उपयुक्त जिवाणू वाढवितात जमिनीची सुपीकता

नत्र, स्फुरद, पालाश व इतर सूक्ष्म अन्नद्रव्ये पिकाला उपलब्ध करून देण्यासाठी सक्रिय आणि उपयुक्त सूक्ष्म जिवाणूंचा वापर फायदेशीर ठरतो. ही जैविक खते पिकाला आवश्‍यक असलेली अन्नद्रव्ये मिळवून देण्यासाठी मदत करतात.
The use of fertile soil and biofertilizers for strengthening the growth of the crop.
The use of fertile soil and biofertilizers for strengthening the growth of the crop.

नत्र, स्फुरद, पालाश व इतर सूक्ष्म अन्नद्रव्ये पिकाला उपलब्ध करून देण्यासाठी सक्रिय आणि उपयुक्त सूक्ष्म जिवाणूंचा वापर फायदेशीर ठरतो. ही जैविक खते पिकाला आवश्‍यक असलेली अन्नद्रव्ये मिळवून देण्यासाठी मदत करतात. पर्यायाने जमिनीत उपलब्ध असलेल्या अन्नद्रव्यांचा कार्यक्षम वापर होतो. जमिनीची सुपीकता केवळ त्यात असलेली अन्नद्रव्ये आणि रासायनिक घटकांवरच अवलंबून नसून त्या जमिनीत कोणत्या प्रकारचे आणि किती सूक्ष्म जिवाणू आहेत यावर अवलंबून आहे. पिकांच्या मुळाभोवती सूक्ष्म जिवाणू मोठ्या प्रमाणात कार्यरत असतात. कारण पिकांची मुळे सेंद्रिय आम्ल, साखर, जीवनसत्त्वे आणि वाढवर्धक पदार्थ जमिनीत सोडतात, या पदार्थावर हे जिवाणू वाढतात.  सूक्ष्म जिवाणूंचे फायदे

  • सूक्ष्म जिवाणूंमुळे सेंद्रिय घटकातील सेंद्रिय नत्राचे (प्रथिने) रूपांतर नायट्रोसोमोनस जिवाणूकडून अमोनियममध्ये होते. त्यानंतर अमोनिअमचे रूपांतर नायट्रोबॅक्‍टर जिवाणूकडून नायट्रेट नत्रामध्ये होऊन उपलब्ध नत्राचा पुरवठा पिकास होण्यास मदत होते. 
  • सेंद्रिय घटकात स्फुरद हा फायटिन, न्यूक्लिक ॲसिड आणि फॉस्पोलिपिड या स्वरूपात असतो. या घटकाचे जिवाणूकडून विघटन होऊन ऑर्थोफास्फेट या स्वरूपात स्फुरद पिकांना उपलब्ध होतो. 
  • गंधक हे अन्नद्रव्य सेंद्रिय पदार्थात मिथीओनिन, सिस्टीन व सिस्टाइन या अमिनो आम्ल स्वरूपात असते. या अमिनो आम्लाचे जिवाणूकडून विघटन होऊन त्याचे रूपांतर सल्फेटच्या स्वरूपात होऊन पिकास उपलब्ध होते. 
  • पिकास लागणारी इतर अन्नद्रव्य जसे पालाश, कॅल्शिअम, मँगेनीज, लोह, जस्त इत्यादी सेंद्रिय पदार्थांच्या विघटनाने पिकास उपलब्ध होतात. 
  • नत्र, स्फुरद, पालाश व इतर सूक्ष्म अन्नद्रव्ये पिकाला उपलब्ध करून देण्यासाठी सक्रिय आणि उपयुक्त सूक्ष्म जिवाणूंचा वापर करता येतो. ही जैविक खते पिकाला आवश्‍यक असलेली अन्नद्रव्ये मिळवून देण्यासाठी मदत करतात. पर्यायाने जमिनीत उपलब्ध असलेल्या अन्नद्रव्यांचा कार्यक्षम वापर होतो. तसेच शेतात असणाऱ्या सेंद्रिय पदार्थाच्या जलदरीत्या विघटनासाठी ते उपयुक्त ठरतात. 
  • नत्र स्थिर करणारे जिवाणू 

  • पृथ्वीच्या वातावरणात नत्रवायू ७८ टक्क्यांपर्यंत असतो. परंतु या नत्रवायूचा उपयोग वनस्पती करू शकत नाहीत. ॲझेटोबॅक्‍टर, रायझेबियम जिवाणू खतातील उपयुक्त सूक्ष्म जिवाणू वातावरणातील वायुरूपात असलेला नत्र शोषण करून झाडांना उपलब्ध करून देतात. नत्राची इतर संयुगे तयार करतात आणि ती झाडांना उपलब्ध होतात. या प्रक्रियेस जैविक नत्र स्थिरीकरण असे म्हणतात.
  • ॲझोटोबॅक्‍टर जमिनीत मुक्तपणे राहून नत्र वायूचे जमिनीत स्थिरीकरण करतात. 
  • रायझोबियम कडधान्य पिकाशी सहजीवी नाते प्रस्थापित करून नत्राचे स्थिरीकरण करतात, हे जिवाणू नत्रवायूचे रूपांतर अमोनियात करतात.
  •   स्फुरद विरघळविणारे जिवाणू

