अळी पानांच्या देठात, कोवळ्या शेंड्यात, फुलात किंवा फळात शिरून उपजीविका करते. अळी पानाच्या मुख्य शिरांतून देठात आणि त्यानंतर शेंड्यात प्रवेश करते. अळीने शेंडा आतून पूर्णपणे पोखरल्याने कीडग्रस्त शेंडे सुकून वाळलेले दिसतात. पीक फुलोऱ्यावर आल्यानंतर अळी कळी पोखरून आत शिरते. प्रादुर्भावग्रस्त फुले फळ न धरता वाळून, सुकून जमिनीवर गळून पडते. लहान फळांमध्ये अळी हिरव्या पाकळीच्या आतून फळामध्ये प्रवेश करून विष्ठेद्वारे प्रवेशद्वार बंद करते. त्यामुळे बाहेरून फळ किडके आहे की नाही हे ओळखणे अवघड जाते. अळी फळात शिरल्यावर आतील गर खाते विष्ठा आतच सोडते. आर्थिक नुकसान पातळी ः ५ टक्के शेंड्यांचे किंवा फळांचे नुकसान अळीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीच्या वर गेल्यास खालीलपैकी एका कीटकनाशकाची फवारणी करावी. इमामेक्टीन बेंझोएट (५ एसजी) ०.४ ग्रॅम किंवा लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (५ टक्के ईसी) ०.५ मिलि किंवा थायोडिकार्ब (७५ डब्ल्यूपी) २ ग्रॅम किंवा पायरिप्रॉक्सीफेन (५ टक्के) अधिक फेनप्रोपॅथ्रीन १५ टक्के (संयुक्त कीटकनाशक) १ मिलि किंवा क्लोरअँट्रानिलिप्रोल (१८.५ एसी) - ०.४ मिलि कीडग्रस्त शेंडे व फळे आढळून आल्यास लगेच तोडून नष्ट करावीत. पीक फुलोऱ्या येण्याअगोदर एकरी ४ कामगंध सापळे किंवा नरसाळा सापळे लावावेत. नर पतंग आकर्षित होऊन अडकतात. नर मादीचे मिलन होत नाही, पुढील पिढी निर्माण होण्यास अडथळे येतात. एकरी ट्रायकोग्रामा चिलोनिस प्रजातीचे ट्रायकोकार्ड २-३ लावावेत. ॲझाडीरॅक्टीन (१०,००० पीपीएम) ३ मिलि प्रति लिटर पाण्यात मिसळून प्रतिबंधात्मक फवारणी करावी. - डॉ. संजोग बोकन, ९९२१७५२००० (कृषी कीटकशास्त्र विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)