डॉ. गणेश कोटगिरे, भरत पवार
भाग -२
मर
रोगकारक बुरशी - फ्यूजारिअम सॅकॅराय
कोणत्याही कारणाने जमिनीतील कांड्यास इजा झाल्यास (उदा. कांडी पोखरणाऱ्या अळी - रूट बोररचा प्रादुर्भाव) तिथून बुरशीचा शिरकाव होऊन रोगाचा प्रादुर्भाव वाढतो. कोसी ६७१ आणि कोे ८६०३२ या ऊस जातीमध्ये महाराष्ट्रात या रोगाचे प्रमाण अत्यल्प आढळले आहे.
मात्र एकेकाळी गुजरात राज्यामध्ये कोसी ६७१ या जातींमध्ये या रोगाच्या प्रादुर्भावामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले होते. परिणामी तिथे या जातीच्या लागवडीस प्रतिबंध केला होता.
लक्षणे -
दुर्लक्षित पिकात मर या रोगाचा प्रादुर्भाव जमिनीतील कांड्यामध्ये प्रथम होतो. रोगग्रस्त बेटातील उसाची शेंड्याकडील पाने निस्तेज दिसतात. हळूहळू पिवळी पडण्यास सुरुवात होते. सुरुवातीला पानांच्या कडा करपतात. नंतर रोगाची तीव्रता वाढल्यानंतर रोगग्रस्त बेटातील पाने व ऊस वाळतात. ऊस शेंड्याकडून वाळत जातात.
शेतात जागोजागी अशी सुकलेली व वाळलेली बेटे दिसून येतात. वाळलेल्या उसाचा काप घेतल्यास पोकळ कांड्यात बुरशीची पांढरी वाढ आढळते. रोगामुळे ऊस पोकळ होऊन रसहीन बनतो. परिणामी उसाचे टनेज व साखरेच्या उताऱ्यातही घट येते.
प्रसार- प्रामुख्याने जमिनीद्वारे होतो. तसेच रोगग्रस्त बेणे, वारा व पाणी यामुळेही प्रसार होतो.
नियंत्रण :
-बेणेमळ्यातील बेणे लागवडीकरिता वापरावे. नवीन लागवडीपूर्वी ऊस बेण्यास बुरशीनाशकाची प्रक्रिया करावी.
- लागवड केलेल्या जमिनीतील पाण्याचा निचरा होण्यासाठी व्यवस्था असावी.
- जमिनीतील कांड्या पोखरणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी क्लोरपायरिफॉस (२० टक्के प्रवाही) प्रति एकरी २ लिटर प्रति ४०० लिटर पाणी या प्रमाणे द्रावण करून आळवणी करावी.
- रोगग्रस्त बेटे खणून काढावीत. त्या ठिकाणी कार्बेन्डाझिम १ ग्रॅम किंवा कॉपर ऑक्झिक्लोराइड १ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे द्रावण वापरावे.
- मर रोग झालेल्या उसाचा खोडवा न घेता त्या शेतात द्विदल धान्याचे पीक घेऊन फेरपालट करावी.
लाल कुज (रेड रॉट)
रोगकारक बुरशी - कोलेटोट्रिकम फालकॅट्म
हा बुरशीजन्य रोग महाराष्ट्रात कमी प्रमाणात व सोलापूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यांत नव्यानेच आढळला होता. सध्या या रोगाचा प्रादुर्भाव राज्यात उसामध्ये फारसा दिसून येत नसला तरी त्याच्या नुकसानकारकतेमुळे हा रोग अतिशय महत्त्वाचा आहे.
अनुकूल परिस्थिती मिळाल्यास रोगाच्या प्रादुर्भावामुळे ऊस पिकाचे १०० टक्क्यांपर्यंत नुकसान होऊ शकते. विशेषतः रसाची शुद्धता आणि साखर उतारा यामध्ये जास्त घट होते. अन्य ऊस उत्पादक राज्यांमध्ये त्याचा प्रादुर्भाव आढळलेला आहे.
