शेतकरी उत्पादक कंपनीची ओळख, उद्दिष्टे 

शेतकरी उत्पादक कंपनीची ओळख, उद्दिष्टे 
शेतकरी उत्पादक कंपनीची ओळख, उद्दिष्टे 
Published on
Updated on

मागील भागापर्यंत आपण गटशेती कशी करावी, याची माहिती घेतली. गटशेती स्थिर झाल्यानंतर व गटशेतीतून शेतकऱ्यांना सुलभता व त्यातून फायदे मिळू लागल्यानंतर शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करण्याचा विचार करावा.  शेतकरी उत्पादक कंपनी म्हणजे काय? 

  • शेतकरी उत्पादक कंपनी भारतीय कंपनी अधिनियम १९५६ यामध्ये २००२ मध्ये कलम १ मध्ये केलेल्या बदलानुसार स्थापन करण्याचे प्रयोजन आहे. शेतकरी उत्पादक कंपनी ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी व सहकारी संस्था दोन्हीचे फायदे लक्षात घेऊन निर्माण केली आहे. शेतकरी उत्पादक कंपनीला प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे सर्व नियम लागू होतात. परंतु, कंपनीच्या आराखड्यामध्ये सहकारी संस्थेला लागू असलेले सर्व तत्त्व वापरलेले आहेत. यामुळे कंपनीत भागीदारी असलेले सर्व शेतकरी सहकाराच्या तत्त्वानुसार एकत्र येऊन काम करतात. 
  • उत्पादक कंपनीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी शेतकऱ्यांना एकत्र आणणे हा महत्त्वाचा पैलू आहे. शेतकरी गटशेती करीत असतील तर त्यांना एकत्र आणून कंपनी स्थापन करणे सुलभ होते. कंपनीच्या माध्यमातून शेती उत्पादन, प्रक्रिया व विक्री केल्यामुळे उत्पादन खर्चात बचत होते. कंपनीच्या माध्यमातून बाजारपेठ शोधने सुलभ होऊन विक्री व्यवस्थापन कार्यक्षम होते. कंपनीचे बाजार व्यवस्थेशी लिंक निर्माण झाल्यामुळे दलाल, व्यापारी व इतर मध्यस्थांचा हस्तक्षेप कमी होतो. त्यामुळे शेतीउत्पादन, प्रक्रिया व विक्री सुलभ होऊन उत्पन्न वाढते. 
  • शेतकरी उत्पादक कंपनी सहकारी तत्त्वानुसारच चालते. यामध्ये अनेक शेतकरी, शेतकरी गट एकत्र येतात. त्यामुळे शेतीची कार्यक्षमता वाढविण्यास मदत होते. 
  • शेतकरी उत्पादक कंपनीसाठी आसपासच्या १२ ते १५ गावांतील ८०० ते १००० शेतकरी एकत्र येऊन कंपनी स्थापन करू शकतात. 
  • सहकारी संस्था आणि शेतकरी उत्पादक कंपनीतील फरक  शेतकरी उत्पादक कंपनी सहकारी तत्त्वावर व कंपनी कायद्यानुसार चालत असली तरी सहकारी संस्था व शेतकरी उत्पादक कंपनी यामध्ये काही मूलभूत फरक आहेत. 

  • १. उत्पादक कंपनी ही कंपनी कायद्याअंतर्गत नोंदणी होते तर सहकारी संस्था ही सहकार कायद्यानुसार नोंदणीकृत असते. 
  • २. शेतकरी उत्पादक कंपनी अनेक उद्दिष्ट ठरवू शकते. परंतु, सहकारी संस्था ठरलेल्या उद्देशावरच चालते. ३. याचबरोबर शेतकरी उत्पादन कंपनीचे कार्यक्षेत्र संपूर्ण देशभर असू शकते. पण, सहकारी संस्थेचे कार्यक्षेत्र मर्यादित असते. 
  • ४. शेतकरी उत्पादक कंपनीमध्ये वैयक्तिक समभाग (शेअर) विकता येत नाही. परंतु, तो इतर सदस्यांना त्याच्या मूल्यानुसार हस्तांतरित करता येतो. सहकारी संस्थांमध्ये समभाग विक्री करता येत नाही हे अनिवार्य आहे. 
  • ५. उत्पादक कंपनीमध्ये शेतकरी गट, संघटना, सेवा व उत्पादन संस्था इत्यादी सदस्य बनविता येते. पण सहकारी संस्थांमध्ये व्यक्ती हा सदस्य असतो. असे काही ठळक फरक उत्पादक कंपनी व सहकारी संस्था यामध्ये आहेत. 
  • ६. शेतकरी उत्पादक कंपनीमध्ये प्रत्येक सदस्याला मतदान करण्याचा अधिकार असतो. कंपनी त्याला मनाई करू शकत नाही. परंतु, सहकारी संस्थांमध्ये एक सभासद एक मत असते. परंतु, संस्थांना काही कारणास्तव मनाई करण्याचा अधिकार असतो. उदा. सहकारमध्ये एखादा सभासद थकबाकीदार असेल तर त्याचा मतदानाचा अधिकार संस्था काढून घेऊ शकते. 
  • ७. कंपनीमध्ये कर्ज घेण्याविषयी स्वातंत्र्य आहे. त्याला मर्यादा नाहीत. तसेच कर्जासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. सहकारी संस्थांमध्ये कर्ज घेण्यास मर्यादा आहेत. 
  • स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व  शेतकरी उत्पादक कंपनीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे कंपनीला स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व असते. त्याचे व्यवस्थापन सुलभपणे करता येते. कंपनीमध्ये बाह्यस्तक्षेपाला वाव नसतो, त्यामुळे कामकाज सुरळीत चालते. सहकारी संस्थेमध्ये बाह्य हस्तक्षेपामुळे अनेकदा संस्था बंद पडतात किंवा कामकाजात अडथळा निर्माण होतो. उत्पादक कंपनीवर पूर्णपणे शेतकऱ्यांचा मालकी हक्क असतो. कंपनी आर्थिकदृष्टीने स्वतंत्र असल्यामुळे त्यांची विश्वासार्हता अधिक असते. कंपनी इतर आर्थिक संस्थांप्रमाणे सभासदांच्या ठेवी स्वीकारणे व त्यांना योग्य दरात कर्ज उपलब्ध करून देणे हे कामही करू शकते.  कार्यकारिणी तयार करताना...  शेतकरी उत्पादक कंपनीला प्रायव्हेट लिमिटेड कंपनी कायद्याचे पालन करणे बंधनकारक आहे.  कंपनीचे कामकाज चालविण्यासाठी सभासदामधून संचालक मंडळ निवडण्याची गरज असते. संचालक मंडळामध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्यकारिणी सदस्य यांचा समावेश असतो. कामकाज चालविण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी, व्यवस्थापकीय संचालक तसेच कृषितज्ज्ञांची नियुक्ती करणे आवश्यक आहे. कंपनीच्या कार्यकारिणीला प्रशासकीय, तांत्रिक, व्यवस्थापकीय व धोरणात्मक सर्व निर्णय घेण्याचे अधिकार असतात. मुख्य कार्यकारी अधिकारी संचालक मंडळाच्या निर्णयाची अंमलबजावणी करतो, तर व्यवस्थापकीय संचालक कंपनीच्या दैनंदिन व्यवहाराची देखरेख व अंमलबजावणी करतो.  विविध तज्ज्ञांची आवश्यकता का असते 