  • जमिनीत स्फुरदयुक्त खते दिली असता त्याचे रूपांतर अविद्राव्य फॉस्फेटमध्ये होते. त्यामुळे पिकास स्फुरद मिळत नाही. हाडाचे खत, रॉक फॉस्फेट, बेसिक स्लॅग आणि रासायनिक खतांद्वारे पुरवलेला स्फुरद सर्वच्या सर्व पिकास उपलब्ध होत नाही. यापैकी २० ते २५ टक्के स्फुरद पिकांना वापरात येऊ शकतो. बाकीचा ७५ ते ८० टक्के स्फुरद मातीच्या कणावर स्थिर होतो. तो पिकाला उपलब्ध होत नाही.
  • उपलब्ध स्फुरदाचा पिके पूर्णत: वापर करू शकत नाहीत. त्यासाठी स्फुरद विरघळविण्याचे कार्य विशिष्ट प्रकारचे जिवाणू करत असतात. त्यामुळे तो पिकांना उपलब्ध होतो. 
  • स्फुरद विरघळविणारे जिवाणू सायट्रिक, लॅक्‍टिक, सक्‍सिनिक, मॅलिक यांसारखी अनेक सेंद्रिय आम्ले स्रवतात. ही आम्ले अविद्राव्य स्वरूपात स्थिर झालेल्या स्फुरदाचे पिकाला उपयुक्त अशा विद्राव्य स्वरूपात रूपांतर करतात. 
  • स्फुरदयुक्त खताबरोबर स्फुरद विरघळविणाऱ्या जिवाणूचा वापर केल्यास वाया जाणारे खत उपयोगी पडते. स्फुरदाची मात्रा कमी करणे शक्‍य होते. 
  • स्फुरद विरघळविणाऱ्या जिवाणूची वाढ व कार्यक्षमता मुळाभोवती जास्त असते. 
  • सेंद्रिय घटक कुजविणारे जिवाणू 

  • कोणताही सेंद्रिय पदार्थ कुजण्यासाठी त्यावर सेंद्रिय पदार्थाचे विघटन करणाऱ्या जिवाणूंची क्रिया व्हावी लागते. जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थाचा सहभाग जमिनीची उत्पादकता टिकविण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यासाठी सेंद्रिय पदार्थाचे विघटन करणाऱ्या सूक्ष्म जिवाणूंची संख्या जमिनीमध्ये वाढविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
  • जमिनीत मिसळलेले सेंद्रिय पदार्थ जमिनीतील वेगवेगळ्या सूक्ष्म जिवाणूंच्या माध्यमातून शेवटी त्याचे ह्यूमसमध्ये रूपांतर होते. या कुजविण्याच्या आणि ह्यूमिक पदार्थ तयार होण्याच्या प्रक्रियेमध्ये मूळ सेंद्रिय पदार्थांमध्ये बंदिस्त असलेली वनस्पतीची पोषक द्रव्ये ही जमिनीमध्ये सोडली जातात. ती पिकांना सहज उपलब्ध होतात. अशा प्रकारे वनस्पतीच्या अन्नद्रव्यांचा चक्रीयरीत्या पुनर्वापर होतो. 
  • द्रवरूप जिवाणू खते  उपयुक्त अशा जिवंत किंवा सुप्त अवस्थेतील जिवाणूंचे निर्जंतुक द्रवरूप वाहकामध्ये केलेले मिश्रण होय. या द्रवरूप वाहकामध्ये उपयुक्त असे उच्च प्रतीचे जास्त संख्येने जिवाणू आणि त्यांना लागणारी अन्नद्रव्ये असतात.  वैशिष्ट्ये 

  • उपयुक्त जिवाणूंचा जीवित राहण्याचा कालावधी १२ ते १४ महिन्यांपर्यंत असतो. 
  • द्रवरूप जिवाणू खताची कार्यक्षमता प्रतिकूल वातावरणातसुद्धा सारखी राहते. जास्त तापमानाचा (४० ते ४५ अंश सेल्सिअस) आणि अतिनील किरणांचा जिवाणूवर कोणताही परिणाम होत नाही. त्याचे गुणधर्म बदलत नसून कायम राहतात. 
  • जिवाणूंची संख्या (१०८  ते १०९ प्रति मिलि) सतत स्थिर राखली जाते. 
  • विकरांची क्रिया खूपच जास्त असल्यामुळे शुद्धता राखली जाते. त्यामुळे दूषित होण्याचे प्रमाण खूप कमी असते.
  • द्रवरूप असल्यामुळे वापरण्यास व हाताळण्यास सोपी असतात. 
  • व्हेंच्युरी व खताच्या टाकीद्वारे ठिबक सिंचनातून अगदी सहजरीत्या पिकास देता येतात. 
  • बिया आणि जमिनीमध्ये जगण्याची क्षमता जास्त. 
  • संपर्क ः डॉ. पपिता गौरखेडे, ८००७७४५६६६, (सहायक प्राध्यापक, मृद्‍ विज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com