Kardai Crop : सुधारित पद्धतीने करडई लागवड

Kardai harvesting : करडई हे पीक कमी पाण्यात येणारे व अवर्षणाचा ताण सहन करणारे पीक आहे. त्यामुळे कोरडवाहू क्षेत्रामध्ये रब्बी हंगामात पीक उत्पादकता वाढविण्यासाठी करडई पिकाची लागवड फायदेशीर ठरते. पेरणी सप्टेंबरच्या दुसरा पंधरवडा ते ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत करण्याची शिफारस आहे. बागायती करडईची पेरणी ऑक्टोबर अखेरपर्यंत करावी.
Kardai Crop
Kardai CropAgrowon
Published on
Updated on

Cultivation of Kardai : कोरडवाहू क्षेत्रामध्ये रब्बी हंगामातील महत्त्वाचे तेलबियाचे पीक म्हणून करडई पीक ओळखले जाते. करडई हे पीक कमी पाण्यात येणारे व अवर्षणाचा ताण सहन करणारे पीक आहे. करडई पिकाची मुळे जमिनीमध्ये खोल जात असल्यामुळे, जमिनीतील खालच्या थरातील अन्नद्रव्ये आणि ओलाव्याचा उपयोग करून घेते. पिकाच्या पानांवर काटे येत असल्यामुळे पर्णोत्सर्जन कमी होऊन पीक प्रतिकूल परिस्थितीत तग धरते. इतर पिकांच्या तुलनेत अगदी कमी उत्पादना खर्चामध्ये कोरडवाहू क्षेत्रात करडई लागवडीतून चांगले उत्पन्न मिळते. करडईच्या लागवडीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यास अधिक फायदा मिळवता येतो.

करडई पिकाखालील क्षेत्र कमी होण्याची कारणे ः

- शिफारशीत खतमात्रांचा अभाव.

- हलक्या जमिनीत लागवड.

- सतत एकाच जमिनीत सलग पीक घेणे.

- स्थानिक वाणांचा वापर.

- संकरित व सुधारित वाणांचे बियाणे सहज उपलब्ध न होणे.

- उशिरा किंवा लवकर पेरणी.

- मावा कीड तसेच मर व करपा रोगाचा प्रादुर्भाव.

- काटेरी झाडांमुळे काढणीसाठी मजुरांची उपलब्धता न होणे. यांत्रिकीकरणाची दुर्मीळता.

Kardai Crop
Safflower Production : करडई उत्पादनात नांदेडचा राज्यात डंका

जमीन ः

- मध्यम ते भारी (खोल), पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन निवडावी. ४५ सेंमीपेक्षा जास्त खोल जमिनीत पीक चांगले येते.

- करडईची मुळे खोल जात असल्यामुळे जमिनीची खोल नांगरट करावी. त्यानंतर कुळवाच्या ३ ते ४ पाळ्या द्याव्यात.

- लागवडीपूर्वी ६ बाय ६ मीटर किंवा १० बाय १० मीटर आकाराचे सपाट वाफे किंवा सरी वरंबे तयार करून मूलस्थानी जलसंधारण करावे.

- शेवटच्या कुळवाच्या पाळी अगोदर जमिनीत चांगले कुजलेल शेणखत किंवा कंपोस्ट खत हेक्टरी १२ ते १३ गाड्या प्रमाणे मिसळावे.

वाण निवड ः

काटेरी जाती ः भीमा, फुले कुसुमा, एसएसएफ ७०८, फुले करडई, फुले चंद्रभागा,

बिगर काटेरीचे वाण ः नारी ६ (सरळ वाण) आणि नारी एन. एच. १ (संकरित वाण).

पेरणीची वेळ ः

- करडईची पेरणी योग्य वेळी करणे फार महत्त्वाचे आहे. लवकर पेरणी (सप्टेंबर पहिला पंधरवडा) केल्यास पानावरील ठिपके या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होतो. या उलट उशिरा पेरणी केल्यास (ऑक्टोबरचा दुसरा आठवडा) पीकवाढीची अवस्था थंडीच्या काळात येते. या काळात पिकावर मावा किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होऊन उत्पादनात घट मोठी येते.

