वनस्पतींमधील अभिवृद्धीच्या पद्धती

अभिवृद्धीच्या पद्धती जाणून त्यानुसार विविध रोपांची निर्मिती करता येते. यामुळे उत्तम दर्जेदार रोपांच्या निर्मितीतून रोपवाटिकेचा व्यवसाय अधिक फायदेशीर होऊ शकतो.
वनस्पतींमधील अभिवृद्धीच्या पद्धती
वनस्पतींमधील अभिवृद्धीच्या पद्धती

शेती करणे म्हणजेच वनस्पतींची अभिवृद्धी करून बिया, पाने, फुले, फळे यांचे उत्पादन घेणे. अभिवृद्धीच्या प्रकारानुसार अनेक पिकांच्या बियांची पेरणी केली जाते. तर अनेक पिकांची विशेषतः फळझाडांची शाखीय पद्धतीने कलमे करून लागवड केली जाते. नैसर्गिकरीत्या बहुतांश वनस्पतींची अभिवृद्धी आणि प्रसार हा बियांद्वारे होतो. काही वनस्पती या शाखीय भागांपासून वृद्धिंगत होतात. रोपवाटिकेमध्ये या दोन्ही प्रकारांचा वापर कलमे, रोपे यांच्या निर्मितीसाठी केला जातो. उत्तम दर्जाच्या बिया किंवा रोपे मिळवण्यासाठी अभिवृद्धीच्या विविध पद्धतींची माहिती घेऊ. अभिवृद्धीचे शाखीय आणि अशाखीय असे दोन मुख्य प्रकार आहेत. (अ) बियांपासून अभिवृद्धी अनेक वनस्पतींची व पिकांची लागवड बी लावून केली जाते. ही पद्धत सर्वदूर प्रचलित अशाखीय अभिवृद्धी पद्धत आहे. निसर्गात वनस्पतींची अभिवृद्धी याच प्रकारे होते. बहुतेक भुसार पिके, डाळवर्गीय पिके, तेलबिया पिके, गवते, भाजीपाल्याची पिके, अनेक फुले आणि शोभिवंत वनस्पती यांची लागवड बियांपासूनच केली जाते. बी म्हणजे सूक्ष्म व सुप्तावस्थेत असलेले झाड किंवा वनस्पतीच असते. वटवृक्षाचे बी लहान असते तर नारळाचे फळ हेच त्याचे बी असते. बियाचे सर्वसाधारणपणे कवच, अन्नरससाठा व अंकुर असे भाग असतात. फायदे (१) सहज सोपी व नैसर्गिक पद्धत. (२) कमी खर्चिक व कमी कौशल्य लागणारी पद्धत. (३) बियांची वाहतूक, साठवण आणि हाताळणी तुलनेने सुलभ. (४) संकर पद्धतीने नव्या जाती विकसन शक्य आणि तुलनेने सोपे. (५) बियांपासून अभिवृद्धी केलेली झाडे अधिक काटक व दीर्घकाळ जगणारी असतात. तोटे (१) या पद्धतीने अभिवृद्धी केलेल्या पिकात विशेषतः फळझाडात सर्वांचे गुण एकसारखे निपजण्याची शक्यता कमी असते. (२) बियांपासून वाढवलेल्या फळझाडांना फळे येण्यास अधिक काळ लागतो. (३) काही वनस्पतींत फळे अगर बिया उशिराने आणि कमी प्रमाणात लागतात. वांझ बियांचे प्रमाणही खूपच असते. अशा वनस्पती वाढविणे अवघड ठरते. (४) झाडांचा आकार मोठा, त्यामुळे झाडे सांभाळणे अधिक खर्चिक व कष्टाचे काम ठरते. बियांपासून तीन प्रकारे अभिवृद्धी केली जाते. १) ॲपोमिक्सिस ः परागीभवन किंवा संकर न होता होणाऱ्या गर्भधारणेस ‘ॲपोमिक्सिस’ असे म्हणतात. अशा पद्धतीने तयार होणाऱ्या रोपांना ‘ॲपोमिक्ट्रस’ असे म्हणतात. २) पॉलिएम्ब्रेयॉनी ः एकाच बीमध्ये एकापेक्षा अधिक गर्भ असतात. त्यातील एक गर्भ लैंगिक असतो, तर अन्य गर्भ अलैंगिक असतात. ३) स्पोअर्स ः अपुष्प वनस्पती प्रजोत्पादनासाठी तयार करत असलेल्या बीजाणू होत. उदा. नेचेवर्गीय वनस्पती. बियाण्यांचे प्रकार ः रोपनिर्मिती व्यवसायामध्ये बियाणे अत्यंत महत्त्वाचे असते. हे बियाणे स्वतःच्या रोपवाटिकेत तयार केलेले असावे किंवा खात्रीशीर स्रोतांकडून योग्य त्या प्रकारचे बियाणे उपलब्ध करावे. शास्त्रशुद्ध बीजोत्पादनामध्ये बियाणे तयार करणे, त्यांची निवड, प्रतवारी आणि प्रमाणीकरण केले जाते. (१) प्रमाणित बियाणे (सर्टिफाइड सीड्स) (२) पंजीकृत बियाणे (रजिस्टर्ड सीड्स) (३) पायाभूत बियाणे (फाउंडेशन सीड्स) (४) पैदासकार बियाणे (ब्रीडर सीड्स) चांगले बियाणे वेळेत उगवले पाहिजे. ते चांगले जो जोमदारपणे अंकुरले