डाळिंब फळपिकातील तेलकट डाग व्यवस्थापन

तेलकट डाग रोगाच्या नियंत्रणासाठी बागेमध्ये सातत्याने एकात्मिक रोग व्यवस्थापनाला प्राधान्य देणे गरजेचे आहे.
डाळिंब फळपिकातील तेलकट डाग व्यवस्थापन
डाळिंब फळपिकातील तेलकट डाग व्यवस्थापन
Published on
Updated on

सोलापूर, सांगली, नाशिक आणि नगर यासारख्या अवर्षणप्रवण भागामध्ये वरदान ठरलेल्या डाळिंब या फळपिकामध्ये मागील काही वर्षांपासून तेलकट डाग रोगाचा प्रादुर्भाव ही समस्या ठरत आहे. या रोगामुळे अनेक ठिकाणी बागा काढून टाकाव्या लागल्या आहेत. या रोगाच्या नियंत्रणासाठी बागेमध्ये सातत्याने एकात्मिक रोग व्यवस्थापनाला प्राधान्य देणे गरजेचे आहे. डाळिंबातील तेलकट डाग रोग झान्थोमोनास ऑक्झोनोफेडीस पी. व्ही. पूनिकी या जीवाणूमुळे होतो. याला जीवाणूजन्य करपा असेही म्हणतात. तेलकट डाग रोगाची लक्षणे :

  • या रोगाची लक्षणे झाडाच्या विविध भागावरती म्हणजे पान फांदी, फूल आणि फळ इ. आढळून येतात.
  • पानांवरती २-५ मिमी आकाराचे वेडेवाकडे, तपकिरी, काळसर रंगाचे ठिपके आढळतात. असे ठिपके कालांतराने पोकळ पिवळ्या अथवा पाणीदार कडांनी वेढले जातात आणि गळतात.
  • फांदीवर काळे खोलगट चट्टे आढळतात. नंतर ते गोलाकार पसरून फांद्या त्या ठिकाणी तडकतात.
  • फुलांवर लागण झाल्यास कॅलिक्सवर लक्षणे आढळतात.
  • फळांवर या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. फळांच्या देठाकडील पृष्ठभागावर रोगाची प्रादुर्भाव लवकर व जास्त होऊन काळे ठिपके पडतात. इंग्रजी एल अथवा वाय आकारात फळांचा प्रादुर्भाव झालेला भाग तडकतो. हे या रोगाची ठळक लक्षण आहे. रोगग्रस्त फळाची प्रत खालावण्यासोबत संपूर्ण फळ वाया जाते.
  • रोगग्रस्त पान किंवा फळाचा भाग सूर्यकिरणांच्या दिशेने ठराविक कोनातून पाहिल्यास चमकतो. ही सुद्धा रोग ओळखण्याची एक पद्धत आहे.
  • प्रयोगशाळेमध्ये सूक्ष्मदर्शकाच्या साह्याने या रोगाचे जीवाणू पाहता येतात.
  • रोगास अनुकूल बाबी :

  • बागेत अथवा शेजारी तेलकट डाग रोगाचे अवशेष असणे.
  • बागेमध्ये तणांची अधिक वाढ, झाडांची गर्दी, हवेचा आणि सूर्यप्रकाशाचा अभाव असणे.
  • ढगाळ पावसाळी हवामान, २५ ते ३२ अंश सेल्सिअस तापमान, ३६ ते ३८ टक्के सापेक्ष आर्द्रता इ. बाबी या रोगाच्या वाढीस आणि प्रसारात अनुकूल समजल्या जातात.
  • रोगाचा प्रसार :

