Keli Pik: केळी पीक नियोजन

ऑगस्टमध्ये लागवडीच्या बागेला उशिरा लागवडीचा मृगबाग म्हटले जाते. या कालावधीत लागवडीच्या बागेचे लाभ अधिक आहेत. यात रोगांचे प्रमाण कमी राहून दरही चांगले मिळत असल्याचे महाजन यांचे निरीक्षण आहे.
केळी पीक नियोजन
केळी पीक नियोजन
Published on
Updated on

शेतकरी ः प्रेमानंद हरी महाजन

गाव ः तांदलवाडी, ता.रावेर, जि.जळगाव

एकूण क्षेत्र ः १२० एकर, केळीखालील क्षेत्र ः ६० एकर.

प्रेमानंद महाजन यांनी आपल्या एकूण १२० एकर क्षेत्रापैकी ६० एकरांत विविध टप्प्यांत केळीची लागवड केली आहे. मृग बहर केळी लागवड करतात. या केळीची लागवड प्रामुख्याने मे, जून, जुलै व ऑगस्ट या महिन्यांत केली जाते.

ऑगस्टमध्ये लागवडीच्या बागेला उशिरा लागवडीचा मृगबाग म्हटले जाते. या कालावधीत लागवडीच्या बागेचे लाभ अधिक आहेत. यात रोगांचे प्रमाण कमी राहून दरही चांगले मिळत असल्याचे महाजन यांचे निरीक्षण आहे.

उशिरा लागवडीच्या मृग बागेत खत, पाणी व्यवस्थापन  ऑगस्टमध्ये चार एकर क्षेत्रामध्ये सहा हजार उतिसंवर्धित केळी रोपांची लागवड केली होती. गादीवाफ्यावर साडेपाच बाय साडेपाच फूट अंतरावर ही लागवड असून, प्लॅस्टिक मल्चिंगचा उपयोग केलेला नाही. या केळी बागेमध्ये कुकुंबर मोझॅक विषाणूचा (सीएमव्ही) प्रादुर्भाव नव्हता.

यामुळे बागेची उगवण ९५ टक्के झाली. नांग्या भराव्या लागल्या नाहीत. २०२० मध्ये जून, जुलैमध्ये लागवडीच्या अनेक केळी बागांमध्ये सीएमव्हीचा प्रभाव होता. परिणामी झाडे नष्ट करावी लागल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना बागेत नांग्या भराव्या लागल्या. काही शेतकऱ्यांच्या बागांमध्ये तर ३० ते ३५ टक्के झाडांचे नुकसान झाले. ही समस्या प्रेमानंद यांच्या बागेत उद्‍भवली नाही.

  1. या बागेत फक्त सुरुवातीला एकदाच संयुक्त आणि सरळ खतांद्वारे शिफारशीत मात्रेमध्ये बेसल डोस दिला.

  1. गेल्या २० ते २५ दिवसांत या बागेत नत्र व स्फुरदयुक्त खते ड्रीपद्वारे दर आठ दिवसांत दिली आहेत.

  1. -सध्या या बागेत बुंधा तयार होण्याचा काळ आहे. या काळात नत्र व स्फुरदची मात्रा निर्देशानुसार दिली आहे.

  1. यंदा वातावरण सातत्याने विषम राहिले. थंडी हवी तशी पडली नाही. अशा वातावरणात या बागेला करपा रोगाची समस्या फारशी भेडसावली नाही. मात्र गेल्या २० दिवसांत प्रतिबंधात्मक म्हणून एकदा बुरशीनाशकाची फवारणी केली. त्यासाठी पॉवर फवारणी पंपाचा वापर केल्याने फवारणी हव्या त्या गतीने, हव्या त्या भागात करता आली.

  1. झाडांची उंची वाढत आहे. बागेची वाढ सुरू आहे. नवी पाने येत आहेत. यामुळे खालच्या भागातील पाने काढून त्यांची विल्हेवाट लावली आहे. तसेच फुटवे दर पंधरवड्यात वाढत आहे. तीदेखील काढून घेऊन त्यांचीही बागेबाहेर विल्हेवाट लावली आहे.

  1. गेल्या २० दिवसांत बागेत प्रतिदिन १५ लिटर पाणी प्रति झाड, यानुसार सिंचन केले आहे. एका ओळीत सिंचनासाठी एकच लॅटरल आहे. सध्याचे तापमान किमान १३ ते १४ आणि कमाल ३० ते ३१ अंश सेल्सिअस असे आहे. पुढे किमान व कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यानुसार सिंचनाच्या पाण्याचे प्रमाण वाढवावे लागणार आहे.

  • पुढील महिन्यात (मार्चमध्ये) बागेत निसवण सुरू होईल. त्यापूर्वी म्हणजेच येत्या १० ते १५ दिवसांत बागेत पालाशची मात्रा, सूक्ष्म अन्नद्रव्ये आणि दुय्यम खते शिफारशी प्रमाणे दिली जातील. त्यात बोरॉन, झिंक आदी खतांचा समावेश असेल.
  • -तणनियंत्रणही गरजेनुसार करावे लागणार आहे. फुटवे सतत येत आहेत. ती काढण्याची कार्यवाहीदेखील करत राहावी लागणार आहे.
  • मार्चमध्ये निसवण होत असल्याच्या काळात व पुढेही उष्णता वाढेल. या दृष्टीने झाडांवर पानांची संख्या योग्य संख्येने कशी राहील, यावरही भर दिला जाईल. निसवणीच्या वेळेस किमान सात ते आठ पाने झाडाला असावीत, असे नियोजन आहे.
  • - प्रेमानंद महाजन, ९७६३८९३७७७ (संपर्क ः दुपारी दोन ते तीन या वेळेत.) शब्दांकन ः चंद्रकांत जाधव

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon - Agriculture News
    agrowon.esakal.com