Grape Orchard : वाढत्या तापमानाचा द्राक्ष बागेवर होणार परिणाम

Temperature Effect On Vineyard : सध्याच्या परिस्थितीत बागेतील वातावरणाचा विचार करता, प्रत्येक ठिकाणी तापमान ४२ अंश सेल्सिअसच्या पुढे तापमान वाढलेले असून, तितक्याच प्रमाणात आर्द्रता कमी झालेली आहे.
Grape Orchard
Grape OrchardAgrowon
Published on
Updated on

डॉ. आर. जी. सोमकुंवर, डॉ. राहुल यादव

Grape Orchard Management : सध्याच्या परिस्थितीत बागेतील वातावरणाचा विचार करता, प्रत्येक ठिकाणी तापमान ४२ अंश सेल्सिअसच्या पुढे तापमान वाढलेले असून, तितक्याच प्रमाणात आर्द्रता कमी झालेली आहे. या वेळी बागेत द्राक्ष वेलीच्या वाढीच्या वेगवेगळ्या अवस्था आढळून येतील.

त्यापैकी जुन्या बागेत सबकेन तयार करण्याची अवस्था असेल, नवीन बागेत ओलांडा तयार करण्याची प्रक्रिया सुरू असेल, तर खुंट रोपांची लागवड केलेल्या ठिकाणी रोपांची वाढ सुरू असेल. अशा परिस्थितीत बागेत या तापमानाचा विपरीत परिणाम व त्यावर संभाव्य उपाययोजना या बाबत माहिती घेऊ...

१) सबकेन तयार होत असलेली बाग

जुन्या बागेत खरडछाटणी उशिरा झाली असल्यास, या वेळी वाढत्या तापमानात डोळे फुटतेवेळी अडचणी येतात. प्रखर सूर्यप्रकाशाची किरणे डोळ्यांवर जास्त काळ पडल्यामुळे डोळ्यातील पेशी सुकतात, जळतात किंवा मरतात. त्यामुळे डोळे फुटत नाहीत किंवा कमकुवत डोळे फुटतात व कालांतराने ओलांडा डागाळण्याची समस्या निर्माण होते.

दुसऱ्या परिस्थितीतील बागेत ३ ते ४ पानांची अवस्था असल्यास, वाढत्या तापमानात फुटी सुकण्याची समस्या दिसून येईल. निघत असलेल्या फुटींवरील पानांचे वय कमी असल्यामुळे ही पाने स्वतः अन्नद्रव्ये तयार करू शकत नाहीत. त्यामुळे ही पाने काडीतून किंवा ओलांड्यातून अन्नपुरवठा करून अन्नद्रव्यांची गरज पूर्ण करतात.

एकदा पानाचे वय व आकार वाढल्यास, प्रकाश संश्‍लेषणाच्या माध्यमातून स्वतःचे अन्नद्रव्य तयार करून वेलीच्या शरीरशास्त्रीय हालचालींचा वेग सुरळीत होतो. परंतु तीन ते चार पाने अवस्थेत वाढत्या तापमानात पानांद्वारे बाष्पीभवन जास्त प्रमाणात होते. त्यामुळे पुरवठा आणि उपलब्धता यामध्ये ताळमेळ बसत नसल्यामुळे पानांमध्ये पाण्याची गरज वाढते. ही गरज पूर्ण न झाल्यामुळे पानांच्या कडा सुकताना दिसून येतात.

Grape Orchard
Vinyard Save From Hailstorm : प्रयोगशीलतेने गारपिटीत वाचवली द्राक्ष बाग

सबकेन झालेल्या परिस्थितीतील द्राक्ष बागेत या वेळी बगलफुटी निघत असताना पोषक वातावरण असणे गरजेचे आहे. बागेत पुरेसे पाणी व कमी तापमान यांचा समावेश पोषक वातावरणात होतो.

तापमान जास्त असलेल्या बागेत वारे जास्त प्रमाणात वाहत असल्याचा अनुभव येईल. या वेळी जमिनीतून सुद्धा पाणी जास्त प्रमाणात निघून जाईल. जास्त तापमानामुळे पानांतून होणाऱ्या बाष्पीभवनाचा वेगही जास्त असेल. त्यामुळे सबकेनकरिता पिचिंग केल्यानंतर बगलफूट निघण्याकरिता अडचणी येऊ शकतात.

हलक्या जमिनीतील द्राक्ष बागेत पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी असल्यामुळे पाण्याची गरज जास्त असते. या वेळी बागेत सबकेननंतर बगलफुटी निघणे महत्त्वाचे आहे. हलकी जमीन असेल, पाणी पुरेसे नसेल व सबकेन करण्याच्या अवस्थेत तापमानात वाढ झाली असल्यास शेंडा पिचिंग केल्यानंतर बगलफुटी निघणार नाही अशी शक्यता वाटत असल्यास सबकेन करणे टाळावे. या परिस्थितीत सरळ काडी ठेवली तरी सूक्ष्म घड निर्मितीमध्ये अडचणी येणार नाही.

उपलब्ध पाण्याचा पुरेपूर वापर होऊन वेलीला त्याचा फायदा व्हावा, याकरिता सिंचन सकाळी किंवा सायंकाळी करावे. ड्रीपलाइन जमिनीवरती घ्यावी, बोदावर गवत किंवा उसाचे पाचट किंवा बगॅस यांचे आच्छादन करून घ्यावे. बागेत वारे वाहत असलेल्या दिशेने शेडनेट लावून घ्यावे. यामुळे पाण्याची बचत होऊन आणि वेलीची वाढ सुरळीत राहील.