  • तेलकट डाग या रोगाचा प्रसार प्रामुख्याने रोगग्रस्त रोपे, कलमे यांच्या माध्यमातून होतो.
  • बागेतील झाडांमधील कमी अंतर (४.५ X ३ मीटरपेक्षा कमी) हेसुद्धा रोग प्रसारास कारणीभूत ठरते. कारण कमी अंतरावरील लागवडीमुळे रोगग्रस्त आणि निरोगी झाडांच्या फांद्या एकमेकात मिसळतात.
  • पाऊस, पावसाचे बागेत वाहणारे पाणी हेही सुद्धा रोगाचे जीवाणू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेण्यासाठी कारणीभूत ठरतात. -बागेमध्ये माणसांद्वारे छाटणी, तोडणी, फवारणी इ. कामावेळी नकळत रोगाचा प्रसार होतो.
  • बागेत वापरली जाणारी उपकरणे उदा. कात्री, विळा इ. निर्जंतुक न करता वापरल्यास रोगाचा प्रादुर्भाव एका झाडापासून दुसऱ्या झाडास होतो.
  • पाने पोखरणारी अळी, फुलपाखरे इ. किडीसुद्धा रोग प्रसारास सहाय्यक ठरतात.
  • तेलकट डाग रोग व्यवस्थापन : १. डाळिंब बागेतील स्वच्छतेस अनन्यसाधारण महत्त्व आहे. या रोगाचे जिवाणू बागेमध्ये ८ ते १० महिन्यांपर्यंत सुप्तावस्थेत राहू शकतात. म्हणून बागेतील रोगग्रस्त फांद्या, फळे वेळीच जाळून नष्ट कराव्यात. २. झाडावर युरिया ५ टक्के प्रमाणात (२५ ग्रॅम प्रती लिटर) फवारणी करून पानगळ करावी. ३. रोगाचा प्रादुर्भाव झालेल्या भागाच्या २ इंच खालून झाडाच्या फांद्या छाटाव्यात. ४. छाटणी करताना प्रत्येक फांदी कापल्यानंतर कात्री १ टक्का क्लोरोक्सिलेनोलच्या द्रावणात बुडवून निर्जंतुक करावी. ५. छाटणीनंतर कापलेल्या भागावर आणि खोडावर जमिनीपासून वर २ फूट बोर्डोपेस्ट (१० टक्के) लावावे. ६. छाटणी झाल्यानंतर पहिली फवारणी १ टक्के बोर्डोमिश्रणाची करावी. ७. झाडावर नवीन पालवी फुटल्यानंतर दुसरी फवारणी स्ट्रेप्टोमायसीन* (२५० पीपीएम) म्हणजेच ०.२५ ग्रॅम अधिक कॉपर ऑक्सिक्लोराईड (०.२५ टक्के) म्हणजे २.५ ग्रॅम प्रती लिटर पाणी या प्रमाणे करावी. पावसाळ्यात फवारणी करताना नॉन आयोनिक चिकट द्रव्याचा वापर करावा. ८. तिसरी फवारणी १५ दिवसानंतर बोर्डोमिश्रणाची (०.४ टक्के) करावी. ९. चौथी फवारणी स्ट्रेप्टोमायसीन* (२५० पीपीएम) अधिक प्रोपिकोनॅझोल (२५ इ.सी) १ मिली किंवा हेक्साकोनॅझोल (५ इ. सी.) १ मिली प्रती लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. १०. रोग वाढीस पोषक हवामानात (विशेषतः ढगाळ आणि पावसाळी हंगामात) रोगाचा प्रादुर्भाव असलेल्या बागेत स्ट्रेप्टोमायसीन* ५०० पीपीएम तीव्रतेने (०.५ ग्रॅम प्रती लिटर पाणी) फवारणी करावी. त्याचबरोबर दोन फवारणीतील अंतर ८-१० दिवस ठेवावे. अशा प्रकारे वरील पद्धतींचा अवलंब करून डाळिंब बागा तेलकट डाग रोगापासून मुक्त ठेवता येतील. हरिष फरकाडे, ८९२८३६३६३८ (सहायक प्राध्यापक, वनस्पती रोगशास्त्र विभाग, श्री. शिवाजी उद्यानविद्या महाविद्यालय, अमरावती.)

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon - Agriculture News
    agrowon.esakal.com