कुकुटपालन प्रकल्पाची तांत्रिक व्यवहार्यता

कुकुटपालन प्रकल्पाची तांत्रिक व्यवहार्यता
कुकुटपालन प्रकल्पाची तांत्रिक व्यवहार्यता

सदाशिवने अंड्यासाठी कुक्कुटपालन हा व्यवसाय करण्याचा निश्चय केला, त्यासाठी आवश्यक ती सारी कागदपत्रे जमा केली. त्यात जमिनीचे उतारे ७/१२, ८ अ खाते उतारा, शेडचा आराखडा व अंदाजपत्रक (प्लॅन ॲण्ड एस्टिमेट), अंडी देण्यास तयार कोंबड्यांच्या खरेदी किमतीचे कोटेशन, अंडी ज्यांच्याकडे विक्री करणार, त्यांचे खरेदी या दराने करणार असल्याबाबतचे पत्र अशा कागदपत्रांचा समावेश होता. कागदपत्रे घेऊन बँकेत जाण्यापूर्वी त्याने सर्व कागदपत्रे दिगंबरला दाखवली. दिगंबरने स्वतःची डेअरी सुरू केली असल्याचे बॅंक आणि संबंधित सर्व घटकांची त्याला बऱ्यापैकी माहिती होती. बॅंकेने त्याच्या डेअरीसाठी कर्ज मंजूर केल्याने ओळखही होती. मग दिगंबर आणि सदाशिव दोघेही बॅंकेत गेले. तिथे बॅंकेच्या व्यवस्थापकांची भेट घेतली. त्यांनी दोघांनाही चांगले मार्गदर्शन केले. ते म्हणाले, “कृषीआधारित किंवा कृषीसंलग्न व्यवसाय सुरू करताना भांडवलाची आवश्यकता असते. हे भांडवल बँका किंवा विविध वित्तीय संस्था पुरवतात. मात्र, आपल्या प्रकल्पाची संपूर्ण माहिती असलेला एक प्रकल्प अहवाल त्यांच्याकडे सादर करावा लागतो. तुम्ही आणलेली कागदपत्रे बरोबर आहेत; पण तुमच्याकडे प्रकल्प अहवाल नाही. या अहवालातून व्यवसाय सुरू करण्यासाठी नेमके किती भांडवल लागणार, कोणकोणत्या बाबींसाठी ते वापरले जाणार यांचा अंदाज मिळतो. त्याचप्रमाणे या व्यवसायातून उत्पन्नांचा प्रवाह कशा प्रकारे असणार, याचीही माहिती द्यावी लागते. यातून बॅंकेच्या अधिकाऱ्यांना नेमक्या किती कर्जाची मागणी आहे, हे समजते.’’ बँक व्यवस्थापकांनी सदाशिव आणि दिगंबर यांना प्रकल्प अहवाल म्हणजे काय, तो कसा तयार करायचा याची सविस्तर माहिती दिली. त्यांनी प्रकल्पाविषयीचे माहितीपत्रक दिले. त्याचा आधार घेऊन प्रकल्प अहवाल तयार करण्यास सांगितले. त्यावर दिगंबर म्हणाला, ‘‘ते आम्ही नक्की तयार करून आणू; पण बँक किती कर्ज देणार, व्याजाचा दर काय असेल, तारण वगैरे गोष्टीही आम्हाला सांगितल्या तर बरे होईल.’’ बॅंकेतून घरी आल्याबरोबर सदाशिव कामाला लागला. त्याने माहितीपत्रकाप्रमाणे प्रकल्पाची संपूर्ण माहिती लिहिण्यास सुरुवात केली. प्रकल्प अहवाल ः प्रकल्प अहवाल म्हणजे जो व्यवसाय करावयाचा आहे, त्याचे सर्वागीण चित्र दाखविणारा दस्तऐवज. या अहवालामध्ये संभावित व्यवसायाचा संपूर्ण आराखडा मांडलेला असतो. या लिखित दस्तऐवजामध्ये प्रकल्पाच्या तांत्रिक व आर्थिक बाबींबरोबरच व्यवस्थापन घटकांचा समावेश असतो. यामुळे व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीला व बॅंकेच्या व्यवस्थापकांनाही प्रकल्पाची संपूर्ण कल्पना येण्यास मदत होते. बँकेकडून कर्ज मिळवण्यास सोईस्कर होते. प्रकल्प अहवालातील तीन बाबी

