पीक अवशेष कुजून त्याद्वारेदेखील जमिनीमध्ये कर्ब मिसळला जातो. पट्टा मशागतीद्वारे घेतलेल्या पिकांचे अवशेष जमिनीमध्ये गाडल्यास, जमिनीत सेंद्रीय कर्बाची वाढ होते. त्यामुळे जमिनीमध्ये जास्त पाणी मुरते व साठविले जाते. मशागतीच्या तंत्राने मागील हंगामातील पिकांच्या अवशेषांचे व्यवस्थापन करणे आवश्यक असते. यातून पुढील पिकासाठी मागील पिकातील पोषक घटक, सेंद्रिय कर्ब उपलब्ध होतात. यासाठी काही मशागत तंत्रे अवलंबले जातात.
या तंत्रामध्ये संपूर्ण शेतात पीक अवशेष वर्षभर पसरले जातात आणि अरुंद पट्ट्यात पीक घेतले जाते. यामध्ये पीक ओळीच्या पट्ट्यात पीक अवशेष टाकले जातात किंवा पिकाचा पट्टा सोडून मधल्या पट्ट्यात पीक अवशेष टाकून बुजवले जातात. यामध्ये पिकांच्या अवशेषांचा आच्छादन म्हणून वापर केला जातो. पीक निघाल्यानंतर त्याचे अवशेष जमिनीत मशागत करून गाडले जातात. भारतात कोरडवाहू पिकामध्ये या पद्धतीची शिफारस करण्यात आली आहे. या पद्धतीत शेतामध्ये सरी वरंबे काढले जातात. वरंब्यावर पिकाची लागवड करून सरीमध्ये पीक अवशेष टाकून कुजविले जातात. पाण्यामुळे जमिनीची होणारी धूप पीक अवशेषाच्या आच्छादनामुळे कमी होते. आच्छादनामुळे पावसाच्या पाण्यातून मातीचे कण वाहून जाण्याचे प्रमाण कमी होते. यामुळे धूप आणि अपधावेचा वेग कमी होतो. शेतजमिनीवर ओघळ अथवा चर पडत नाहीत. पट्टा मशागत तंत्राद्वारे जास्त पीक अवशेष निर्माण करणाऱ्या पिकामुळे ८० ते ९० टक्के, तर कमी अवशेष निर्माण करणाऱ्या पिकामुळे ३० ते ५० टक्के शेत जमीन झाकली जाते. जोरदार वाऱ्यामुळे जमिनीची होणारी धूप आच्छादनामुळे कमी होते. जमीन, पाणी आणि हवा यांची प्रत सुधारते
पीक अवशेषासह मशागतीमुळे सेंद्रिय कर्बयुक्त अवशेष जमिनीमध्ये गाडले जातात. ते जमिनीमध्येच कुजून त्याद्वारे उपलब्ध होणारा कर्ब जमिनीमध्ये मिसळला जातो. पट्टा मशागतीमध्येही पिकांचे अवशेष जमिनीवर तसेच ठेवले जातात. दरवर्षी राबवलेल्या या पद्धतीमुळे जमिनीत सेंद्रिय कर्बाची वाढ होते. यामुळे जमिनीची संरचना सुधारून जास्त पाणी मुरते व साठविले जाते. मातीचे कण पाण्यातून वाहून जाण्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे पाण्याची प्रत सुधारते. जमीन भुसभुशीत होऊन मातीचे कण एकमेकांना चिकटून बसतात, त्यामुळे वाऱ्याने उडून ते हवेत मिसळत नाहीत. जिवाणू पीक अवशेषाचे रूपांतर ह्युमसमध्ये करतात, त्यामुळे जमिनीतील कर्ब वाढते. आच्छादन जमिनीवर टाकल्यानंतर जिवाणूकडून त्याची कुजवण क्रिया सुरू होते. यादरम्यान तयार होणारा ह्युमस जमिनीच्या वरच्या थरात मिसळला जातो. या तंत्रामुळे जमिनीची धूप कमी होते. जमिनीतील पाणी आणि हवेची प्रत सुधारते. जमिनीची सुपीकता वाढते. ओलावा धरून ठेवण्याची व पाणी मुरण्याची क्षमता सुधारते. सेंद्रिय शेतीमधील पीक अवशेष व्यवस्थापनामध्ये सेंद्रिय शेतीमधीलच पीक अवशेष वापरावेत. बाहेरील पीक अवशेष, गवत किंवा झाडपाला वापरायचा असल्यास, तो रासायनिक अवशेषापासून मुक्त असल्याची खात्री करावी. बागायती आणि कोरडवाहू सेंद्रिय शेतीमध्ये पीक अवशेष वापरताना वेगवेगळे मशागत तंत्र वापरणे आवश्यक आहे. पीक अवशेष कुजण्यासाठी आवश्यक ओलावा, तापमान तसेच ऊर्जा जिवाणूसाठी आवश्यक असते. पिकांची फेरपालट करून पीक अवशेषाचा वापर केल्यास मशागतीचा खर्च कमी होतो. जमिनीचे भौतिक, जैविक तसेच रासायनिक गुणधर्म सुधारण्यास मदत होते. संपर्कः डॉ. अजितकुमार देशपांडे, ९४२३३२५८७९. (महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)