- करडईची पेरणी सप्टेंबरच्या दुसरा पंधरवडा ते ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत करण्याची शिफारस आहे. बागायती करडईची पेरणी ऑक्टोबर अखेरपर्यंत करावी.

पेरणी ः

- कोरडवाहू क्षेत्रात दोन ओळींत ४५ सेंमी आणि दोन रोपांत २० सेंमी अंतर ठेवावे.

- पेरणी दोन चाड्याच्या पाभरीने करावी.

- पेरणीसाठी हेक्टरी १० ते १२ किलो बियाणे पुरेसे होते.

बीज प्रक्रिया ः

- पेरणीपूर्वी,

थायरम २.५ ग्रॅम प्रतिकिलो बियाण्यांस चोळावे. त्यामुळे उगवणीनंतर करडईचे पीक बुरशीजन्य रोगांपासून सुरक्षित राहील.

- ॲझोटोबॅक्टर किंवा ॲझोस्पिरिलम २५ ग्रॅम अधिक पी.एस.बी. २५ ग्रॅम प्रति किलो बियाण्यांस चोळावे. त्यामुळे हवेतील नत्र स्थिरीकरण होऊन उत्पादनात वाढ होते.

आंतरपीक पद्धती ः

सोलापूर येथील अखिल भारतीय तेलबिया करडई संशोधन प्रकल्पातंर्गत झालेल्या संशोधनावरून, हरभरा अधिक करडई (६:३) आणि जवस अधिक करडई (४:२) या आंतरपीक पद्धती फायदेशीर ठरत असल्याचे दिसून आले.

खत व्यवस्थापन ः

- पेरणीवेळी दोन चाड्याच्या पाभरीने नत्र ५० किलो (युरिया ११० किलो) आणि स्फुरद २५ किलो (सिंगल सुपर फॉस्फेट १५६ किलो) प्रति हेक्टर प्रमाणे पेरून द्यावीत.

- बागायती पिकास ६० किलो नत्र, ३० किलो स्फुरद प्रति हेक्टरी द्यावे.

विरळणी ः

- उगवणीनंतर १० ते १२ दिवसांनी चांगले जोमदार रोपे ठेवून पिकामध्ये विरळणी करावी.

- दोन रोपांमध्ये २० सेंमी अंतर ठेवावे.

आंतरमशागत ः

- रब्बी हंगामात गरज असल्यास एखादी खुरपणी करावी.

- दोन ते तीन कोळपण्या करून पीक तणविरहित ठेवावे.

- पहिली कोळपणी पेरणीनंतर तिसऱ्या आठवड्यात फटीच्या कोळप्याने, दुसरी कोळपणी ५ व्या आठवड्यात अखंड पासाच्या कोळप्याने आणि तिसरी कोळपणी ८ व्या आठवड्यात दातेरी कोळप्याने करावी.

सिंचन व्यवस्थापन ः

- हे पीक अवर्षण प्रतिकारक असल्यामुळे पिकाच्या संपूर्ण कालावधीत वाढीस कमी पाणी लागते.

- मध्यम ते भारी जमिनीत पुरेसा ओलावा असल्यास पेरणीनंतर पाणी देण्याची गरज भासत नाही.

- पेरणीनंतर ३० ते ३५ दिवसांनी जमिनीस तडे जाण्यापूर्वी एक संरक्षित पाणी देणे अधिक चांगले. दुसरे पाणी पीक फुलोऱ्यात येताना ५५ ते ६० दिवसांनी द्यावे.

- जास्त पाण्यामुळे पीक मर रोगास बळी पडते. म्हणून करडई पिकास हलके पाणी द्यावे.

- डॉ. आदिनाथ ताकटे, ९४०४०३२३८९

(डॉ. राजगुरू हे करडई संशोधन प्रकल्प, सोलापूर येथे करडई पैदासकार, तर

डॉ. ताकटे, हे एकात्मिक शेती पद्धती, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे कार्यरत आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com