 • व्यवस्थापन
 • तांत्रिक
 • आर्थिक
 • १. व्यवस्थापन : यात सदाशिवने स्वत:ची सर्व माहिती दिली. त्यामध्ये संपूर्ण नाव, पत्ता, शिक्षण याबरोबरच आधार कार्ड, पॅन कार्ड यांच्या प्रती जोडल्या. कुक्कुटपालनाच्या प्रशिक्षणाविषयी लिहिले. २. तांत्रिक बाबी ः तांत्रिक बाबी या प्रत्येक व्यवसायासाठी तुलनेने अधिक स्थिर असतात, त्यामध्ये फारसे बदल होत नसल्याचे बॅंक व्यवस्थापकांनी सांगितले होते. सदाशिवला पुलेट फार्म किंवा अंडी उत्पादन व्यवसाय करायचा होता. त्यामध्ये एक कोंबडी वर्षामध्ये सुमारे ३०० अंडी देते, त्यासाठी तिला वर्षात ३८ किलो खाद्य लागते. कोंबडीसाठी पिंजऱ्यांची आवश्यकता असते. एका कोंबडीसाठी सुमारे १ चौरस फूट आकाराचा पिंजरा किंवा जाळी आवश्यक असते. तांत्रिक घटकांचे स्पष्टीकरण देताना सदाशिवने खालील बाबींची सविस्तर माहिती दिली. १) जागा : एकूण क्षेत्र, सर्वे नंबर, जमिनीची प्रत, पाणी निचरा क्षमता, जमिनीचा चढ- उतार, रस्त्याची सोय इ. माहिती. २) पक्षी ः पक्ष्यांची संख्या, जात, एका पक्ष्याची किंमत, वाहतूक खर्च, पक्षी मृत्यू शक्यता गृहीत धरून जादा पक्षी संख्या इ. ३) शेडचे क्षेत्र, त्याचा नकाशा व त्याच्या उभारणीच्या खर्चाचे अंदाजपत्रक याची सविस्तर माहिती. ४) पिंजरे : पिंजऱ्यांचा आकार, दोन थरांचे किंवा तीन थरांचे घेणार याची सविस्तर माहिती, ५) अंडी देण्यास तयार असलेल्या कोंबडीच्या पिलांची किंमत, पिलांची संख्या, पिलांचा पुरवठा करणाऱ्या कंपनीचे पत्र इ. सविस्तर माहिती. ६) कोंबडीसाठी खाद्य उपलब्धता व त्याचा पुरवठा इ. ७) वीज व पाणी उपलब्धता, त्याचा पुरवठा इ. ८) पशुवैद्यकीय सोयीसुविधा इ. ९) कुशल मजुरांची संख्या, उपलब्धता, साधारण त्यांचा पगार, मजुरी इ. १०) उत्पादित होणाऱ्या अंड्यांच्या विक्रीची व्यवस्था यांची माहिती इ. प्रकल्पामध्ये प्रकल्पाची जागा, प्रकल्पास लागणारी बिल्डिंग-शेड, यांत्रिक सामग्री, प्रकल्पानुसार खरेदी करावयाच्या बाबी (उदा. गाई, म्हशी - दुग्ध व्यवसायासाठी. कोंबडीची एक दिवसाची पिले, किंवा अंडी देण्यास तयार पिले (Pullet)- कुक्कुटपालन व्यवसायासाठी.) वर्षासाठी लागणारे खेळते भांडवल. व्यवसायातून मिळणारे उत्पन्न, व्यवसायातून होणारा नफा, खर्च व उत्पन्न यांचे गुणोत्तर, बँकेच्या कर्जाच्या परतफेडीचा तपशील याचा समावेश असतो. तांत्रिक व्यवहार्यता (Technical Feasibility) ः प्रकल्प अहवालामध्ये नोंदवलेली सर्व माहिती ही तांत्रिकदृष्ट्या योग्य आहे का, याचा आढावा बॅंकेचे व्यवस्थापक त्या क्षेत्रातील व्यक्तींशी बोलून खात्री करून घेतात. सोबत जोडलेली कागदपत्रे त्यासाठी महत्त्वाची ठरतात. कागदपत्रांचीही तपासणी करून बँक सदर प्रकल्प हा तांत्रिकदृष्ट्या व्यवहार्य आहे की नाही, हे ठरविते. तांत्रिक बाबी या फारशा न बदलणाऱ्या असल्याने योग्य खात्री केल्यानंतर त्या नोंदवाव्यात. आर्थिक सबलता (Financial Viability) : प्रकल्प हा आर्थिकदृष्ट्या सबल आहे, हे पाहण्यासाठी प्रकल्पाचा खर्च व उत्पन्न यांचा ताळेबंद मांडला जातो. या प्रकल्पातून उत्पन्न व खर्च याचे गुणोत्तर (BC Ratio) व परतीचा अंतर्गत दर ( IRR - Internal Rate of Return) यावरून प्रकल्पाची आर्थिक सबलता पाहिली जाते. पुढील भागामध्ये आर्थिक सबलतेची माहिती घेऊ.

  Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

  ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

  Related Stories

  No stories found.
  Agrowon
  agrowon.esakal.com