  • शेतकरी उत्पादक कंपनीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित उत्पादन, शेतमाल प्रक्रिया व विक्री व्यवस्थापन यासाठी कृषी तज्ज्ञांची नियुक्ती आवश्यक असते. कारण, शेतकरी कंपनी चालवित असताना दर्जेदार उत्पादनापासून ते विक्रीपर्यंत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नियोजन करणे आवश्यक आहे. 
  • दर्जेदार उत्पादनासाठी माती परीक्षण करून अन्नद्रव्याच्या उपलब्धतेनुसार पिकांची निवड करणे व त्यानुसार संतुलित खतांचे नियोजन करणे इथून सुरवात होते. नवीन सिंचन सुविधा निर्माण करणे विशेषत: सूक्ष्म सिंचनाचा वापर केल्याने पाण्याचा काटेकोर वापर होतो. यासाठी शेतकरी उत्पादक कंपनीने नियोजन करून दर्जेदार माल निर्माण करणे यामुळे पुढील व्यवस्थापन फायदेशीर होण्यासाठी कृषितज्ज्ञ उपयुक्त ठरतात. 
  • पिकांचे नियोजन करण्यापूर्वी बाजाराचे निरीक्षण करून मागणीनुसार पीक व पेरणीक्षेत्र ठरवावे त्यामुळे गरजेपेक्षा अधिक माल निर्माण होणार नाही. प्रक्रियेसाठी कच्च्या मालाची उपलब्धता तपासून पाहून प्रक्रिया नियोजन करावे. कंपनीचा स्वत:चा माल व इतर शेतकऱ्यांकडून कच्चा माल खरेदी करून प्रक्रिया पूर्ण कार्यक्षमतेने करावी. प्रक्रिया केलेल्या मालाची बाजारपेठेचा कंपनीने शोध घेऊन योग्य बाजारपेठ निवडावी. त्यानुसार व्यापाऱ्यांशी विक्री करार करावा. प्रक्रियायुक्त माल तयार करीत असताना मागणी-पुरवठा याचा ताळेबंद करावा. यासाठी परिसरातील इतर प्रक्रिया उद्योगांचा आढावा घेऊन त्यांचा माल बाजारात किती येतो व आपल्या कंपनीचा माल बाजारात किती लागतो यानुसार प्रक्रियेचे नियोजन करावे. त्यामुळे मागणी-पुरवठा संतुलन राहते व अधिकचा माल कंपनीकडे शिल्लक राहत नाही. यासाठी बाजाराचे विश्लेषण करण्याची क्षमता असलेला एखादा सल्लागार किंवा सदस्य कंपनीशी जोडलेला असावा. याचे दीर्घकालीन फायदे होतात. 
  • शेतकरी उत्पादक कंपनी चालवत असताना प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या कायद्यांची इत्यंभूत माहिती घेणे आवश्यक आहे. महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत १५०० पेक्षा जास्त शेतकरी उत्पादक कंपन्यांची स्थापना झाली आहे. यासाठी नाबार्ड व एसएफएसी यांच्यातर्फे शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. परंतु, अनेक कंपन्या कंपनी कायद्याचे ज्ञान नसल्यामुळे अडचणीत आल्या आहेत किंवा त्यांची प्रगती खुंटली आहे. यासाठी शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना करताना कंपनी कायद्यांचे ज्ञान असणे अत्यंत आवश्यक आहे. याच कारणासाठी कंपनीला पूर्णवेळ मुख्य कार्यकारी अधिकारी नियुक्त करावा लागतो. शेतकरी उत्पादक कंपन्यांना सदस्य संख्या किती असावी याला मर्यादा नाही. जेवढे जास्त सदस्य तेवढी कंपनीची उलाढाल वाढते व कंपनी चालविण्यासाठी बळ येते. 
  • ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon - Agriculture News
    agrowon.esakal.com