सोयाबीन उगवणीपासून ७ ते १० दिवसांपर्यंत खोड माशीचा प्रादुर्भाव दिसून येतो. पानाच्या शिरांद्वारे अळी खोडांमध्ये प्रवेश करून गाभा पोखरून खाते. प्रादुर्भावग्रस्त रोपे पिवळी पडून सुकतात. प्रादुर्भाव लक्षात घेऊन नियंत्रणाचे उपाय करावेत. सध्या काही भागात सोयाबीन पीक रोपावस्थेत आहे. या अवस्थेत खोडमाशीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. प्रादुर्भाव झाल्यास रोपांच्या संख्येवर विपरीत परिणाम होऊन पुन्हा पेरणी करावी लागते. सध्याच्या काळात पिकाला पाण्याचा ताण पडू देऊ नये. पाण्याचा ताण पडल्यास खोडमाशीचा प्रादुर्भाव वाढतो. ओळख
प्रौढ माशी घरमाशी सारखी परंतु, आकाराने फक्त २ मि. मी. व चमकदार काळ्या रंगाची असते. प्रौढ मादी माशी झाडाच्या देठावर व पानावर फिक्कट पिवळसर अंडी घालते. अंड्यातून २ ते ७ दिवसांत पांढऱ्या रंगाची पाय नसलेली अळी बाहेर पडून पानाच्या देठातून झाडाच्या मुख्य खोडात किंवा फांदीत छिद्र करून आतील भाग पोखरून खाते. पूर्ण विकसित अवस्थेत अळी हलक्या पिवळ्या रंगाची व साधारणतः ३ ते ४ मि. मी. लांबीची असते. उगवणीपासून ७ ते १० दिवसांपर्यंत किडीचा प्रादुर्भाव दिसून येतो. पानाच्या शिरांद्वारे ही अळी खोडांमध्ये प्रवेश करून गाभा पोखरून खाते. प्रादुर्भावग्रस्त रोपे पिवळी पडून सुकतात. खोडापासून शेंड्यापर्यंत झाड पोखरल्यामुळे अन्नद्रव्यांचा पुरवठा कमी होऊन पाने पिवळी पडून पानांवर लालसर काळे ठिपके दिसतात. पानाचा अर्धा भाग सुकून वरच्या बाजूस मुडपला जातो. झाडे वाळून मरून जातात. पिकाच्या नंतरच्या अवस्थेमध्ये प्रादुर्भाव झाल्यास रोपे सुकत नाहीत. परंतु, खोड पोखरल्यामुळे शेंगांची संख्या आणि बियांचे वजन कमी होते. तसेच काही शेंगांमध्ये दाणे भरत नाहीत. किडीच्या अंडी, अळी, कोष व माशी अशा चार अवस्था दिसून येतात. त्यापैकी अळी अवस्था हे प्रत्यक्ष पिकाचे नुकसान करते. माशी अंडी घालते. साधारणतः १० ते १२ दिवस किडीची अळी अवस्था असते. अळी खोडाला छिद्र बनविते; खोडाचा आतील भाग खाऊन आपली उपजीविका करते. त्यानंतर खोडातच कोषामध्ये रूपांतरित होते. थोड्या दिवसांनंतर कोषामधून प्रौढ माशी बनते. खोडावरील छिद्रातून बाहेर पडून पुन्हा आपले जीवनचक्र सुरू करते. खोड माशी पिकावर ४ ते ५ पिढ्या पूर्ण करते. आर्थिक नुकसान पातळी १० ते १५ टक्के प्रादुर्भावग्रस्त रोपे शेतात दिसू लागली की, या किडीने आर्थिक नुकसान पातळी गाठली असे समजावे. नियंत्रण
भारी जमिनीत पेरणीचे आंतर ४५ बाय ५ सें.मी. आणि मध्यम जमिनीत ३० सें.मी. बाय १० सें. मी. ठेवावे. जेणेकरून पिकात जास्त दाटी होणार नाही. बीजप्रक्रिया- प्रति किलो बियाणास थायामेथोक्झाम (३० टक्के एफ एस) १० मिली कीटकनाशकांचा वापर (ॲग्रेस्को शिफारसी) फवारणी - प्रति १० लिटर पाणी
क्लोरॲन्ट्रानिलीप्रोल (१८.५ एस सी) २.५ मि.ली. किंवा इथिऑन (५० ई सी) ३० मि.ली. किंवा इंडोक्झाकार्ब (१५.८ ई सी) ६.६६ मि.ली. किंवा लँबडा सायहॅलोथ्रीन (४.९ सी एस) ६ मि.ली. किंवा थायामिथोक्झाम (१२.६० टक्के) + लँबडा सायहॅलोथ्रीन (९.५० झेड सी) (संयुक्त कीटकनाशक) २.५ मि.ली. ( टीप - फवारणीचे प्रमाण नॅपसॅक पंपासाठी आहे) संपर्क - डॉ. एस. बी. महाजन, ९४२११२८३३३ (कृषी संशोधन केंद्र, कसबे डिग्रज, जि. सांगली)