प्रसार - ऊस बेण्याद्वारे होतो. या रोगास उसाचा कर्करोग असेही म्हणतात.
लक्षणे - प्रामुख्याने पानांवर आणि कांड्यावर दिसून येतात
अ) पानावरील लक्षणे : सुरुवातीस पानाच्या शिरेवर वरच्या बाजूस लालसर रंगाचे २ ते ३ मिमी लांबीचे आणि ०.५ मिमी रुंदीचे ठिपके आढळतात. कालांतराने ठिपक्यांची लांबी वाढत जाते. त्यानंतर पाने वाळतात. रोगाची तीव्रता वाढल्यावर शेंड्याकडील सर्व पाने वाळतात.
ब) कांड्यावरील लक्षणे :
-रोगग्रस्त उसाची पाने वाळल्यानंतर कांड्यावरती तपकिरी किंवा लालसर तपकिरी पट्टे आढळतात. कांड्या सुकतात आणि आकसून जातात.
-रोगग्रस्त उसाच्या कांड्याच्या आतील भाग पाहिला असता त्यावर लाल रंगाचे अनियमीत आकाराचे ठिपके किंवा पट्टे आढळतात. -कांड्यांच्या आतील भाग पोकळ होवून त्यामध्ये कापसासारखी आणि करड्या रंगाच्या बुरशीची वाढ आढळून येते.
-कांड्याच्या आतील भागाचा वास अल्कोहोलसारखा येतो.
-रोगाची तीव्रता वाढल्यावर आकसलेल्या कांड्यावरती काळ्या रंगाच्या असेरुलाई तयार होतात. रोगग्रस्त उसाची बेटे निस्तेज होऊन वाळतात.
नियंत्रण :
-बेणेमळ्यातील बेणे लागवडीकरिता वापरावे.
-लागवडीपूर्वी ऊस बेण्यास कार्बेन्डाझिम १ ग्रॅम प्रति लिटर पाणी या द्रावणामध्ये १५ मिनिटे प्रक्रिया करावी.
-लागवड केलेल्या जमिनीचा पाण्याचा निचरा होण्यासाठी व्यवस्था असावी.
-रोगग्रस्त बेटे खणून काढावीत. त्या ठिकाणी कार्बेन्डाझिम किंवा कॉपर ऑक्झिक्लोराइड यापैकी एका बुरशीनाशकाचे १ ग्रॅम प्रति लिटर पाणी हे द्रावण वापरावे. तसेच ट्रायकोडर्मा व्हिरीडी (द्रवरूप स्वरुपात) १ लिटर प्रति २०० लिटर पाण्यातून जमिनीद्वारे द्यावे.
-रेड रॉट झालेल्या उसाचा खोडवा न घेता त्या शेतात द्विदल धान्याचे पीक घेऊन फेरपालट करावी.
-पानावर रोगाची लक्षणे आढळल्यानंतर लगेचच कार्बेन्डाझिम १ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे १५ दिवसांच्या अंतराने स्टीकर वापरून गरजेनुसार २ ते ३ फवारण्या कराव्यात.
यलो लीफ डिसिज (यलो लीफ सिंड्रोम)
- हा विषाणूजन्य रोग यलो लीफ व्हायरस या विषाणूमुळे होतो. रोगाचा प्रसार मावा कीड आणि बेण्याद्वारे होतो. रोगाच्या प्रादुर्भावामुळे ४ ते १० टक्के पर्यंत ऊस पीक आणि साखरेच्या उत्पादन घट येण्याची शक्यता असते.
- लागण पिकापेक्षा खोडवा पिकात रोगाचे प्रमाण जास्त आढळते.
- दक्षिण भारतात या रोगाचे प्रमाण झपाट्याने वाढत असून, को ८६०३२ ही ऊसाची जात अधिक धोक्यात येण्याची शक्यता आहे.
