सध्याच्या काळात पावसाची उघडीप लक्षात घेऊन कोळप्याच्या साहाय्याने पीक २०-२५ दिवसांचे असताना पहिली आणि ३०-३५ दिवसांचे असताना दुसरी कोळपणी करावी. कोळपणी केल्याने जमीन भुसभुशीत होऊन हवा खेळती राहते. त्यामुळे पीक वाढीस पोषक वातावरण तयार होते. बाष्पीभवनाचा वेग कमी होऊन ओलावा अधिक काळ टिकण्यास मदत होते. दोन ओळीतील तण काढले जाऊन रोपांना मातीची भर लागते. कोळपणी शक्यतो, वाफशावर करावी. तूर पीक पहिले ३० ते ४५ दिवस तणविरहीत ठेवावे. गरजेनुसार एक किंवा दोन खुरपण्या वेळीच द्याव्यात. पावसाळ्यात पाऊस कमी झाला असल्यास आणि जमीन मध्यम उथळ असल्यास ओलावा फार काळ टिकून राहत नाही. जमिनीतील ओलावा खूपच कमी झाला आणि फुले लागल्यावर उशिरा पाणी दिल्यास तुरीची मोठ्या प्रमाणात फुलगळ होते. हे टाळण्यासाठी जमिनीतील ओलावा कमी होण्यापूर्वीच आणि फुले येण्याच्या सुरवातीलाच संरक्षित पाणी द्यावे. तुरीची पेरणी झाल्यानंतर तिसऱ्या आठवड्यात एक कोळपणी करून चौथ्या आठवड्यात तुरीच्या दोन ओळीत लाकडी नांगराच्या सहायाने ३० से. मी. खोल सरी काढावी. सरी काढल्यामुळे ऑगस्ट–सप्टेंबर मध्ये पडणारा पाऊस सरीत मुरविला जाऊन जमिनीतील ओलावा वाढण्यास मदत होते व सदरील ओलावा पीक फुलोऱ्यात असताना व दाणे भरताना उपयोगी पडून उत्पादनात वाढ होते. कोरडवाहू शेती सशोधन केंद्र, सोलापूर येथील संशोधानातून तुरीच्या दोन ओळीत सरी काढल्यामुळे जमिनीतील ओलाव्यात १५ ते २० टक्के वाढ होऊन उत्पादनात २५ ते ३० टक्के वाढ झाल्याचे दिसून आले आहे. कोरडवाहू क्षेत्रात पावसाची शक्यता नसेल आणि पाणी देण्याची सोय उपलब्ध असेल तर लवकर येणाऱ्या तुरीच्या पिकास पहिले पाणी फुलकळी लागताना, दुसरे पाणी फुलोऱ्यात असताना व तिसरे शेगांत दाणे भरताना द्यावे. मात्र, पिकात पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी. जमिनीच्या खोलीनुसार पाण्याच्या दोन पाळ्यामध्ये अंतर ठेवावे. पाऊस नसेल तर जमिनीस फार मोठ्या भेगा पडण्याच्या अगोदरच पाणी द्यावे. जास्त पावसामुळे शेतातून पाणी जास्त वाहिले असल्यास पाण्याबरोबर नत्र वाहून जाण्याची शक्यता असते. तुरीची खालची पाने पिवळी पडली असल्यास नत्राची कमतरता लक्षात घेऊन दोन टक्के युरियाची किंवा दोन टक्के डीएपी ची (दोन किलो प्रती १०० लिटर पाणी) फवारणी फायदेशीर ठरू शकते. फवारणी शक्य नसल्यास अशा शेतामध्ये निंबोळी पेंड एक पोते आणि युरिया अर्धा पोते प्रती एकरी कोळपणी देण्यापूर्वी वापरावे. शेतामध्ये पाणी साचू राहणार नाही याची काळजी घ्यावी. पिकामध्ये किडीची आर्थिक नुकसानीची पातळी ओळखण्यासाठी कामगंध सापळ्याचा उपयोग महत्त्वाचा ठरतो. ः डॉ. आदिनाथ ताकटे, ९४०४०३२३८९, (महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)