पाहिजे. सर्व रोपे एकसारखी वाढली पाहिजेत. बियाण्यात अथवा रोपात भेसळ नसावी. लागवडीसाठी वापरणार असणाऱ्या बियांची उगवणक्षमता तपासून घ्यावी. प्रमाणित बियांची ८० टक्क्यांहून अधिक उगवण व्हायला हवी. बियाण्यांची उगवणशक्ती अनेकदा सुप्तावस्थेत असते. ही सुप्तावस्था कशी अगर कोणत्या प्रकारची आहे, हे समजून घ्यावे. त्यावर प्रक्रिया करून उगवण शक्ती वाढवता येते. बियाणे खालीलप्रमाणे सुप्तावस्थेत असू शकतात. गट १ : कठीण कवचाचे बी (कवचातून ओलावा न झिरपणे.) गट २ : शीत किंवा उष्ण (चिलिंग/वॉर्मिंग) यापैकी एक - यास ‘स्ट्रॅटीफिकेशन’ असे म्हणतात. गट ३ : कठीण कवच + स्ट्रॅटिफिकेशनची गरज. गट ४ : बियाण्यात उगवण विरोधक अथवा निरोधक द्रव्ये असणे. गट ५ : ताजे बियाणे सुप्त, पण साठवणीनंतर उगवणक्षम. (आ) शाखीय अभिवृद्धी वनस्पतींचे शाखीय अवयव म्हणजे पान, फांदी, खोड, मूळ, डोळा, पान, देठ, कांडे, पेरे इ. पासून केलेली अभिवृद्धी म्हणजेच शाखीय अभिवृद्धी होय. यालाच शारीरिक अभिवृद्धी (इंग्रजीमध्ये ‘व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन’ असेही) म्हणतात. अलीकडेच विकसित झालेली उतिसंवर्धित पद्धत (टिश्यू कल्चर) हाही शाखीय पद्धतीचाच प्रकार आहे. फायदे ः या पद्धतीमुळे निर्माण होणारी रोपे मातृवृक्षाची प्रतिकृतीच असतात. त्यामुळे त्यात एकसमानता अधिक असते. (१) झाडांना लवकर फुले, फळे लागतात. (२) एकाच खुंटावर, खोडावर अनेक जातींची कलमे करून विविधता आणणे शक्य. (३) जुन्या व जीर्ण झालेल्या वृक्षांचे नूतनीकरण करता येते. (४) ज्या वनस्पतीत फळे येत नाहीत किंवा फळात चांगल्या बिया निपजत नाहीत किंवा बियाच येत नाहीत, अशा फळझाडांची किंवा वनस्पतींची अभिवृद्धी करणे शक्य. (५) प्रतिकूल परिस्थितीत जमीन व हवामानासाठी योग्य त्या स्थानिक खुंटाची निवड करून त्यावर कलम करता येते. तोटे (१) संकर करून नवीन वाणाची निर्मिती शक्य होत नाही. (२) अभिवृद्धी करण्यासाठी विशेष कौशल्याची आवश्यकता. (३) खर्चिक व वेळखाऊ प्रक्रिया. (४) सर्व व्यापारी पिकात पद्धत परवडत नाही. शाखीय अभिवृद्धीचे प्रकार ः चांगल्या गुणवत्तेचे भरपूर उत्पादन मिळण्यासाठी बहुतेक व्यापारी तत्त्वावर लागवडीच्या फळबागा शाखीय अभिवृद्धीने म्हणजेच कलमे लावून करतात. यामध्ये अनेक प्रकार व उपप्रकार पुढील प्रमाणे - (अ) वनस्पतींचे जमिनीतील अवयव वापरून केलेली अभिवृद्धी : मूळ, कंद (सकर), मुनवा, इ. (आ) वनस्पतींचे जमिनीवरील अवयव वापरून केलेली अभिवृद्धी ः खोड, फांदी, डोळा, पान इ. शाखीय अभिवृद्धीच्या पद्धती खालीलप्रमाणे आहेत : वेगळे करणे (सेपरेशन), विभागणे (डिव्हिजन), फाटे कलम, दाब कलम, डोळे भरणे, जोड कलमे, उतिसंवर्धन. शाखीय अभिवृद्धी करण्यासाठी, कलमांची वाढ करण्यासाठी योग्य त्या माध्यमाची गरज असते. ही माध्यमे पुढीलप्रमाणे आहेत. (१) माती (गार्डन सॉईल) (२) वाळू (क्वार्ट्झ सँड) (३) पीट(४) स्पॅग्नम मॉस(५) व्हर्मिक्युलाइट (६) परलाइट (७) लीमफोल्ड (८) लाकडी भुस्सा (सॉ डस्ट) (९) धान्याचा भुस्सा (ग्रेन हस्क) (१०) कोको पीट चांगले माध्यम कोणते? (१) फार भुसभुशीत अथवा फार घट्ट नसावे. (२) ओले किंवा कोरडे असताना घनतेत किमान फरक पडावा. (३) जलधारण क्षमता पुरेशी असावी. (४) त्यात सूत्रकृमी, वाळवी, बुरशी, तण बिया नसाव्यात. (५) माध्यमाचे निर्जंतुकीकरण करण्यासारखे असावे. दर्शना मोरे, ९६८९२१७७९० (सहायक प्राध्यापिका, के. के. वाघ फळबाग महाविद्यालय, नाशिक)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com