लक्षणे
- पीक ७ ते ८ महिन्यांचे झाल्यानंतर रोगाचा प्रादुर्भाव दिसण्यास सुरुवात होते.
- सुरुवातीस पानाची मध्य शिर खालील बाजूने पिवळी पडते. प्रथम ३ ते ६ क्रमांकाच्या पानांवर रोगाची लक्षणे आढळतात. कालांतराने पिवळेपणा मध्यशिरेपासून बाजूस वाढत जाऊन पूर्ण पान पिवळे पडते. हळूहळू सर्व पाने पिवळी पडून शेड्याकडून वाळत जातात. काही वेळेस रोगग्रस्त पाने शिरेलगत लालसर दिसतात.
- किडींचा प्रादुर्भाव, अतिथंडी तसेच अन्नद्रव्यांचा ताण या बाबींमुळे रोगाची तीव्रता वाढते.
नियंत्रण
- उती संवर्धित रोपांपासून बेण्याची वाढ केलेल्या बेणे मळ्यात रोगाचे नियंत्रण होते. म्हणून अशा बेणेमळ्यातून लागणीसाठी बेणे घ्यावे.
- पिकात तणांचा प्रादुर्भाव कमी राहील याची काळजी घ्यावी.
उन्हाळा हंगामात करावयाचे प्रतिबंधात्मक उपाय ः
- लागवडीकरिता निचरायुक्त जमिनीची निवड करावी. लागवडीपूर्वी जमिनीच्या समस्या टाळण्यासाठी चांगल्या पद्धतीने पूर्वमशागत करावी.
- पाण्याची उपलब्धता विचारात घेऊन पीक क्षेत्राचे नियोजन करावे.
- ऊस लागवडीकरिता रूंद सरी किंवा पट्टा पद्धतीने रानबांधणी करावी.
- बेण्यास लागणीपूर्वी, कार्बेन्डाझिम १० ग्रॅम आणि इमिडाक्लोप्रिड (७० टक्के) ३.६ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून १० ते १५ मिनिटे प्रक्रिया करावी.
- माती परीक्षण अहवालानुसार सेंद्रिय, रासायनिक व जैविक खतांचा वापर करावा.
- पाण्याची कमतरता असल्यास, पिकास पाण्याचा ताण सहन करण्यासाठी म्युरेट ऑफ पोटॅशची ५० किलो प्रति एकर याप्रमाणे अतिरिक्त मात्रा द्यावी. तसेच पोटॅश (२ टक्के) २० ग्रॅम आणि केओलीन (६ टक्के) ६० ग्रॅम यांचा प्रतिलिटर पाण्यातून फवारणीद्वारे वापर करावा.
- तणनिर्मूलन, उसाची बाळबांधणी व मोठी बांधणी ही आंतरमशागतीची कामे वेळेवर करावी.
- खोडवा पिकाचे शास्त्रीय पद्धतीने नियोजन करावे.
- उसावरील किडींचे नियंत्रण वेळीच करावे. जेणेकरून रोगाच्या प्रसारास आळा बसेल.
- पिकास जैविक तसेच अजैविक ताण सहन करण्याची क्षमता वाढविण्यासाठी कायटोसायनीनयुक्त वसंत ऊर्जा एकरी १ लिटर २०० लिटर पाण्यातून फवारावे. तसेच सिलिकॉनचा वापर कॅल्शिअम सिलिकेटच्या स्वरूपात एकरी ३५० किलो याप्रमाणे जमिनीद्वारे करावा.
संपर्क - डॉ. गणेश कोटगिरे, ८७८८१५३३३२, भरत पवार, ९८९०४२२२७५
संपर्क ०२०-२६०९०२२६८- (ऊस रोगशास्त्र विभाग, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, मांजरी (बु.), पुणे)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.