सबकेन केल्यानंतर निघालेल्या बगलफुटीवर सात पानांच्या अवस्थेत पाचव्या पानांवर शेंडा पिचिंग केले जाते. या वेळी जर बागेत तापमानात जास्त प्रमाणात वाढ झालेली असल्यास, तात्पुरते शेंडा पिचिंग थांबवून घ्यावे. वाढत्या तापमानात बागेत पाणी कमी असल्यास व फुटींची वाढ जोमात होणार नाही असा अनुभव आल्यास खतांचा वापरसुद्धा नियंत्रित ठेवावा.

बऱ्याचदा शेंडा वाढत नसल्याचे पाहून बागायतदार खतांचे डोस वाढविण्याचा प्रयत्न करतात. परंतु जर बागेत पाण्याचा पुरवठा कमी असल्यास, अन्नद्रव्यांचा पुरवठा देखील खंडित होईल आणि वाढीवर त्याचे परिणाम मिळणार नाहीत. या वेळी बागेत रोगांचा प्रादुर्भाव नसेल, त्यामुळे बुरशीनाशकांच्या फवारण्या टाळता येतील. अचानक ढगाळी वातावरण किंवा पाऊस पडलेल्या परिस्थितीत बागेमध्ये बगलफुटी निघताना तसेच शेंडा वाढदेखील दिसून येईल. सूक्ष्म घड

निर्मितीतील अशा बागेत शेंडा पिचिंग करून बगलफुटी काढणे महत्त्वाचे असेल. त्याचसोबत संजीवकांचा वापर महत्त्वाचा असेल. या वेळी ६ बीए या संजीवकाची १० पीपीएमची १ फवारणी व स्फुरद व पालाशयुक्त खतांची फवारणी ३ दिवसांच्या अंतराने करून घ्यावी.

जर बागेत मोकळी कॅनोपी असल्यास फुटींची वाढ नियंत्रणात असेल, तर संजीवकांची फारशी गरज पडणार नाही. मोकळी कॅनॉपी व नियंत्रित वाढ असलेल्या काडीवरील डोळ्यांवर एकसारख्या तीव्रतेचा सध्या उपलब्ध असलेला सूर्यप्रकाश सूक्ष्म घड निर्मितीकरिता पुरेसा होईल.

लवकर छाटणी झालेल्या बागेत (फेब्रुवारी महिन्यात) या वेळी काडी परिपक्वतेचा कालावधी असेल. वाढत्या तापमानामध्ये जर वाढ नियंत्रणात असल्यास, काडी तळापासून दुधाळ रंगाची किंवा तीन ते चार पेरे तपकिरी रंगाचे झाल्याची परिस्थिती दिसेल. अशा बागेत फार काही करण्याची गरज नसेल. वाढ हळू चालेल व काडी पूर्णपणे परिपक्व होईल. वाढीच्या या अवस्थेत थोड्याफार प्रमाणात पालाशयुक्त खतांचा वापर ड्रीपद्वारे करावा.

२) नवीन ओलांडा तयार होत असलेली बाग

रिकट घेतल्यानंतर बागेत खोड आणि ओलांडा तयार करून त्यावर मालकाडी तयार करण्याची प्रक्रिया सुरु होते. यावेळी बागेत कमी तापमान (३५ अंश सेल्सिअस) व जास्त आर्द्रता असल्यास (६० टक्क्यांपर्यंत) फुटींचा जोम चांगला मिळतो. पानांचा आकार देखील तितकाच वाढतो. बऱ्याचशा बागेत सबकेनचा पहिला टप्पा जवळपास संपत आला असेल.

ओलांड्यावर काड्या तयार करण्याकरिता पिचिंग केल्यानंतर निघालेल्या बगलफुटीवर ३ ते ४ पानांच्या अवस्थेत शेंडा पिचिंग करावे लागते. यालाच ‘आखूड सबकेन’सुद्धा म्हटले जाते. या वेळी जर बागेतील तापमानात जास्त वाढ झाली असल्यास, बगलफुटी निघण्याची शक्यता कमी असेल. अशावेळी बागेत पाणी वाढविणे फायद्याचे राहील.

Grape Orchard
Grape Crop Damage : लासलगावात निर्यातक्षम द्राक्ष बाग भुईसपाट

याचसोबत ओलांड्यावरील निघालेल्या फुटींवर पाण्याची फवारणी रोज सायंकाळी किमान एक आठवडा करावी. या पाण्यात युरिया अर्धा ग्रॅम प्रति लिटर पाणी प्रमाणे मिसळून घ्यावे. असे केल्याने नवीन फुटी वाढण्यास मदत होईल. काही बागेत ओलांड्याचा दुसरा टप्पा तयार करण्याची प्रक्रिया सुरू असेल.

या वेळी ओलाड्याच्या पहिल्या टप्प्यावरील निघालेल्या फुटीची वाढ नियंत्रणात ठेवण्याकरिता व त्यावर सूक्ष्मघड होण्याच्या दृष्टीने बागायतदार स्फुरद आणि पालाशयुक्त खतांची फवारणी करून जमिनीतून ड्रीपद्वारे उपलब्धता करतात. परंतु वाढत्या तापमानातील या अवस्थेतील बागेत खतांचा वापर टाळावा. अन्यथा, ओलांड्याचा दुसरा टप्पा तयार होण्यास अडचणी येतील.

कोवळ्या फुटी असलेल्या बागेत वाढत्या तापमानात थ्रीप्स या किडीचा प्रादुर्भाव दिसून येईल. त्या वेळी आवश्यक त्या उपाययोजना करून घ्याव्यात.

संपर्क - डॉ. आर. जी. सोमकुंवर, ९४२२०३२९८८, (राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, जि. पुणे)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com