
छोट्या छोट्या उपायातून शेतकरी कर्ब संवर्धन करण्यातून जमिनीची सुपीकता वाढवू शकतो. कर्ब उत्सर्जन पर्यायाने जागतिक तापमान वाढ रोखण्यासाठी शेतकऱ्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची राहणार आहे. सध्या सरासरीइतक्या पावसाचे भाकित वर्तवण्यात आले असले तरी संभाव्य विषम पाऊसमानाची भीती शेतकऱ्यांना सातत्याने भेडसावणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. हवामानातील अशा विचित्र बदलांमध्ये वातावरणातील कर्बवायूचे वाढते प्रमाण हा चिंतेचा विषय आहे. माणसाची लोकसंख्या सातत्याने वाढत असून, त्याची उर्जेची गरजही वाढत आहे. औद्योगिकरणानंतर दगडी कोळसा, खनिज तेलाचा वापर गुणाकाराच्या पटीत वाढत गेला. वातावरणातील कर्बवायूचे प्रमाण वाढत गेले. कर्ब उत्सर्जन कोणी कमी करायचे, यावर जागतिक पातळीवर वाद सुरू आहेत. अन्य बाबी आपण थोड्या बाजूला ठेवून यात शेतकरी काय करू शकतो, यावर आपले लक्ष केंद्रित करू. काही परदेशी पर्यावरण तज्ज्ञांच्या मते, मूळ जमिनीत साठविलेला सेंद्रिय कर्बाचा साठा शेतीसह विविध कारणाने कमी होत चालला असून, ते पर्यावरणाच्या नाशाला महत्त्वाचे कारण आहे. जंगले तोडली गेल्याने लाकूड रूपातील सेंद्रीय कर्ब उद्ध्वस्त झाला. शेतजमिनीत असलेले मृत सेंद्रिय पदार्थांचे आच्छादन मातीच्या उलथापालथीत उद्ध्वस्त झाले. नवीन सेंद्रिय कर्ब तयार होण्याचे काम थांबले. परिस्थितिकीची संकल्पना ः एक पूर्ण वाढलेल्या जंगलात नत्राचा साठा कोठे व किती प्रमाणात होतो, याच्या अमेरिकेत झालेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष ः
सेंद्रिय कर्ब म्हणजे कर्बाला जोडलेली विविध अन्नद्रव्ये. यांच्या ऱ्हासासंबंधीचा एक सर्वेक्षण अहवाल. एका पूर्ण वाढलेल्या जंगलाचा अर्धा भाग तोडला. अर्धा तसाच ठेवला. दोन्ही भागातील अन्नद्रव्ये पुढील वर्षी मोजली त्याचे प्रमाण पुढील प्रमाणे दिसले.
धूपीमुळे होणारे नुकसान (३ वर्षांनंतर शिल्लक अन्नद्रव्ये) | |||
अन्नद्रव्ये | तुटलेले जंगल | न तुललेले जंगल | फरक |
कॅल्शिअम | २७.५ | २३३.५ | -२०६.१ |
पोटॅशिअम | ४.४ | ९१.१ | -८६.७ |
अमोनियम नत्र | ६.४ | ४.९ | + १.५ |
गंधक | १२.३ | ४.३ | + ८ |
नायट्रेट नत्र | ६.७ | ९२२.४ | ९१९.७ |
पावसाळा सुरू होताच जनावरे डोंगरात चरावयास नेण्याची प्रथा सर्वत्र आहे. या उपक्रमामुळे डोंगरांचे किती पर्यावरणीय नुकसान होते, याचे भान कोणालाच नाही. जनावरांच्या खुराने माती रिकामी होणे, पाण्याच्या प्रवाहाने धुपून जाणे असे सातत्याने चालू आहे. अत्यंत निकृष्ट जातीचे गवत तेथे वाढते. मूळ नैसर्गिक जंगलात असलेले सेंद्रिय कर्बाचे प्रमाण कमी होत गेल्यामुळे जंगलात पाणी मुरण्याचे प्रमाण कमी होते. ओढे ओघळ पावसाळा संपताच आटतात, तर फेब्रुवारी पर्यंत विहीरींचे पाणी संपून पिण्याच्या पाण्याची टंचाई होते. मोठ्या पावसाचा प्रदेश व नद्यांवर धरणे यामुळे कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये पाण्याची टंचाई मराठवाडा, विदर्भ किंवा खानदेशाप्रमाणे तीव्रतेने जाणवत नाही. एकेकाळी समृद्ध असणारा मराठवाडा व पश्चिम विदर्भ व खानदेशचा काही भाग उजाड झाला. डोंगरात पाणी मुरण्यासाठी महाराष्ट्रात काही ठिकाणी चांगले काम झाले. उदा. का. का. चव्हाण यांचे समतल चर, वसंतराव ठाकरे, धुळे यांची चराई कुऱ्हाड बंदी, डॉ. जनवाडकर यांनी केलेली चराई व कुऱ्हाड बंदी, खालील प्रवाहात ओढे ओघळ खोलवून पाणी साठवून मुरविण्याचे काम सुरेश खानापरकर यांचे शिरपूर पॅटर्न इ. लोकसहभागातून उभी राहिलेली कामे
