
डॉ. पी. एस. नेहरकर, डॉ. अनंत लाड, डॉ. राजरतन खंदारे
Climate Change : सततच्या बदलत्या हवामानामुळे, उन्हाळ्यात पडणारा अवकाळी पाऊस यामुळे हुमणी या किडीचा प्रामुख्याने सोयाबीन, कापूस, ऊस, अद्रक व हळद या पिकांमध्ये प्रादुर्भाव वाढत आहे. या किडीमुळे पिकाचे सरासरी ३० ते ८० टक्के आर्थिक नुकसान होऊ शकते. ते टाळण्यासाठी सध्याच्या काळामध्ये बाहेर येणाऱ्या भुंगेऱ्यांच्या व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे.
सर्वसाधारणपणे मेअखरे ते मॉन्सूनच्या पहिल्या पावसानंतर जून महिन्यामध्ये जमिनीमध्ये सुप्तावस्थेतील या किडीचे प्रौढ म्हणजेच भुंगेरे हे कडुनिंब किंवा बाभळीच्या झाडावर गोळा होतात. जमिनीतून आधी मादी भुंगेरे येतात नंतर नर भुंगेरे येतात.
झाडावर संध्याकाळच्या वेळी ५ ते १० मिनिटांत मिलन होते व वेगवेगळे होऊन बाभूळ, कडुनिंब इत्यादी झाडांची पाने खाण्यास सुरुवात करतात. भुंगेरे २.५ किमी अंतरापर्यंत खाद्य शोधण्यास टप्प्याटप्प्याने जातात.
प्रौढ भुंगेऱ्यांचे व्यवस्थापन :
- उन्हाळ्यामध्ये जमिनीची खोल नांगरट करावी. त्यामुळे सुप्तावस्थेतील प्रौढ भुंगेरे जमिनीच्या पृष्ठभागावर येतात. हे भुंगेरे सूर्यप्रकाशाच्या उष्णतेमुळे किंवा पक्ष्यांनी वेचून खाल्ल्याने मरतात.
- नांगरणी केल्यानंतर उघडे पडलेले सुप्तावस्थेतील प्रौढ भुंगेरे हाताने वेचून त्यांचा नायनाट करावा.
- मे ते जून महिन्यांत चांगला पाऊस पडताच सूर्यास्तानंतर सुप्तावस्थेतील प्रौढ भुंगेरे जमिनीतून बाहेर येऊन बाभूळ, कडुलिंब इत्यादी झाडांची पाने खाण्यासाठी व मिलनासाठी जमा होतात. झाडावर जमा झालेले भुंगेरे रात्री ८ ते ९ वाजता बांबूच्या, काठीच्या साह्याने झाडाच्या फांद्या हालवून खाली पाडावेत.
झाडाखाली प्रकाशाचा स्रोत ठेवून त्याकडे आकर्षित झालेले भुंगेरे हाताने गोळा करून नष्ट करावेत. हा उपाय प्रादुर्भावग्रस्त क्षेत्रातील सर्व शेतकऱ्यांनी सामुदायिकरीत्या केल्यास अधिक फायदा होतो.
-संध्याकाळी ७.३० ते रात्री ८.३० या कालावधीत प्रकाश सापळे किंवा पेट्रोमॅक्स दिव्यांचा वापर करून, त्याकडे आकर्षित होणारे प्रौढ भुंगेरे जमा करून नष्ट करावेत.
-पक्षी, कुत्रे व वराह हे भुंगेरे खातात.
- बाभूळ, कडुनिंब, बोर, चिंच अशा प्रकारच्या झाडांवर २० पेक्षा जास्त भुंगेरे आढळल्यास मे-जूनमध्ये क्लोरपायरिफॉस (२० टक्के प्रवाही) २.५ ते ३ मिलि प्रति लिटर पाणी या प्रमाणे झाडावर फूट पंप किंवा गटर पंपाच्या साह्याने फवारणी करावी.
कीटकनाशकांची फवारणी केलेल्या बाभूळ, कडुनिंब यांच्या फांद्या शेतामध्ये ठिकठिकाणी ठेवाव्यात. रात्रीला भुंगेरे फांद्यांवरील पाने खाल्ल्यामुळे मरून जातील. झाडावरील फवारणीनंतर १० दिवस जनावरे या झाडांची पाने खाणार नाहीत, याकडे लक्ष द्यावे.
संपर्क - ०२४५२-२२८२३५, (कीटकशास्त्र विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.