दर्जेदार पीक उत्पादनासाठी स्पेशालिटी फर्टिलायझर्स

कमी वेळेत जास्त कार्यक्षमतेने अन्नद्रव्य स्पेशालिटी फर्टिलायझर्स मधून मिळतात. वाढत्या अन्नद्रव्यांच्या कमतरतेचा विचार करून कस्टमाइज्ड फर्टिलायझर तयार करण्यात आली आहेत. पिकाची अवस्था, ठिकाणाचा विचार करून त्यामध्ये सूक्ष्म, अतिसूक्ष्म आणि दुय्यम अन्नद्रव्यांचा समावेश आहे.
दर्जेदार पीक उत्पादनासाठी स्पेशालिटी फर्टिलायझर्स
दर्जेदार पीक उत्पादनासाठी स्पेशालिटी फर्टिलायझर्स

पीक उत्पादकता वाढविण्यामध्ये खतांचा महत्त्वाचा वाटा आहे. आपल्या जमिनीमध्ये अन्नद्रव्यांची कमतरता जाणवत आहे. असंतुलित खतांच्या वापरामुळे सूक्ष्म व दुय्यम अन्नद्रव्यांची कमतरता, पिकांना मिळण्याची खतांची कार्यक्षमता, प्रति एकरी उत्पादकता आणि शेतकऱ्यांना मिळणारा प्रति एकरी फायदा यामध्ये मोठे अंतर पडत आहे. याशिवाय थोड्याफार प्रमाणात प्रदूषणही वाढत आहे. नगदी पिकांसाठी लागणारी अन्नद्रव्ये, त्याचप्रमाणे पिकांची प्रत व अन्नद्रव्ये उपलब्धतेची कार्यक्षमता, पिकांच्या जास्त उत्पादन देणाऱ्या जाती यामुळे स्पेशालिटी फर्टिलायझर्सची मागणी वाढत आहे. कमी वेळेत, वाया न जाता, कमी प्रमाणात जास्त कार्यक्षमतेने अन्नद्रव्य स्पेशालिटी फर्टिलायझर्समधून मिळतात. त्याचा पीक उत्पादनवाढीला फायदा मिळतो. स्पेशालिटी फर्टिलायझर्सची निर्मिती ः १) सातत्याने घेतलेले प्रयोग, जमीन आणि पिकांचा प्रकार, पाण्याची उपलब्धता व हवामानाचा विचार करून स्पेशालिटी फर्टिलायझर्स तयार होतात. २) खतांच्या मात्रा तयार करताना, पिकाची अवस्था त्याचप्रमाणे जमिनीची रासायनिक, भौतिक आणि जैविक स्थितीचा विचार केला जातो. ३) विद्राव्य खतांचा फवारणीद्वारे आणि ठिबक सिंचनामधून वापर करताना, पिकांना खते हळू हळू आणि अन्नद्रव्यांच्या कार्यक्षमतेनुसार दिली जातात. याशिवाय खते कमीत कमी स्थिर होतील, पिकांकडून कमी वेळेत जास्तीत जास्त घेतली जातील हे पाहिले जाते. ४) इंटरनॅशनल फर्टिलायझर्स असोसिएशन सध्या टप्प्याटप्प्याने मिळणारी खते (कंट्रोल रिलीज फर्टिलायझर), हळूहळू उपलब्ध होणारी खते (स्लो रिलीज फर्टिलायझर्स), स्टॅबिलाइज्ड नायट्रोजन फर्टिलायझर्स, लिक्विड फर्टिलायझर्स, चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्य आणि बोरॉन याबाबत अभ्यास करीत आहे. भारतामध्ये विद्राव्य खते, नीम कोटेड युरिया, कस्टमाइज्ड फर्टिलायझर्स ग्रेड, सूक्ष्म अन्नद्रव्ये ही स्पेशालिटी फर्टिलायझर्स उपलब्ध आहेत. ५) स्पेशालिटी फर्टिलायझर्समध्ये नत्र अन्नद्रव्याचा विशेष विचार केला जातो. पिकास नत्राची आवश्यकता मोठी आहे. तसेच दुसऱ्या बाजूला पर्यावरणाला सर्वात जास्त धोका नायट्रोजनमुळे पोहोचतो. पिकांनी न घेतलेला नत्र पाण्यावाटे जमिनीमध्ये नायट्रेट स्वरूपात जिरतो. पुढे जमिनीतून पाण्यात उतरतो. काही भाग अमोनिया आणि नायट्रेट ऑक्साइड या स्वरूपात वातावरणात उडून जातो. स्पेशालिटी खतामध्ये, नत्र उपलब्ध होण्याची कार्य क्षमता वाढविणे हाच एक महत्त्वाचा उद्देश आहे. ६) ही खते प्रामुख्याने नगदी पिके आणि लँडस्केपमधील झाडांसाठी वापरली जातात. जागतिक स्तरावर, दरवर्षी या खतांचा वापर १६ टक्‍क्‍यांपर्यंत वाढत आहे. जगाच्या खत विक्रीच्या १० टक्के आणि अन्नद्रव्यांच्या प्रमाणाच्या (टनेज) ५ टक्के एवढा हिस्सा स्पेशालिटी