणाम होऊ शकतात. मात्र नवीन निघत असलेल्या फुटी तापमान आणि पाणी या घटकांमुळे फुटी जळताना आढळून येतील.

उपाययोजना

- बागेत नवीन फुटी निघत असताना एकतर शेडनेटचा वापर करून फुटी झाकून घ्याव्यात.

- जवळपास सबकेन होईपर्यंत अधून मधून पाण्याची फवारणी करत राहावी. यामुळे पानातील पेशींमध्ये योग्य रस (टर्गर प्रेशर) टिकून राहण्यास मदत होईल.

- जमिनीमध्ये मुळांच्या कक्षेत पाणी वाफसा स्थितीमध्ये राहील, अशा प्रकारे पाण्याचे नियोजन असावे.

-या वाढत्या तापमानामध्ये सुरुवातीच्या काळात डोळे फुटण्यासाठी उशीर लागत असला तरी त्यानंतर फूट जोमात वाढते. तेव्हा सुरुवातीच्या काळात तीन ते चार पाने अवस्थेपासून नत्र आणि पाणी वेलीला पुरेसे मिळेल, याची काळजी घ्यावी.

२) अचानक द्राक्षवेली सुकण्याची समस्या

द्राक्ष बागेत मागील हंगामात कलम केल्यानंतर डोळे फुटून वाढ होण्यास सुरुवात होते. त्या काळात पाऊस जास्त असल्यामुळे बागेत आर्द्रतेचे प्रमाण जास्त वाढून रोगाचा प्रादुर्भाव तितकाच वाढतो. कलम केलेल्या बागेमध्ये ही वाढ खुंटताना दिसून येते.

बागेतील विविध परिस्थितीमुळे प्रत्येक वेलीची वाढ एकसारखी होत नाही. त्यामुळे जानेवारी -फेब्रुवारी महिन्यात रिकट घेणे गरजेचे होते. रिकट घेतल्यानंतर बागेत फुटी निघायला सुरुवात होते व आपण वेलीचा सांगाडा (म्हणजेच खोड, ओलांडा व मालकाडी) तयार करतो. ओलांडा तयार होतेवेळी साधारणतः तापमान ३५ अंशापर्यंत असते.

ओलांड्याच्या पहिला टप्पा तयार होत असताना साधारणपणे चार ते पाच काड्या आपण तयार करतो. या काड्या तयार होऊन जेव्हा ओलांड्याचा दुसरा टप्पा तयार होतो अशा वेळी बागेतील तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढे गेलेले दिसेल. ओलांडा व त्यावर मालकाडी चांगल्या तऱ्हेने तयार व्हावी, यासाठी बागेत पाण्याचा पुरवठा जास्त प्रमाणात करतो.

यामुळे वेलीवर अचानक दाब निर्माण होऊन वाढत्या तापमानात एकतर मुळे काळी पडून खराब होताना दिसते. त्याच सोबत द्राक्षवेल सुकलेली दिसेल. वेलीच्या शरीरशास्त्रीय हालचालीवर अचानक दाब निर्माण झाल्यामुळे पहिल्या दिवशी द्राक्ष वेलीवर दोन ते तीन पाने सुकलेली दिसतील, तीच वेल सायंकाळपर्यंत काही प्रमाणात सुकलेली दिसेल. (तणनाशकांची फवारणी केल्याप्रमाणे लक्षणे दिसून येतील.) दुसऱ्या दिवशी मात्र पूर्ण वेल सुकलेली दिसून येते.

बागेत वाढत्या तापमानात अचानक वाढवलेल्या पाण्यामुळे वेलीचे सोर्स सिंक संबंध व संतुलन बिघडते. पुरवठा, उपलब्धता आणि गरज या गोष्टींचा ताळमेळ बसत नसल्यामुळे फुटी सुकायला सुरुवात होते. बागेत एक पट्ट्यातील वेली सलग सुकताना दिसत नाहीत.

त्याऐवजी वेगवेगळ्या ठिकाणी एक दोन वेली सुकल्याप्रमाणे दिसतील. बागेमध्ये जमीनही एकसारखी नसेल. काही ठिकाणी सुकलेल्या द्राक्षवेलीची माती पाहताना हलकी ते मुरूम असलेली जमीन दिसेल, तर दुसऱ्या परिस्थितीत सुकलेली द्राक्षवेल काळ्या मातीतही दिसेल.

तयार होत असलेल्या खोडाची साल काढल्यास त्यातून पाणी किंवा चिकटद्रव्य निघताना दिसेल. मुळांच्या तपासणी प्रयोगशाळेत केली असल्यास फ्युजारिअम रोगाचा मुळांवर प्रादुर्भाव दिसून येतो. ही परिस्थिती जरी बागेत अचानक दिसून येत असली एक द्राक्ष वेल सुकताना दिसून येताच त्वरित उपाययोजना कराव्यात.

Grape Orchard Management
Grape Disease Management : अवकाळीनंतर द्राक्ष बागेतील रोग व्यवस्थापन कसे करावे?

उपाययोजना

- कार्बेन्डाझिम दीड ग्रॅम अधिक इमिडाक्लोप्रीड (१७.८ एसएल) १.५ मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणे एकत्र द्रावण तयार करून त्याची आळवणी खोडाच्या बुडावरही पडेल, या प्रमाणे करावी. परिस्थितीनुसार प्रति वेल एक ते दीड लिटर द्रावण वापरावे.

बागेत दहा पेक्षा जास्त वेली सुकताना दिसत असल्यास पुन्हा एकदा या द्रावणाचे ड्रेचिंग तिसऱ्या दिवशी करून घ्यावे. जास्त प्रमाणात वेली सुकत नसल्यास पहिल्या ड्रेचिंगनंतर तिसऱ्या दिवशी हेक्साकोनॅझोल एक मि.लि. किंवा टेब्युकोनॅझोल एक मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणे खोडाच्या बुडावर टाकावे.

- या समस्येवर नियंत्रण मिळताच ट्रायकोडर्मा दोन ते तीन लिटर प्रति एकर प्रमाणे तीन दिवसाच्या अंतराने तीन ते चार वेळा ड्रेंचिग करून घ्यावे. एक दोन वेळा हाताने ड्रेचिंग करावे. एक- दोन वेळा ठिबकद्वारे ट्रायकोडर्मा सोडता येईल.

- या काळात बागेत सबकेनकरिता शेंडा खुडणीचे काम टाळावे. या वेळी वेलीला शॉक बसल्यामुळे वाढ तशीही खुंटलेली असेल. अशा वेळी वेलीला पाणी वाफसा परिस्थितीइतकेच देऊन त्या सोबत युरिया दीड ते दोन किलो प्रति एकर या प्रमाणे दोन दिवसाच्या अंतराने दोन वेळा ठिबकद्वारे द्यावा. यामुळे वेलीच्या फुटीचा जोम थोडाफार वाढताना दिसेल. वेलीला ताण बसणार नाही.

संपर्क - डॉ. आर. जी. .सोमकुंवर, ९४२२०३२९८८, (राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, जि. पुणे.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com