डॉ. जनवाडकर यांनी लामकानी येथे गाव सहभागातून चराई व कुऱ्हाड बंदीचे काम केले. डोंगरावर पूर्ण गवत वाढीला वाव दिला. जमिनीची धूप थांबली. पुढील ५ वर्षांत चारा उपलब्धीमुळे पशुपालन सुधारले. गवताच्या मुळांचा पसारा खोलवर वाढून धूप बंद झाली. जमिनीवरून पाणी आडवे वाहणे बंद झाले. डोंगरात पाणी मुरण्याचे प्रमाण वाढले. एकेकाळी टॅंकरची गरज भासणारे गाव आज बारमाही शेती करू लागले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे काम बिन पैशात केले गेले. नगर जिल्ह्यात राणेगणसिद्धीचे काम सर्वांना ज्ञात आहे. हिवरे बाजार येथील पोपटराव पवारांच्या नेतृत्वाखाली गावाने उभारलेले काम जवळून पाहिले. गावातील बोडके डोंगर हिरवेगार पाहणे, वार्षिक उपलब्ध पाण्याचा ताळेबंद मांडून ग्रामसभेत गावाने पीक रचनेचा आराखडा करणे व त्याचे पालन करणे इ. बाबी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. जालना जिल्ह्यातील कडवंची येथील जलसंवर्धनातून कृषी विकासाची राष्ट्रीय पातळीवर नोंद घेतली गेली आहे. तेथे समतल चर व वृक्ष लागवड हे तंत्र नावाजले गेले आहे. अशा प्रकल्पातून जमिनीत मोठ्या प्रमाणावर कर्ब साठविला जातो. बांधावर झाडांची लागवड गोंदिया जिल्ह्यामध्ये माजी जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी बांधावर झाडे वाढवण्याची योजना राबविली. त्यासाठी शेतकऱ्यांना अनुदान दिले. ही योजना महाराष्ट्रभर राबवण्याची आवश्यकता होती. मात्र, अद्याप धोरणकर्त्यांचे त्याकडे लक्ष गेले नाही. डोंगरावर झाडे वाढवण्याच्या तुलनेमध्ये शेताच्या बांधावर झाडे वाढवणे सोपे आहे. हवेतील कर्ब कायमस्वरुपी साठविण्यासाठी वृक्षासारखा पर्याय नाही. पूर्वमशागतीसाठी डिझेल जाळण्याची आवश्यकता नाही ट्रॅक्टर व यंत्राद्वारे डिझेल जाळून रानाची पूर्व मशागत करण्याची अजिबात गरज नाही. मी दरवर्षी १२५ ते १५० लीटर डिझेलची माझ्या ४-५ हेक्टर क्षेत्रावर बचत करतो. एकरी फक्त १ ते २ लीटर डिझेल प्रती वर्ष एवढ्यावर गेल्या १५ वर्षापासून शेती करत आहे. मशागत बंद केल्याने उत्पादन अजिबात घटलेले नाही. उलट उत्पादन ३०-४०% वाढून उत्पादनखर्च ३०-४०% ने कमी होण्याचा दुहेरी फायदा झाला. सुपीकता वाढण्यासाठी फार उशीर लागतो, असा गैरसमज आहे. माझ्या जमिनीची सुपिकता केवळ एकाच वर्षात वाढली. ती वर्षानुवर्षे वाढतच चालली आहे. याला कारण उत्तम दर्जाच्या सेंद्रिय कर्बात वाढ हे कारण आहे. एका परिस्थितिकी शास्त्रज्ञाने (इकॉलॉजिस्ट) मांडलेल्या मतानुसार, शेतजमिनीतील सध्याची सेंद्रिय कर्बाची टक्केवारी ०.३ ते ०.४% आहे. ती १ टक्क्यापर्यंत वाढवू शकलो तरी प्रदूषणाचे प्रमाण शेतकरी कमी करू शकतो. शून्य मशागत तंत्रामुळे लाखो लीटर डिझेल व कर्बाचे उत्सर्जन वाचू शकते. या शेतकऱ्यांच्या हातातील बाबी आहेत. त्यासाठी कोणताच जादा खर्च नाही. एकदा जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढला, की रासायनिक खतांचे प्रमाण कमी लागते. परिणामी नत्र उत्सर्जनात घट होते. पाण्यात बचत होते. उत्पादनाचा दर्जा उत्तम मिळतो. परिणामी चांगला दर मिळून उत्पन्नातही वाढ होऊ शकते. विक्रमी उत्पादन घेण्याच्या नादामध्ये प्रचंड खर्च करून शेतकरी स्वतःला आर्थिक विपत्तीमध्ये ढकलत असतो. कोणत्या पिकाच्या मागे जायचे?
पूर्वमशागत म्हणजेच जंगलतोडीचा प्रकार नव्हे काय? नैसर्गिकरित्या वर्षानुवर्षे अस्तित्वात असलेले जंगल तोडून शेत जमीन तयार केल्या गेल्या. परिणामी परिसंस्थेचे कसे नुकसान होते, हे आपण पाहिले. प्रत्येक जमिनीचा तुकडा व त्यातील एखादे पीक कापणीनंतर पुढील पिकाच्या पेरणीपूर्वी आपण विनाकारण उलथापालथ (पूर्व मशागत) करतो. बारकाईने विचार केल्यास ती जंगल तोडीचीच लहान आवृत्ती आहे. बिना मशागतीने मातीतून होणारे कर्ब उत्सर्जनही कमी होते. यातून शेतीक्षेत्रातून होणारे उत्सर्जनही कमी करून शेतकरी जागतिक पर्यावरणाला मदत करू शकतो. बरे, हा उपाय आर्थिक बचतीबरोबर उत्पादन वाढही देणारा असल्याचा माझा स्वतःचा अनुभव आहे. प्र. र. चिपळूणकर, ८२७५४५००८८ (लेखक कोल्हापूर जिल्ह्यातील प्रगतीशील शेतकरी आहेत.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.