फर्टिलायझर्सचा आहे. ७) पारंपरिक खतांपेक्षा उच्च प्रत, पीक पद्धती, माती आणि बदललेले हवामान या गोष्टींचा विचार करून स्पेशालिटी फर्टिलायझर्स उत्पादित केली जातात. पूर्व आशिया, उत्तर आणि दक्षिण अमेरिका आणि पश्‍चिम युरोप या देशांमध्ये मोठ्या प्रमाणात या खतांचा वापर होतो. ८) ‘इफ्को’सारख्या सहकारी क्षेत्रांमधील कंपनीने युरिया सुपर ग्रॅन्युल्स आणि हळूहळू उपलब्ध होणाऱ्या नत्रावर काम करून, जगातील पहिला नॅनो युरिया बाजारामध्ये उपलब्ध केला आहे. याचे चांगले परिणाम दिसून आले आहेत. नॅशनल फर्टिलायझर्सनेसुद्धा युरिया अमोनिअम नायट्रेट हे विद्राव्य खत बाजारात आणले आहे. ९) स्मार्टकेम टेक्नॉलॉजिज लि. कंपनीने महाधन बेन्सल्फ (९० टक्के दाणेदार गंधक) हे उसाचे वजन, साखर उतारा वाढविणारे आणि जमिनीची क्षारता कमी करणारे दुय्यम अन्नद्रव्य बाजारात आणले. पिकांच्या गरजेनुसार टोमॅटो स्पेशल, शुगर केन स्पेशल, सोयाबीन स्पेशल, फ्लॉवरिंग स्पेशल अशा सूक्ष्म आणि दुय्यम अन्नद्रव्ययुक्त खतांच्या विविध ग्रेडसाठी विद्यापीठ आणि शेतकरी स्तरावर संशोधन करून, नवीन खते बाजारात आणली आहेत. शिवाय संयुक्त खते १०:२६:२६, १२:३२:१६,२०:२०:०:१३,१४:२८:० या खतांवर विशेष प्रक्रिया करून, दाण्यावर आवरण देऊन, पिकांना अन्नद्रव्यांचा जास्तीत जास्त पुरवठा, कमी वेळेत आणि टप्प्या टप्प्याने देण्याची सोय खतामध्ये आहे. खतातील नवीन तंत्रज्ञान फायदेशीर  १) शास्त्रज्ञांनी युरियाच्या दाण्यांवर निंबोळी तेलाचे आवरण देऊन नीम कोटेड युरिया तयार केला. नत्राचा ऱ्हास त्यामुळे कमी होऊन, जमिनीतील कीड, बुरशी कमी झाली. नत्र पिकास दीर्घकाळ उपलब्ध होऊ लागला. २) फोर्टिफाइड फर्टिलायझर्स, कोटेड फर्टिलायझर्स (सूक्ष्म आणि दुय्यम अन्नद्रव्ययुक्त) या खतांचे निष्कर्ष, पारंपरिक खतांपेक्षा खूप चांगले असल्याने, हळूहळू त्यांचा वापर वाढत आहे. जमिनीतील सूक्ष्म आणि दुय्यम अन्नद्रव्यांची कमतरता कमी होण्यास मदत झाली. ३) या खतामुळे अन्नद्रव्यांचे संतुलन होत असल्याने, माणसांच्या शरीरावर आणि जमिनीमध्ये याचे योग्य परिणाम झाले, शेतीमालाची प्रत सुधारली. संपूर्ण शेतावर एक सारखे खत देता येत असल्याने पिकाची वाढ समान होते. योग्य प्रमाणात अन्नद्रव्य देणे शक्य होते. ४) आपल्या राज्यात झिंक, गंधक व बोरॉनची कमतरता मोठ्या प्रमाणात आहे. लोकांच्या शरीरातही या अन्नद्रव्यांची नैसर्गिक कमतरता जाणवते. खतांच्या संतुलित वापरामुळे भविष्यात ही समस्या मोठ्या प्रमाणात कमी होईल. ५) वाढत्या अन्नद्रव्यांच्या कमतरतेचा विचार करून कस्टमाइज्ड फर्टिलायझर तयार करण्यात आली आहेत. पिकाची अवस्था आणि ठिकाणाचा विचार करून त्यामध्ये सूक्ष्म, अतिसूक्ष्म आणि दुय्यम अन्नद्रव्यांचा समावेश केला आहे. याशिवाय फ्यूजन ब्लेंड ग्रॅनुलेशन किंवा प्रीसिजन ब्लेंड अशा उच्च तंत्रज्ञानाचा वापर उत्पादनासाठी केला आहे. यामुळे अनेक प्रकारची अन्नद्रव्ये पिकास देणे आणि त्यांची कमतरता कमी करणे शक्य आहे. ६) खते पिकास देताना ती मातीआड होतील अशा अवजारांची गरज आहे. यामुळे खतांचा योग्य वापर होऊन जमिनीचे आरोग्य सुधारेल.पीक उत्पादनात वाढ मिळेल. संपर्क ः विजयराव पाटील, ९८२२५९९७४० (लेखक स्मार्टकेम टेक्नॉलॉजिज लि.चे सहयोगी उपाध्यक्ष आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com